धोतराचा सोंगा डाव्या हातात धरून झरझर पावलं टाकत बाप्पांनी दिवानखान्यातून अंगणात येत मुषकाला आवाज दिला. बाप्पाच्या आवाजाने मुषक क्षणार्धात बाप्पाच्या पुढ्यात हजर झाला. तसे बाप्पाने मुषकाला पृथ्वीतलावर चालण्याची आज्ञा केली. जशी आज्ञा मिळाली त्या क्षणी मुषकाने अतिव उत्साहात बाप्पांना दोन्ही कर जोडून स्मितहास्य करीत नमस्कार केला. आपल्या शेपटीला पीळ देऊन ती जोरदार जमीनीवर आपटली. अन् बाप्पाची बॅग डाव्या खांद्यात अडकवत बाप्पांना डोळ्यांनीच पाठीवर बसण्यासाठी खुणावले. बाप्पा मुषकाच्या पाठीवर बसले अन् दोघे ब्रम्हांडाचा प्रवास करत करत पृथ्वीलोकाकडे निघाले. जसे जसे अंतर कापले जात होते तसे दोघे अति आनंदात होते. आज आपल्या परम भक्तांना भेटायला मिळणार हा त्यांचा आनंद जणू गगनात मावत नव्हता. बाप्पांची स्वारी चंद्राजवळ आली. भारतानं सोडलेल्या चांद्रयान 3 ने बाप्पांची ही स्वारी बरोबर टिपली. लागोलग इस्त्रोला त्याचे फोटो पाठवून देत खाली संदेश लिहीला… ‘माझ्या पपानं गंम्पती आणलाय…’ इस्त्रोने या इमेज ट्विटर, फेसबूक, इन्स्टाला पोस्ट करीत लिहीले बाप्पा काही वेळात मध्य महाराष्ट्रातील मराठवाड्यात असलेल्या गेवराई शहरात लॅन्ड होत आहेत.
ही पोस्ट पडल्याबरोबर गेवराईत प्रचंड उत्साहाचे वातावरण संचारले. खबर परळीला गेली. मग काय परळीच्या लाल किल्ल्यावरून हैद्राबादला फोन गेले. बाप्पांसाठी 100 क्विंटलचा हार अन् 4 टन गुलाबाच्या पाकळ्यांची ऑर्डर बूक झाली. होर्डिंगवाल्यांना शहागडच्या पुलापासून ते परळीपर्यंत 130 किलोमीटरच्या अंतरात फुटाफुटावर, चौकाचौकात होर्डिंग लावण्याचे फर्मान सुटले. बाप्पांचे मोठ मोठे हूड उभे करण्यासाठीही ऑर्डर गेली. लैच बोंब झाल्याने ‘शासन आपल्या दारी’चा माघारी फिरलेला सव्वा दोन कोटी रुपयांच्या मंडपवाल्याला देखील परत बोलावत मंडप उभारणीचा हुकूम झाला. एकाच वेळी सहा सहा मोबाईलवरून बाल्मीकांण्णांनी सुचना केल्याने अवघ्या अर्ध्या पाऊण तासात सगळी यंत्रणा बाप्पांच्या स्वागतासाठी सज्ज झाली. बाल्मीकाण्णांसाठी फोन लावून देणारा गणेश या फोना फोनीने पुरता घामाघूम झाला. त्यांच्याजवळचे सहा मोबाईल अन त्यातले 12 सीम लाव्हा फेकाव्यात असे गरम झाले.
बाल्मीकांण्णांची ही टाईट यंत्रणा पाहून शिवछत्रवाल्यांचा काळजाचा ठोका चुकला. एखाद्या ‘सिंहा’ने डरकाळी फोडावी तसा शिवछत्रच्या आतून आवाज आला. “आमच्या गेवराईत लॅन्ड व्हणारे गणपती बाप्पा तुम्ही भलेही परळीला घेऊन जाल हो… पण या शिवछत्रच्या देव्हार्यात बसवलेला गणपती तुम्ही काढणार कसा? आहे का हिंम्मत” ज्येष्ठ थोरल्याहून घरातील कर्त्या असलेल्या थोरल्या मालकाचा आवाज ऐकल्याबरोबर बंगल्यातील पृथ्वी अन् रणवीर नावाचे दोन बारीक बछडे गुरगुर करीतच बाहेर आले. गोपाल दांडे, बळीभौ, अनुप संत्री नावाच्या कार्यकर्त्यांनी या बछड्यांना जवळ घेत गोंजारले. तेव्हढ्यात ‘विजयी’मुद्रेत एक छावाही तिथे दाखल झाला. ह्या सगळ्यांनाच ‘अमृत’ नावाच्या एका व्यक्तीने ‘थार’ गाडीत बसवून गेवराईच्या दिशेने बाप्पाच्या स्वागतासाठी रवाना केले. त्यांना तिकडे रवाना होताना पाहून उर भरून आलेले वात्रटिकाकार सत्यप्रेम लगट यांना एक वात्रटिका सुचली.
शिवछत्रात तीन फूल दोन हाप
पण गेवराईत आम्हाला झालाय
सोयर्या धायर्यांचा ताप.
आता थार गाडीत बसून निघालाय
शिवछत्रचा धाडसी वाघ…
लगट साहेबांची ही वात्रटिका ऐकताच पृथ्वीच्या दंडात दहा हत्तीचं बळ संचारलं… त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना फोनाफोनी करून बाप्पाच्या स्वागताला जमण्यासाठी सांगितले. कोणीतरी मध्येच बोलले ‘अरे आपला सुतार तर पवारांना जाऊन मिळालाय… दगा केला त्यानं आपल्यासोबत… त्याला कशाला बोलावता?’ हे वाक्य ऐकताच पृथ्वीदादाच्या कानात जणू काही कोणी शिसं ओतलंय असं झालं. राग, संताप डोळ्यातून आग ओतू लागले. आपल्या सोबत वावरणारा असा कसा काय आपल्याला सोडून जाऊ शकतो या विचारानेच त्यांचं टाळकं सरकलं. दोन्ही हाताच्या मुठी त्यांनी आवळल्या अन् चालकाला सांगितले गाडी कोल्हेररोडला मामाच्या दारात घे… कुणालाच काही कळेना… गाडीत बसलेल्या सर्वात धाकट्या काकांनी पृथ्वीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण गडी काही ऐकेना. कोणीतरी हाताला धरून जवळ ओढण्याचा प्रयत्न करून पाहीला. पण गडी इतका तापला की धरणार्यांच्या हाताला चटका बसला. एवढ्या वेळात आमदार असलेल्या मामाचं घर आलं. गडी गाडीच्या खाली उतरला अन् थेट गाडीच्या टपावर जाऊन बसला. इकडे मामाच्या वाड्यात खबर गेली. नंदेचा पोरगा आलाय म्हणून दोन्ही माम्या लगबगीने बाहेर धावणार तेव्हढ्यात लक्ष्मण मामांनी त्यांना घरातच थांबण्याचा आदेश सोडला. हा सगळा खेळ पाहून बाप्पाच्या स्वागताला आलेली गर्दी कोल्हेररोडला जमा झाली. दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. तास दिड तास झाल्यानंतर आमदार असलेले लक्ष्मणमामा बाहेर आले अन् आपल्या भाच्च्याला एकच बोलले…
“तू तर राजकारणात आत्ता आला ल्येका. एक कार्यकर्ता आपल्याला सोडून गेला तर इतकी आग आग झाली तुझी. मग इच्चार कर ज्या शरद पवारांनी तुझ्या आज्याला मंत्री केलं, त्यांना ते सोडून गेले. तुझ्या चुलत्याला ज्या गोपीनाथरावांनी आमदारकीचा गुलाल लावला त्यांच्याकडेही ते उल्सेकच थांबले अन् पुन्हा शरद पवारांकडे गेले. तिथे शरद पवारांनी त्यांना पुन्हा आमदारकी दिली त्याच शरद पवारांना वय झालं म्हणून सोडून देता? आता ज्यास्तीचं बोलाय लावू नकू… गप गुमान्यात इथून निघून जा… गरद्यात कुणाचा सभागती ठोका बसला तर इनाकारण कालवा व्हायचा. भासाय म्हणून इतक्या येळ सहन केलं. दुसरा अस्ता तर कवाचाच गार केला अस्ता. आमचं अजून तू कायच बघीतलं नाहीस…पालमंत्री होऊ दे मग दाखिवतो तुला अन् तुझ्या अभ्यासू चुलत्याला” बाहेरचा कलमा ऐकून तितक्यात बंगल्यातून बारके शिवराजभौ दोन्ही हाताच्या भाया मागे सारूनच बाहेर आले. मामा-भाच्याचं प्रकरण हाताबाहेर जाईल असं दिसतंय पण एवढ्यात डीजेच्या मोठ्या आवाजात ‘आमच्या पपांनी गंम्पती आणलाय’ असे गाणे वाजवत माजलगावहून आमदारपूत्र नरेंद्रदादा, जयसिंहभौला घेऊन दाखल झाले. दुसरीकडे पाटोद्याहून बाळा नांगर, शिरूरहून मैबूबभै, आंब्याहून अक्षयभौ मुंदडा, आष्टीहून जयदत्तभौ धस, बीडातून संदीपभौ सागर, योगेशभौ सागर, सर्जेराव तात्या, बळीप्पा गवते, पुंडलीकभौ खांडे, गजेंद्रभौ मस्के, छत्रपती संभाजीनगरहून पुजातैय मोरे, वडवणीतून डाबरी मुंडे, जग्गूभौ फरताडे, केजाहून सुमंतभौ धस, मवनभौ गुंड, हातोल्याचे राजेश्वर आबा, परळीहून खुद बाल्मीकान्ना. त्यांच्यासोबत चंदू गोरे, अधीर सांगळे, झाडून पुसून सगळे युवा नेते, त्यांचे कार्यकर्ते, पीए, बाप्पाच्या स्वागतासाठी गेवराईत आले होते. कमी होती ती परळीच्या दोन्ही तैयची…
आता काहीच क्षणात बाप्पा अन् मुषक लॅन्ड होण्याची वेळ झाली होती. कार्यकर्ते आपआपल्या नेत्यांचा जयघोष करीत होते. राजकारण इतक्या खालच्या थराला जाऊन पोहोचले की समोरून बाप्पा येतायत अन् आपण त्यांचा जयघोष करायला हवा हे देखील कार्यकर्ते विसरून गेले होते.