mushakraj

युवा नेते अन् बायोडाटा

संपादकीय

मुषकराज भाग 2
गेवराईच्या भुमीत मुषक बाप्पाला घेऊन लॅन्ड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या घोषणा थांबवून बाप्पांच्या नावाचा जयघोष सुरू केला. बाप्पाला आत्मिक समाधान वाटले. एक एक युवा नेते बाप्पांच्या पुढ्यात येऊन त्यांचं स्वागत करीत होते. मुषक त्या प्रत्येकाचा बायोडाटा वाचून दाखवत त्यांची ओळख करून देत होता.
“हे हायती प्रीथ्वी”, मुषकाला मध्येच थांबवत बाप्पा म्हणाले, ‘पृथ्वी म्हण पृथ्वी…’ त्याक्षणी मुषक बाप्पाच्या कानाजवळ गेला अन् सांगू लागला. “चुकून पण तुम्ही पृथ्वी म्हणून नका. त्यांच्या लग्न पत्रिकेवर ‘प्रीथ्वी’ अशीच बाराखडी मी मपल्या डोळ्यांनी वाचलीय. ह्याच्या नावाचा उच्चार करायचा झाला तर जिभेचं समोरचं टोक असं टाळूवर दुमडायचं आणि तसंच घासत पुढं आणून दातावर आदळवत तोंडातली हवा सोडून द्यायची. हे शिकायला पार यीळभर लागलाय. जसे नऊ महत्वाचे ग्रह तसा हा आपल्याच सख्ख्या मामाच्या राशीला आलेला दहावा ग्रह… ‘प्रीथ्वी’. प्रीथ्वीदादांनी बाप्पांना वंदन केले आणि आधी आमच्या घराला पाय लागू द्या अशी बाप्पांना विनंती करीत त्यांच्या चरणी जयभवानीत गाळप झालेलं एक साखरेचं पोतं अर्पण केलं. जाता जाता प्रीथ्वीदादा म्हणाले “यंदा साखरंय म्होरल्या वर्षी अख्खी सीएनजीची टाकी आणून ठेवीन जयभवानीत तयार झालेली”. बाप्पानं स्मितहास्य करीत आशीर्वाद दिला.
बाप्पा इकडे गर्दीवर नजर टाकत होते. तेव्हा त्यांना डीजेजवळ उभे असलेले संजय दत्त दिसले. बाप्पांनी मुषकाला आज्ञा केली. “आधी त्या संजूबाबाला माझ्याजवळ येऊ दे…” सिनेमातला संजय दत्त इकडे कुठे म्हणून मुषक आजुबाजुला शोध घेऊ लागला. तेव्हा त्याची नजर माजलगावचे आमदार पुत्र नरेंद्रदादांवर गेली. मुषकानं डोक्याला हात लावला अन् बाप्पांना म्हणाला, “बाप्पा कायतरी गैरसमज झालाय तुमचा…चष्मा तर लागला नाही ना तुम्हाला? हे संजूबाबा सारखे दिसतात खरे पण ते माजलगाव साखर कारखान्याचे मालक नरेंद्रदादा हायती… ह्यांच्याचकडं माजलगाव धरणाचं मासे पकडायचं पडद्यामागून टेंडर हाय… हे आताच माजलगाव बाजार समितीवर निवडून गेले हायती… माजलगावच्या एमआयडीसीत ह्यांनी कपडे शिवायची फॅक्ट्री टाकलीये… कारखान्याच्या इलेक्शनमधी बिनईरोध येऊन आपल्याच सख्या चुलत भावाचा चेअरमन होताना लै गेम केलाय त्यांनी… पण बाप्पा एक सांगू का ह्यांच्या घरात ह्यांच्या मालकीन लै हुश्शारऽऽ त्यांना माजलगावात मोठं भवितव्य हाय…” मुषकाला मध्येच थांबवत बाप्पा म्हणाले “त्यांना पुढे बोलव अन् हा हार त्यांच्या गळ्यात घालून आपल्यावतीनं तरूण साखर कारखानदार म्हणून त्यांचं स्वागत करा” बाप्पांची आज्ञा ऐकून मुषकाचे हातपायच लटलट कापायला लागले. मुषकाने टूणकून बाप्पाच्या कानाजवळ येत सांगितले. “बाप्पा ह्यांना गळ्यात कोणी हार घातला की ते थेट मुस्काड रंगवतेत. त्यांच्या कार्यकर्त्याला भर विजयी मिरवणुकीत कानाखाली पडल्यापासून माजलगावचे सगळे हारविक्रेते आधी शपथपत्र लिहून घेतेत. त्यात लिहीलेलं असतं ‘हा हार नरेंद्रदादाना घालणार नाही’. अन् तुम्ही मला सांगताय हार घाल त्याला… आपल्यात नाय एवढी डेअरिंग” मुषकाचे हे बोल ऐकून बाप्पा गालातल्या गालात हसले. नरेंद्रदादांना आशीर्वाद देत म्हणाले, “कारखाना नीट चालवा. आजपर्यंत एकदाही गाळपाविना तो बंद नाही. तो रेकॉर्ड अबाधीत ठेवा” पुढच्याची बारी… तत्पुर्वी नरेंद्रदादांनी आपल्या बंद पडलेल्या फॅक्ट्रीत तयार झालेला एक भला मोठा सदरा बाप्पांच्या पायावर अर्पण केला. आता जयसिंहभौ पुढे आले. त्यांनी बाप्पांच्या चरणावर ‘दादा माझे सांगाती’ हे पुस्तक ठेवलं अन् बाप्पाचा आशीर्वाद घेऊन पुढे निघाले.
पुढचा नंबर लागला शिरूरचे मैबूबभाई अन् पाटोद्याचे बाळा नांगर यांचा… मुषक म्हणाला, बाप्पा हे दोन्ही गडी लै कामाचे. तरूणैत, तडफदारैयत… जात-पात धर्म विसरून सामान्य लोकांसाठी रात्रंदिवस अ‍ॅक्टीव मोडवर असतात. दोघं पण दोस्त. पण बारामतीच्या घराचे दोन उंबरे झाले अन् ह्यांच्यात दरार पडली. यंदा ह्यांना कुठंना कुठं, कसान कसा गुलाल लागला पाह्यजे बगा… बाप्पांनी दोघांनाही अशीर्वाद दिले. पैकी मैबूबभैनं बाप्पाच्या पुढ्यात येत त्यांच्या चरणावर ‘बारामतीचे काका माझे सांगाती’ हे पुस्तक ठेवलं. तर बाळा नांगर यांनी ‘परळीचा वाघ माझा सोबती’ हे न प्रकाशीत झालेलं पुस्तक अर्पण केलं.
पुढचा नंबर लागला तो पुजातैयचा… मुषकानं पुजातैयची ओळख करून देण्यापुर्वीच पुजातैयनं बाप्पांच्या पुढ्यात येत हातातल्या दुर्वा अन् ‘गेवराईचं शिवार’ हे पुस्तक बाप्पाच्या चरणावर ठेवत बाप्पांना म्हणाल्या, “आशीर्वाद द्या बाप्पा… माझ्याकडं तुम्हाला देण्यासारखं आज कैच नाय… तुम्ही येणारंय म्हणून एसटीनं हाप तिकिटावर प्रवास करून आलेय. एसटीचा प्रवास लैच खडतर म्हणून मी बारामतीच्या काकांचे आशीर्वाद घेतलेत. काम करायचंय बाप्पा पण पेट्रोल, डिझेल पाण्याचं काय तरी बगा… माझ्याकडं कारखाना नाय, ना कुठली संस्था हाय… बाप माझा शेतकरी… शेतकर्‍याच्या दुःखाला कुठेतरी आवाज असावा म्हणून मी इंजिनीअर, वकीलीचं शिक्षण पूर्ण करून या चिखलात उतरलेय… मला पंख असते तर मी उडत उडत अनेक गावात जाऊन पक्षाचं काम केलं असतं. मला भाकर तुकड्याची काळजी नाय. कोणत्याबी गावात गेलं की लोक आपुलकीनं इच्चारतात पोरी जेवलीस का? तरूण पोरं बहीणीसारखी माया लावतात. गावात जाते मंदिरातला माईक घेते अन् बोलायला सुरू करते. लोक उघडपणे सोबत यायला प्रचंड घाबरतेत. गेवराईतील सोयर्‍या धायर्‍याच्या राजकारणाला सुरूंग लावायची माझ्यात हिंमतंय फक्त पैशाचं सोंग नाही करता येत बाप्पा… राजकारण करायचं तर फक्त मोठ्याच्याच घरी जन्माला आलं पाहीजे का?” पुजातैयचं बोलणं मध्येच थांबवत बाप्पा मुषकाच्या कानात म्हणाले, ‘पोरीत दमंय… आजकाल कुठलंच साधन हाताशी नसताना राजकारणात इतकं पाय रोवून उभं राहण्याचं धाडस क्चचित काही लोकांमध्ये असतं. राजकारण म्हणजे जळता निखारा पदरात घेण्यासारखंय. ह्या निखार्‍याची मशाल झाली पाह्यजे. ती मशाल गावागावात धगधगली पाह्यजे. आपल्या भक्तांना तातडीने निरोप पाठवा” पुजातैयनं बाप्पांना पुन्हा दंडवत घातला.
अजुनही बरेच युवानेते रांग लावून होते. त्यात बीडची सागर कंपनी होती. दोन्ही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. काही बीड बाहेरचे होते. बाप्पाने मुषकाला आज्ञा केली. “बीडच्या युवा नेत्यांना सांगा आता आमचा आरामाचा टाईम झालाय. तुम्ही इथे थांबून येळ घालवू नका. मीच बीडात अन् पुढे ज्याच्या त्याच्या गावात येतोय. बीडात अनेक अधिकार्‍यांना भेटायचंय. माझ्या दौर्‍यांची आखणी कर…”
क्रमशः उर्वरित उद्याच्या अंकात…

Tagged