pankaja munde, jyoti mete, bajrang sonwane

ज्योतीताई मेटेंच्या उमेदवारीची शक्यता वाढली, बजरंग सोनवणे तिरुपती दर्शनाला

बीड

बालाजी मारगुडे, बीड

दि.18 : महायुतीचे भाजपा पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून पंकजाताई मुंडे Pankaja munde यांचे नाव जाहीर झाले असताना आता महाविकास आघाडीकडून कोणाची उमेदवारी येणार याविषयी जिल्ह्यात उत्सुकता आहे. सुरुवातीला डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे narendra kale यांच्या नावाची चर्चा होती. गावोगाव प्रचारही करीत होते. परंतु पंकजाताई मुंडेंची उमेदवारी जाहीर होताच त्यांचे नाव मागे पडले. त्यानंतर बजरंग सोनवणे bajrang sonwane यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. बजरंग सोनवणे यांनी ना. धनंजय मुंडे dhananjay munde, अजित पवार ajit pawar यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर ते महाविकास आघाडीसोबत येतील का? अशी शंका वाटू लागल्याने शरद पवारांकडून थेट ज्योतीताई विनायकराव मेटे jyoti mete यांना याबाबत विचारणा झाली. मागच्या दोन दिवसांपासून महाविकास आघाडीकडून त्याच उमेदवार येतील, अशा अटकली बांधल्या जात आहेत. परंतु दुसरीकडे सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बजरंग सोनवणे हे मंगळवारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील असे सांगितले जात आहे. नवी इनिंग सुरू करण्यापुर्वी सोनवणे हे बालाजीचा आशीर्वाद घेण्यासाठी रातोरात तिरुपती दर्शनाला पोहोचले आहेत

बीड लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे गेवराई, माजलगाव, बीड, परळी, केज आणि आष्टी असे सहा मतदारसंघ येतात. जिल्ह्यात मराठा आरक्षण प्रश्नाचा मोठा प्रभाव आहे. खासकरून मतदारसंघातील गेवराई, माजलगाव, बीड या विधानसभा मतदारसंघात त्याची तीव्रता जास्त आहे. परंतु मराठा आरक्षण प्रश्नावरून दोन समाजात तेढ होणार नाही, अशीच आपली पहिल्यापासून भुमिका आहे, असे म्हणत त्यांनी या प्रश्नावर कुठलेही वक्तव्य करणे टाळले होते. इतकंच नाही तर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात झालेल्या ओबीसी मेळाव्याला जाणेही त्यांनी टाळले होते. त्यामुळे महायुतीकडून पंकजाताई मुंडे या मराठा आरक्षण प्रश्नाला भेदून पुढे जावू शकतात असा भाजपा नेतृत्वाचा कयास आहे. त्यात पुन्हा मंत्री आणि त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांची ताकद जोडला आहे. म्हणून विद्यमान खा. डॉ. प्रीतमताई मुंडे pritam munde यांना डावलून भाजपने पंकजाताईंच्या नावाची घोषणा केली. परंतु इकडे महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार मराठा आरक्षण प्रश्नाचा लाभ उठविण्यासाठी एका चांगल्या मराठा उमदेवाराच्या शोधात आहेत. खूप सुरुवातीला त्यांनी माजी खा. जयसिंगराव गायकवाड jaysing gaikwad, भाई गंगाभिषण थावरे gangabishan thaware यांची नावे अजमावून पाहीली. त्यानंतर त्यांनी नरेंद्र काळे यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले. त्याच्यासोबत पवारांनी सुशीलाताई मोराळे sushila morale, धारूरचे प्रा. ईश्वर मुंडे ishvar munde यांच्याही नावाची चाचपणी करून पाहीली. मागच्या महिन्यात तर त्यांनी बीड आणि नाशिक येथे सीव्हील सर्जन म्हणून काम केलेले जिल्ह्याचे भुमिपूत्र डॉ. अशोक थोरात ashok thorat यांच्याही नावाची चर्चा करून पाहीली. परंतु डॉ. थोरात यांनी दोन्ही मुंडे भगिनींशी आपले कौटुंबिक संबंध असून त्या दोघी सोडून मी दुसर्‍या कोणाही विरोधात निवडणूक लढवेल, असे स्पष्ट सांगत त्यातून माघार घेतली. त्यानंतर पुढे पर्याय आला तो बजरंग सोनवणे यांचा. शरद पवारांना मागच्या सहा महिन्यात जो कोणी उमेदवार भेटायला जात होता, त्या प्रत्येकाकडे शरद पवारांनी ‘बजरंग सोनवणे उमेदवार म्हणून कसे राहतील’ असा प्रश्न करीत आवर्जुन विचारपूस केली होती. त्यावेळीच सर्वांच्या लक्षात येत होते की बजरंग सोनवणे हे शरद पवारांच्या संपर्कात आहेत. अखेर त्यांच्या समर्थकांनी दोन दिवसांपुर्वी केजमध्ये बैठक घेऊन बजरंग सोनवणे मित्र मंडळाची स्थापना केली. बजरंग सोनवणे हे ना. धनंजय मुंडे यांचे खासमखास म्हणून परिचित होते. त्यांनी जाहीर सभांमधून आणि पत्रकार परिषदांमधून माझी छाती फाडली तरी त्यात धनंजय मुंडे आणि अजितदादा दिसतील असे सांगत आपण त्यांचे निष्ठावंत असल्याचे सांगितले होते. परंतु केज नगर पंचायत निवडणुकीत सोनवणे यांची मुलगी डॉ. हर्षदा सोनवणे यांचा नगरसेवकपदाला पराभव झाला. आणि इथेच मुंडे-सोनवणे यांच्या मैत्रीत मिठाचा खडा पडला. सोनवणे यांनी जाहीरपणे धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आपल्या मुलीच्या पराभवाला जबाबदार असल्याचे सांगत उघड उघड नाराजी व्यक्त केली. त्यानंतर सोनवणे यांचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद देखील काढून घेण्यात आले.

मागच्या वर्षी अजित पवार यांनी बंड करीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळी जिल्ह्यातून बजरंग सोनवणे ह्यांनी सर्वात पहिल्यांदा अजित पवार यांच्यासोबत आपण राहणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर मराठा आरक्षण प्रश्न समोर आला आणि सोनवणे यांनी जाहीरपणे मराठा आंदोलनात आपला सहभाग नोंदवला.
आता त्यांनाच उमेदवार मिळेल, असे शरद पवारांच्या विश्वसनीय गोटातून सांगितले जात असतानाच अचानकपणे ज्योतीताई विनाकराव मेटे यांचे नाव महाविकास आघाडीकडून चर्चेत आले. स्व. विनायकराव मेटे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आण्णासाहेब पाटील यांच्यासोबत या प्रश्नावर लढा दिला. पुढे ते पाचवेळा विधान परिषदेवर विविध पक्षांकडून निवडून गेले. या काळात त्यांनी वेळोवेळी मराठा आरक्षण प्रश्न सभागृहात मांडण्याचे काम केले. मात्र या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी ज्याप्रमाणात लोकांची चळवळ उभी केली ती चळवळ विनायक मेटे यांना करता आलेली नव्हती. मनोज जरांगे पाटील यांचे अनेक उपोषण आणि आंदोलनं देखील स्व.विनायक मेटे यांनी मध्यस्थी करीत मिटवलेले होते. 14 ऑगस्ट 2022 रोजी मंत्रालयात मराठा आरक्षण प्रश्नावर सरकारने बैठक ठेवली होती. त्या बैठकीला जात असतानाच विनायकराव मेटे यांचा पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर अपघात झाला. त्यात त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्या नंतर विनायकराव मेटे यांच्या जागी त्यांच्या पत्नी ज्योतीताई मेटे यांना विधान परिषदेवर संधी द्या म्हणत कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. परंतु त्यांना ती संधी मिळाली नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता महाविकास आघाडीकडून त्यांना विचारणा झाल्यानंतर रविवारी (दि.17) त्यांनी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसंग्रामचे तानाजी शिंदे यांची देखील उपस्थिती होती असे कळत आहे. या बैठकीत काय चर्चा झाली हे समजू शकले नाही. परंतु आज शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची बीडमध्ये बैठक आयोजित करण्यात आली असून ज्योतीताई मेटे यांनी बीड लोकसभा लढवावी असा ठराव होण्याची शक्यता आहे.

सरकारी नोकरीचा राजीनामा दिला का?
ज्योतीताई मेटे या सहकार खात्यात विभागीय निबंधक लातूर या पदावर कार्यरत असल्याचे समजते. त्यांनी काही दिवसांपुर्वीच आपला राजीनामा शासनाकडे सादर केला होता. त्यांचा राजीनामा देखील मंजूर झाल्याची माहिती आहे. मात्र आपण राजीनामाच दिला नाही तर तो मंजूर कसा होईल? असा युक्तीवाद त्यांनी स्वतःच केला होता. पण जर त्यांनी राजीनामा दिला नसेल तर त्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या गाठीभेटी कशाला घेतील? आणि महाविकास आघाडीवाले देखील त्यांना लोकसभेसाठी कशाला विचारणा करतील हा प्रश्न आहे.

धनगर समजाच्या उमेदवारीमुळे पंकजाताईंची कोंडी
महायुतीचा घटकपक्ष म्हणून महादेव जानकरांचा रासप कार्यरत होता. परंतु जानकर हे देखील माढ्यातून महाविकास आघाडीच्या पाठींब्यावर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्यातच जानकर यांच्यापासून वेगळे झालेले रासपचे बाळासाहेब दोडतले balasaheb dodtale यांनी आपण पंकजाताई मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ओबीसींमधील एकगठ्ठा समजल्या जाणार्‍या धनगर समाजाच्या मतांची विभाजनी पंकजाताई मुंडेंसाठी डोकेदुखी ठरू शकते.

गावोगाव फॉर्म भरण्याची मेटे, सोनवणेंपुढे अडचण
मराठा आरक्षण प्रश्नावरून मराठा समाज प्रत्येक गावातून दोन फॉर्म भरणार आहे. मतांची ही विभागणी झाली तर ज्योतीताई मेटे किंवा बजरंग सोनवणे यांच्या अडचणी वाढवणार आहे. श्रीमती मेटे यांची उमेदवारी आली तर गावोगाव फॉर्म भरले जाणार नाहीत, असा एक मतप्रवाह जिल्ह्यात आहे.