mushak

विसर्जन मुषकराज 2023 भाग 10

संपादकीय



मुषक आज तांबडं फुटायला आवरून सवरून तयार झाला होता. बाप्पांनी नेहमीची पुजा-अर्चा उरकून घेतली. काही मोजक्याच खास लोकांशी चर्चा करण्यासाठी बाप्पांनी राखीव दिवस ठेवला होता. राजकारणाचा बाप्पांना विट आल्याने त्यांनी या दहा दिवसात युवानेते वगळता एकाही राजकारण्याला जवळ फिरकू द्यायचं नाही, असा पणच केला होता. पुजा अर्चा आटोपताच बाप्पांनी वर्तमानपत्रे हातात घेतली. सगळ्या पेपरच्या पानावर पंकजाताई मुंडे दिसत होत्या. एक एक पेपर बाप्पांनी भरभर नजरेखालून घातले. मुषकाला टिव्ही लावण्याची आज्ञा केली. तर टिव्हीवरही पंकजाताईच मुलाखती देताना दिसत होत्या.

मुषक – बाप्पा आम्हाला शेतकर्‍यांची चिंता लागलीय हो… सतरा आठरा साखर कारखाने, 10-5 बँका उभा करणारे, आमदार खासदारांची फॅक्ट्री म्हणून परिचित असलेले गोपीनाथराव या जगात नाहीत. त्यांच्या पश्चात दुश्मनांनी वैद्यनाथ कारखान्याची वेळ साधावी? त्यांच्या लेकीवर त्यांच्याच पक्षाने इतका अन्याय करावा? आम्हाला हुंदका दाटून येतोय. पोरगी बँकांच्या दारात जाऊन हातापाया पडत असेल अन् तरीही ह्यांना पाझर फुटत नसेल तर काय म्हणावं असल्या लोकांना?

बाप्पा – निर्दयी म्हण निर्दयी… दगडाच्या काळजाचे अस्तात असले पुढारी. आपल्या पक्षासाठी कोण किती झिजले ह्याची ह्यांना जराबी फिकीर नसते. माणूस गेला की त्याच्या पुढच्या वारसांना हे अनाथ करून सोडत्यात. मी तर म्हण्तोय त्यांनी कशाला रहावं असल्या पक्षात? पंकजाताई कुठंबी गेल्यातरी 5-25 आमदार सहज निवडून आणण्याची कॅपीसिटी है त्यांच्यात. त्यात पुन्हा आताच त्यांनी आमच्या पप्पांची परिक्रमा पूर्ण केलीये. त्यांचा आशीर्वाद असल्यावर आटूमेटीक आमचाबी हात त्यांच्या डोस्क्यावर असणारच की… त्यामुळं त्यांना काळजीचं कोण कारण?

मुषक- बाप्पा तुमचा हात असून काय उपयोग? त्यांच्या डोस्क्यावर परळीच्या लोकांचा हात असायला हवा ना? शास्त्री जी काय म्हणाले ऐकले नाही वाटतं तुम्ही? एक परिस परळीचे लोक डोस्क्यावर हात ठिवतील पण त्यांचे हात परळीहून थेट वरळीला नैत पोहचत. हे अंतर कापाय बुलेट ट्रेनबी नाय आपल्याकडे? त्यातही काहीजण वरळीला जाऊन येऊन अस्तात. पण तिथं गेल्याव कळतं त्या मध्यप्रदेशात गेल्यात. तिकडंही त्या शिवराज भौचं तैई सारखंच करून ठिवलंय. दोन याद्या बाहेर आल्या पण अजूनबी तिथल्या शीएमचं तिकिट नै जाहीर झालं. विद्यमान शीएमची ही गत तर तैई कोण बाप्पा? झालं असेल बाप्पा त्यांना दुःख, असतील काही अडचणी, आली असेल आर्थिक तंगी, नसतील देत बँका कर्ज, झाला असेल कारखाना जप्त. पण म्हणून परळीच्या मतदारांवर राग काढून काय व्हणार है? परिक्रमेची सांगता हौवून 17 दिवस झालेत. लोक वाट बघत्यात. तैई कधी येणार इच्च्यारत्येत. कुणाला काही सांगाय जावं तर कार्यकर्ते रपकन तोंडावर पडत्येत हो.

बाप्पा – आम्हाला देखील तीच काळजी सतावते मुषका… छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरला असाच वेढा पडला होता. त्यावेळी छत्रपतींनी तह करीत 35 पैकी 23 किल्ले मुघलांना देऊन टाकले. नंतर ते परत मिळवले देखील. वेळप्रसंगी दोन पावलं मागं जावंच लागतं. मागे सरकल्याने त्यात काही कमीपणा नसतो. पुन्हा मोठी झेप घेण्यासाठी ही संधी असते. पक्ष म्हण्तोय लोकसभा… तर मग लोकसभा तर लोकसभा… शेवटी पक्षाचे संस्कार काय सांगतात? आधी देश, मग पक्ष अन् नंतर मी… पीएम नरेंद्रभाईंना देखील पक्षाचेच लोक गुजरातमध्ये पाय देखील ठेवू देत नसत. पण मोदी शांत राहीले. कुठे काही बोलत बसले नाहीत की शक्तीप्रदर्शन दाखवत फिरले नाहीत. पण 2002 मध्ये अशी वेळ आली की ते थेट मुख्यमंत्री म्हणूनच राज्यात परतले. राज्यात दंगली झाल्यामुळे त्यावेळी अमेरिकेने त्यांना व्हिसा नाकारला होता. पण त्याच अमेरिकेने ते पीएम होताच त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या होत्या. दुःख कोणाच्या वाट्याला नाही? स्वतः भगवानबाबांनाही कठीण काळ चुकला नाही.

मुषक- तुम्ही म्हणताय ते सगळं एकदम राईटंय. पण पंकजाताईंना हे कोणी सांगावं?

बाप्पा- कोणी म्हंण्जे? आज आम्ही सांगतच आहोत ना? थोरल्या तैईनी डोळे झाकून लोकसभा लढवावी. केंद्रात मिनिस्ट्री पण मिळेल. यात चुकीची तडजोड कैच नाही. झाला तर फायदाच है. तात्पुरता त्याग मधव्या तैईच्या वाट्याला येईल. हवं तर हा तह समजा. राजकारणात एखादी परिस्थिती बदलायला एक घंटाही पुरेसा असतो. परळीसाठी दोघा बहीण भावाची चांगली गट्टी जमली असेल तर उगं कुणी मिठाचा खडा टाकूच नै… भावकीसोबत भांडण कधीच चांगलं नस्तंय. त्यात कुणाचीच परगती होत नाय. माजलगाव मधव्या तैईसाठी बेस्ट ऑप्शन हैय. असंही माजलगावात भाजपा आयात उमेदवार देते. इतर आयातांपेक्षा मधव्या तै कितीबी उजव्या… त्येंना तिथं धोका व्हणार नै, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ हैय.

(दोघांचं संभाषण सुरू असतानाच तिथे एका तडफदार तरुणाची एन्ट्री होते. तो व्यक्ती जवळ येताच मुषक त्यांना कडकडून मिठी मारते. बाप्पाने काही विचारण्याआतच मुषक सांगायला सुरूवात करतो.)

मुषक- बाप्पा, इतक्या वर्षाच्या हयातीत, माझ्या बघण्यात इतका सच्चा माणूस मी कधीच नै पाहीला. बीडजवळच्या इमामपुरचा हा साधा तरूण आज थेट राज्याच्या शीएम सोबत सावलीसारखा अस्तो. सुरतची पैली ट्रीप असो नाय तर गुवाहटीची ट्रीप असो. माणूस थेट नियोजनात व्हता. ह्या माणसाला कामाख्या आई पण पावलेली है. माणूस इतका मोठा असुनबी माणसाला त्या गोष्टीचा कसलाच गर्व नाय. एका शिवसैनिकाचा पायी दिंडीत जाताना मृत्यू झाला तर शीएम साहेबांनी त्या सैनिकाला घर बांधून देण्याची जबाबदारी ह्याच्यावर टाकली. त्यानंही ती पूर्ण करून दाखवली. गावासाठी, आपल्या जिल्ह्यातील तरुण पोरांसाठी काहीतरी करायची सतत धडपड असते ह्यांची. आरोग्य सेवेचा यज्ञच त्यांनी सुरू केलाय. आजपर्यंत शेकडो रुग्णांना जीवनदान दिलंय त्यांनी. कुणाला कसलाबी आजार असू द्या, त्या रुग्णांच्या नातेवाईकांनी थेट बीडच्या रेणू हॉस्पिटलसमोरील त्यांच्या संपर्क कार्यालयात येऊन संपर्क करायचा… बाकी सगळं काम ह्यांची टीम करते. तम्हाला अजुनबी वोळखायला नसंल जमलं तर सांगून टाकतो हे बाजीराव चव्हाण… काल तुम्हाला म्हणलं व्हतं ना की एका खास माणसाची तुम्हाला भेट घालनू द्यायची म्हणून…
(मुषकाला वाटत होतं ते फक्त माझ्याच ओळखीचे. पण ते साक्षात बाप्पा… ते इतक्या चांगल्या माणसाला कसं काय नाय ओळखणार? त्यांनी स्मित हास्य केलं. बाजीराव यांनीही छोटी स्माईल देत बाप्पांना वंदन करून आरती केली. बाप्पांना आपल्या पाठीवर घेतलं. अन् विसर्जनासाठी शहागडच्या दिशेने निघाले. तिथे आधीपासूनच मराठा आरक्षणामुळे प्रसिध्दीस आलेले मनोज जरांगे पाटील हजारो कार्यकर्त्यांना घेऊन हजर होते. या सगळ्यांनी बाप्पांची पुन्हा एकदा आरती केली. जरांगे पाटलांनी ‘मराठा आरक्षणामागे लागलेलं विघ्न टळू दे’ म्हणत बाप्पांना साकडे घातले. बाप्पांनी जाता जाता बाजीराव चव्हाण यांना निरोप दिला. “ह्या माणसाचं आंदोलन वाया जावू देऊ नका. एकदाचा निर्णय होऊन जाऊ द्या. शीएमसाहेब समाजाचे हिरो होतील” असे सांगितले. बर्‍याच संवादानंतर सर्वांनी बाप्पांना जड अंतःकरणाने निरोप दिला.
आता बाप्पा आणि मुषकाने ब्रम्हाडांचा प्रवास सुरू केला. पण जाता जाता मुषकाला गोदावरी नदी वाळू माफीयाने प्रचंड पोखरलेली दिसली. आता आगामी ‘युध्द’ वाळू माफियांसोबत असल्याचे संकेत मुषकाने देऊन टाकले.)

Tagged