mushak

काळ्या पाण्याची सजा… मुषकराज 2023 भाग 6

संपादकीय

जलजीवनच्या चिखलातून बाप्पा कसाबसा पाय टाकत बाहेर पडले. झेडपीच्या तळमजल्यावर असलेल्या शिक्षणाविभागाकडे बाप्पांनी मोर्चा वळवला. ऊन डोक्यावर आलं तरी कार्यालयात शिपायाशिवाय इतर कोणीही नव्हते.

बाप्पाने मुषकाला प्रश्न केला “ह्या ऑफीसात एवढी शांतता कसली?” मुषकाने बाप्पाच्या पुढ्यात येत इथली शांतता भेदत एक एक कारनामा सांगायला सुरूवात केली. “बाप्पा या कार्यालयात कर्मचारी येतात कधीमधी पण पगार अन् वरकमाईला मात्र सगळ्यात आधी. एकजण येतो तोंड दाखवतो अन् गुटख्याची पिचकारी मारून निघून जातो. दुसरा येतो चहा प्यायला निघून जातो. तिसरा येतो तंबाखुची तलफ झाली म्हणून तोही निघून जातो. चौथ्याला उन्हाळी तर पाचव्याला हगवण. सहाव्याच्या पोटात आकडा पडतो तर सातव्याला हिवतापाचं कापरं भरलेलं असतं. ह्यांच्यापेक्षा ज्युनियर केजीची बारकी लेकरं बरी. पण ह्यांची ही कारणं वरवरची. खरी मेख येगळीच है. इथे आल्यावर जो बाहेर जातो त्याचा कोणीतरी बाहेर नवस फेडायला थांबलेला असतो. नवस फेडून झाला की हा पठ्ठ्या आजची कमाई झाली म्हणून मोकळा” मुषक बाप्पाला काही सांगत असतानाच एकजण आला अन् त्यानं डायरेक्ट ‘जन-गण-मन’ सुरू केले. सगळ्यांचाच नाविलाज झाला. जे काही दोन-चार कर्मचारी हजर होते ते उभे राहीले. सगळं राष्ट्रगीत संपलं… भारत माता की जय झालं. बाप्पांनी मुषकाकडे कटाक्ष टाकत हे कोण असे प्रश्नार्थक हावभाव केले. त्यावर मुषक म्हणाला “हे इथले आरटीइ कार्यकर्ते मनोज जाधव… दरसाली 2000 गरीब लेकरांना इंग्रजी शाळेत फुकट अ‍ॅडमीशन मिळवून देतात. इंग्रजी शाळांवाले ह्यांन्ला लटलट कापतात. ह्यांची मागणी है की इंग्रजी शाळांची वेळ साडेपाच घंट्यापेक्षा अधिक असू नै. त्यावर ईओंनी शाळांना नोटीसही काढली पण अंमलबजावणी करणार कोण? इथले ईओ म्हणजे आता ‘म्हातारा नवरा जिवाला आधार’ झालेत. ते नुकतेच नासाच्या सहलीवरून परत आलेत. त्यांचं शिक्षण विभागात योगदान काय असं जर कोणी इच्चारलं तर कोणी काय बी सांगू द्या पण ह्याचं योगदान एकच अन् ते म्हणजे यापुर्वीचे सीईओ यांच्या पत्नी आणि विद्यमान अतिरिक्त सीईओ यांच्या पत्नी ह्यांचा अमेरिकेचा व्हीसा काढण्यासाठी दोघींना 11 विद्यार्थ्यांच्या केअर टेकर दाखविण्यात ह्यांनी आपली खुर्ची पणाला लावली होती. तब्बल 75 लाखांचा खर्च झालाय त्यांच्यावर. पण ‘कार्यारंभ’वाल्यांनी लैच बोंब ठोकल्याने दोन बायकांची अन् खुद्द अजित पवारांचीही सरकारी पैशातून जायची हिंमत झाली नाही. पण डुप्लीकेट कारण दाखवून भारताच्या परराष्ट्र खात्याची इथं फसवणूक झाली है” मुषकाच्या नव्या खबरीने बाप्पांनी आपले कान सुपाऐवढे करीत थोडे चिंतीत झाल्याचे दिसले. मुषकाला त्यांनी प्रश्न केला. जिल्ह्यात एकूण शाळा किती हैत? मुषक उत्तरला “2478 शाळा हैत. पैकी 55 शाळा माध्यमिक हैत. माध्यमिक शाळेपेक्षा देशी दारूची दुकानं जिल्ह्यात जास्त हैत. पण एक इंटरेस्टीग बात ही है की जिल्ह्यात काही दिवसात ‘विद्यालये’ कमी अन् ‘मद्यालये’ जास्त होतील” “ती कशी काय?” म्हणत बाप्पांनी पुन्हा प्रश्न केला. मुषक पुन्हा बोलायला लागला. “कोणतंही नवं सरकार आलं की आधी ते सरकारी शाळा बंद करायचा निर्णय घेतं. दरवर्षी 100-200 शाळांना कुलूप लागतेय. तर कोणताही नवा कलेक्टर आला की पाच पन्नास नव्या दारू दुकानाला परवानगी मिळते. हे सरकारी धोरण है. विशेष म्हणजे या दारू दुकानांच्या मालकीन ह्या बाया हैत. बाईचं नाव प्रोप्रायटर म्हणून दाखवली की लायसन पटकन् मिळतं. केस, लफडी, बाराभानगडी ही कटकट नैय रहात. ही ह्यातली सरकारी गोम है. 600 बिअरबार, 87 देशी दारू दुकान, 12 वाईनशॉप अन् 250 बिअर शॉप म्हणजे 949 दारुचे दुकान हैत जिल्ह्यात. वरतून पावलागणिक असलेल्या धाब्यावर पावशेर आतपाव मिळते तीची तर मोजदादच नाय. जिल्ह्यात पाठशालाची घंटी वाजायच्या आत मद्यशाळा ओपन झालेल्या असत्यात. सरकारचं धोरणच दिसतंय, लेकरं शिकली तर झेंडे कोण बांधील? घोषणा कोण देईल?”

बाप्पांनी शिक्षण विभाागात शाळा भरवल्याची खबर कोणीतरी माध्यमिकच्या ईओंना दिली. ते धापा टाकत जिल्हा परिषदेत दाखल झाले. उंच देहयष्टी, पाठीतून थोडीशी मान खाली वाकलेली. बेल्टने कंबर करकचून आवळलेली. समोरच्याच्या खिशावर त्यांची नजर गेलेली पाहून मुषकाने त्यांना “हे साक्षात गणपत्ती बाप्पा हैत ह्यांच्या खिशाकडे कुठे बघता” म्हणून चार शब्द सुनावले. तेव्हा ते थोडेशे वरमले. मुषकाने त्यांची ओळख करून दिली. “हे नागनाथ देशि… स्वॉरी नागनाथ शिंदे. पुर्वी गेवराईत व्हते. तिथे काय तरी बंदुकीचे आवाज झाले अन् त्यांना तीन महिने जेलात पीएचडी करावी लागली. गेवराईच्या पंडितांना धडा शिकवायचा म्हणून ते आता या खुर्चीवर बसलेत. पण पुन्हा इरादा बदलला का काय देव जाणे. असो ह्यांनी मागे एकदा बीड शहरातील नामांकित इंग्रजी शाळेत जाऊन बराच ड्रामा केला व्हता. त्यांची चौकशी देखील लावली. पण नंतर त्यांना बोललेला नवस पूर्ण झाल्याने त्यांनी ही चौकशीच गुंडाळून टाकली, अशी अंदरकी खबर है. जिल्ह्यात सीईओ, कलेक्टर, एसपी किंवा बीडच्या नगर पालिका मुख्याधिकारी जितकं छापत नसतील त्यांच्या दहापट रोजचं टेबलाखालून कर गोळा करत्येत हें. एकदम मलईदार पोस्ट म्हणत्यात ती हीच है. त्या शिक्षण संचालकांनी राज्यातील ईओंच्या एसीबीकडून चौकश्या करा म्हणून सीएमला पत्र पाठवलं व्हतं. त्यात पत्रात ह्यांच्या नावाचा मजकूर व्हता की नै याची मला खात्री नै. सगळी कार्यालये एकीकडे अन् ह्याचंच एका कोपर्‍यात. त्यामुळे ह्यांचा छापखाना त्या तेलगीला लाजवेल असा है.”

मुषकाच्या तोंडून बाहेर आलेल्या एका एका शब्दाने बाप्पांच्या अंगात संतापाच्या लाह्या फुटत होत्या. काळ्या पाण्याची सजा पुन्हा कायद्यात आणली तर कसे राहील हा विचार करीत असतानाच समोरून जिल्हा परिषदेवर शिक्षकांचा मोर्चा धडकला. मोर्चाकडे बाप्पांनी पाहताच बरेच धडधाकट मग लंगडत लंगडत चालू लागले. डोळस आंधळे झाले, काहींनी कानाला मशीनी लावल्या. तर काही अचानक मुके झाले…


Tagged