AMOL KHUNE KOPARDI

मनोज जरांगेंचे सहकारी अमोल खुनेंवर भ्याड हल्ला

बीड

अर्धमसला फाट्यावरील घटना; मराठा समाजातून घटनेचा निषेध, आरोपींना अटक करण्याची मागणी

गेवराई दि.15 : मनोज जरांगे पाटील MANOJ JARANGE PATIL यांचे सहकारी तसेच कोपर्डी घटनेतील नराधमांना न्यायालयाच्या आवारातच चोप देणारे अमोल खुने AMOL KHUNE यांच्यावर अज्ञात तीन ते चार आरोपींनी दगडफेक करत भ्याड हल्ला केला. यामध्ये अमोल खुने हे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना गेवराई तालुक्यातील अर्धमसला फाट्यावर सोमवारी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास घडली असून घटनेनंतर आरोपी पसार झाले. दरम्यान भ्याड हल्ल्याची माहिती मिळताच हजारो मराठा समाज बांधवांनी रुग्णालयात धाव घेतली होती. यावेळी भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करत आरोपींना अटक करण्याची मागणी देखील करण्यात आली.

गेवराई तालुक्यातील धानोरा येथील अमोल खुने हे रहिवासी आहेत. मनोज जरांगे पाटील यांचे ते सहकारी असून मराठा आंदोलनात सक्रिय आहेत. तसेच कोपर्डी घटनेतील नराधमांवर न्यायालयाच्या आवारात हल्ला करणार्‍या चार जणांमध्ये अमोल खुने यांचा सहभाग होता. दरम्यान सोमवारी ते गेवराई येथे भाचीला सोडून परत आपल्या धानोरा या गावी दुचाकीवरून जात असताना गढी-माजलगाव महामार्गावरील अर्धमसला फाट्यावर अज्ञात तीन ते चार आरोपींनी अचानक त्यांच्यावर दगडफेक सुरु केली. यामध्ये अमोल खुने यांच्या डोक्याला दगड लागल्याने त्यांना गंभीर इजा झाली. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून अमोल खुने यांना उपचारासाठी गेवराई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या भ्याड हल्ल्याची माहिती मिळताच हजारो मराठा समाज बांधवांनी रुग्णालयात धाव घेऊन खुने यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत आरोपींना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. कोपर्डीच्या आरोपीच्या हल्ल्यातील इतर आरोपींनी मनोज जरांगे यांची साथ सोडलेली असली तरी अमोल खूणे मात्र शेवटपर्यंत मनोज जरांगे यांच्यासोबतच आहेत.