vidhansabha maharashtra

विधानसभेचा फड तयार, कोण मारणार बीडची कुस्ती?

बीड

बालाजी मारगुडे । बीड
दि.2 : बीड विधानसभेसाठी Beed Assembly constituency अनेकांनी शड्डू ठोकला आहे. सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, सर्वजातीय नेत्यांनी आपआपली आकडेमोड करून विजयाचा पट मांडून ठेवला आहे. 1995 साली महाराष्ट्रात ज्याप्रमाणे उलथापालथ झालेली होती, तीच संधी यावेळी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाच्या रुपाने आपल्यापर्यंत चालून आलेली आहे, त्यामुळे ‘अभी नही तो कभी नही’ असे म्हणत प्रत्येकाने विजयाचा निर्धार बोलून दाखवला आहे. मागच्या विधानसभेवेळी कोणतेही दोनच क्वचित प्रसंगी तीन पक्ष एकमेकांसमोर तगडे आव्हान उभे करून असायचे. त्यामुळे अमूक पक्षाची उमेदवारी आपल्याला मिळावी, यासाठी मोठी स्पर्धा असायची. परंतु प्रस्थापित घरातील कोणीतरी येऊन प्रमुख पक्षांची उमेदवारी घेऊन जायचा. यावेळी प्रथमच प्रस्थापितांना सामान्य कार्यकर्त्यांनी तगडे आव्हान उभे करून ठेवले आहे. त्यांची सारी गणितच विस्कटून टाकली आहेत. विधानसभेची जत्रा जवळ आली आहे. कुस्तीचा फड देखील तयार झालाय. आता कोणता पैलवान कुस्ती मारतो एवढीच प्रतिक्षा बीडच्या मतदारांना आहे.

महायुतीत कोणत्या पक्षाची जागा?
शिवसेना-भाजपा युतीच्या जागावाटपात बीड विधानसभेची जागा पुर्वीपासून बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे असायची. या जागेने प्रा. सुरेश नवले, प्रा. सुनील धांडे SUNIL DHANDE यांना आमदारकीची संधी दिली आहे. 2014 मध्ये भाजपा-शिवसेना स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपकडून विनायकराव मेटे तर शिवसेनेकडून अनिल जगताप यांनी निवडणूक लढवलेली होती. त्यावेळी मेटे यांना 70 हजारच्या आसपास तर अनिल जगताप ANIL JAGTAP यांना 35 हजारच्या आसपास मते मिळाली होती. या दोघांच्या लढाईत त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अखंड) चे जयदत्त क्षीरसागर यांनी विनायक मेटे यांचा 5 हजार मतांनी पराभव केला होता. पुढे 2019 च्या विधानसभेवेळी भाजपा-शिवसेना युतीत बीडची जागा पुन्हा एकदा शिवसेना (अखंड) पक्षाला सोडण्यात आली. यावेळी जयदत्त क्षीरसागर JAIDATTA KSHIRSAGAR हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून नशिब अजमावत होते. तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात त्यांचेच पुतणे संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस (अखंंड) पक्षाचे उमेदवार म्हणून रिंगणात होते. संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर यांचा 2 हजार मताने पराभव करीत आमदारकी आपल्या खिशात घातली होती. 2019 मधील पराभवानंतर जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत फारसे सक्रीय नव्हते. 2022 साली अखंड शिवसेनेत उभी फूट पडली. उध्दव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना या दोन्ही गटात जयदत्त क्षीरसागर सक्रीय नव्हते. आता भाजपा, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांची महायुती आहे. त्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून अनिल जगताप, भाजपाकडून राजेंद्र मस्के, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून डॉ. योगेश क्षीरसागर किंवा डॉ. सारिकाताई क्षीरसागर हे इच्छूक आहेत. यात पक्षाचे पारडे, उमेदवाराचे वैयक्तीक पारडे किती जड ठरणार त्यावर ही जागा कोणत्या पक्षाला सुटेल हे निश्चित होईल.

अनिल जगताप यांची लॉटरी लागणार का?
अनिल जगताप ANIL JAGTAP यांनी 15 वर्ष बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख म्हणून काम केले आहे. 2014 ला त्यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर बीड विधानसभेची निवडणूक देखील लढवलेली आहे. शिवसैनिकांना सांभाळून घेणारे, आपल्या रुबाबदार व्यक्तीमत्वाची जनसामान्यांवर छाप सोडणारे म्हणून त्यांची ओळख आहे. शिवसेनेतील फुटीनंतरही ते उध्दव ठाकरे यांच्यासोबत राहीले. मात्र वर्षभरापुर्वी त्यांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करीत त्यांच्या गोटात दाखल झाले. अनिल जगताप हे मराठा समाजाचे म्हणून त्यांना मनोज जरांगे पाटील यांचाही सपोर्ट मिळू शकतो. परंतु जरांगे पाटील हे एकनाथ शिंदे यांच्याशी कसे जुळवून घेतात त्यावर ही शक्यता आहे.

योगेश क्षीरसागर, सारिका क्षीरसागर दोघांपैकी कोण?
डॉ. योगेश क्षीरसागर YOGESH KSHIRSAGAR आणि डॉ. सारिका क्षीरसागर SARIKA KSHIRSAGAR यांच्या रूपाने क्षीरसागरांच्या एकोप्याच्या बंगल्याला दुसरा मोठा तडा गेला होता. काका जयदत्त क्षीरसागर कुठल्याच पक्षात जायचा निर्णय घेत नसल्याने या दोघा डॉक्टर पती पत्नीने दुभंगलेल्या राष्ट्रवादीतील अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे क्षीरसागर घरातच इच्छुकांची संख्या तीन झाली आहे. डॉ. योगेश की सारिका या दोघांपैकी योगेश क्षीरसागर हे अजित पवार यांच्या घड्याळ या निशाणीवर उभे राहतील असे चित्र आहे. संदीप क्षीरसागर कुटुंबातून बाहेर पडल्या नंतर जी काही ताकद काका जयदत्त यांची शिल्लक होती त्यात पुन्हा योगेश यांनी दोन भाग केले आहेत. योगेश यांची निवडणूक लढविण्याची आर्थिक क्षमता काका जयदत्त क्षीरसागर यांच्या बरोबरीने आहे. मनुष्यबळ देखील त्याच तोडीचे आहे. फक्त जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर यांच्या व्यक्तीमत्वाशी, जन संपर्काची डॉ. योगेश यांची तुलना केली तर योगेश क्षीरसागर मागे पडतात. पण डॉ. योगेश यांच्या जागी डॉ. सारिका क्षीरसागर यांचा विचार केला तर सारिका क्षीरसागर ह्या जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर यांच्या पेक्षा काकणभर जास्त सरस आहेत असे दिसते. सारिका क्षीरसागर यांना जातीपातीच्या पलिकडे सुशिक्षीत महिला म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाईल. ईतर राजकीय नेत्यांप्रमाणे त्यांना जातीच्या तराजूत तोलले जाण्याची शक्यता नाही. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आजच तीन गट आहेत. अमर नाईकवाडे, फारुक पटेल यांची जोडी डॉ. योगेश यांचे नेतृत्व मान्य करत नाहीत. तर बबन गवते यांचा दुसरा गट देखील डॉ. योगेश यांचे नेतृत्व मान्य करत नाही. भाजपा, शिवसेना (शिंदे) ह्या दोन्ही पक्षांनी बीडची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडलीच तर भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांचा पाठिंबा डॉ. योगेश आणि डॉ. सारिका क्षीरसागर यांना मिळण्यास कुठलीही अडचण नसणार आहे. माजी आ. अमरसिंह पंडित यांना मानणारा मोठा वर्ग बीड मतदारसंघात आहे. त्यामुळे ते कोणाच्या पाठीवर हात ठेवतात यावर हे देखील पहावे लागेल. तर पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मनात अजून काय आहे हे कोडे उलगडलेले नाही.

SANDIP KSHIRSAGAR
SANDIP KSHIRSAGAR संदीप क्षीरसागर

आ. संदीप क्षीरसागर यांची ताकद किती?
शरद पवार यांच्या गटात सध्या आ. संदीप क्षीरसागर Sandip Kshirsagar आहेत. 2019 ला अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी झाला, नंतर 2023 मध्ये शिंदे – फडणवीस यांच्या सरकार मध्ये अजित पवार सहभागी झाले. पण या दोन्ही वेळी आ. संदीप क्षीरसागर हे शरद पवार यांच्या सोबत राहिले. त्यामुळे मतदार संघात त्यांच्याबद्दल याची सहानुभूती आहे. नवगण राजुरीचा बंद कारखाना सुरू केल्यामुळे त्या भागातील शेतकरी आनंदात आहेत. पण शेतकर्‍यांची मते शेतकरी म्हणून त्यांना ग्राह्य धरता येत नाहीत. आ. संदीप यांच्या सोबत आजच्या परिस्थितीत एकही जुना सहकारी नाही. जीवाला जीव देणारे कार्यकर्ते नाहीत. ओबीसी मतदार त्यांना सहकार्य करण्याची शक्यता नाही. मराठा समाज त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा राहील याची कसलीच शाश्वती नाही. खा. बजरंग सोनवणे हे आ. संदीप क्षीरसागर यांना कितपत सहकार्य करतील याबाबत शंकाच आहे. त्यामुळे बदललेली राजकीय समीकरणे पाहता त्यांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय हा सर्वोतोपरी शरद पवार यांच्या हातात आहे.

JYOTI METE
JYOTI METE ज्योतीताई मेटे

ज्योतीताई मेटे काय निर्णय घेणार?
ज्योतीताई मेटे JYOTI METE या देखील बीड विधानसभा लढवणार आहेत. तशी त्यांनी घोषणा देखील करून टाकली असून सध्या त्या गावोगाव दौरे करत आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न, स्व. विनायकराव मेटे यांनी मराठा आरक्षण प्रश्नासाठी दिलेले बलिदान या बाबीमुळे ज्योतीताई मेटे यांच्यापाठी सहानुभूती असल्याचे लक्षात येते. परंतु ज्योतीताई यांच्याकडे सध्या कुठलाही पक्ष नाही. मध्यंतरी त्या शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक होत्या. पण आता तिकीट पदरात पाडून घेण्यासाठी त्यांच्यापुढे आ. संदीप क्षीरसागर यांचे मोठे आव्हान आहे. खा. बजरंग सोनवणे यांना लोकसभेत मेटे यांची मदत झाली असल्याने तिकीट मिळविण्यात सोनवणे हे मेटे यांच्यासाठी अडचण नसणार आहेत. ज्योतीताई मेटे यांना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचाही पाठिंबा मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या आजपर्यंतच्या राजकीय भूमिका पाहता उघड पाठिंबा मिळेल ही शक्यता फारच कमी आहे. पण ‘ह्याला पाडा त्याला पाडा’ अशी भूमिका जरांगे पाटलांची राहिली तर ज्योतीताई मेटे ह्या त्यांच्या निशाण्यावर नसतील.

BAJIRAO CHAVHAN बाजीराव चव्हाण

बाजीराव चव्हाण चेहरा होणार काय?
एकनाथ शिंदे यांच्या अगदी जवळ असलेले बाजीराव चव्हाण BAJIRAO CHAVHAN यांच्या नावाबाबत अलिकडे चर्चा सुरू आहेत. बाजीराव चव्हाण हे राजकारणाबाहेरील चेहरा असले तरी भविष्यातील राजकारणात आपला विश्वासू माणूस आमदार हवा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनात आले तर शिंदे गटाकडून प्रभावी तरूण चेहरा म्हणून बाजीराव चव्हाण यांचे नाव पुढे येईल. शिंदे गटातील गटबाजी, अजित पवार गटातील गटबाजी आणि भाजपातील गटबाजी या सगळ्यांवर एकच उत्तर म्हणून बाजीराव चव्हाण यांच्या सारख्या युवकांना देखील मोठी संधी यानिमित्ताने चालून आलेली आहे. त्यांनी मतदारसंघात प्रचाराची जोरदार तयारी देखील चालवलेली असून आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी स्कॉर्पिओ गाड्यांचे वाटप देखील केले आहे. त्यामुळे त्यांची मतदारसंघात जोरदार चर्चा आहे.

मनोज जरांगे पाटलांच्या पाठींब्यावर लढण्यास अनेकांची तयारी
मनोज जरांगे पाटील MANOJ JARANGE PATIL यांचा मोठा प्रभाव बीड विधानसभा मतदारसंघावर असल्याचे लोकसभा निवडणुकीत दिसून आले. त्यामुळे अनेकांना आमदारकीचे वेध लागले आहेत. त्यात आता सीए बी. बी. जाधव, प्रा. सुरेश नवले हे अग्रस्थानी आहेत. ते तुतारी आणि मनोज जरांगे पाटील या दोन्हीचा मध्य साधून निवडणूक रिंगणात उतरू इच्छित आहेत. याशिवाय जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय असलेले किशोर पिंगळे यांनी देखील आपल्या सुप्त इच्छा प्रकट केल्या आहेत.

मुस्लिम मतांचे गणित काय सांगते?
बीड विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मते ही निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. ओबीसीचे तीन उमेदवार (तीनही क्षीरसागर), मराठा समाजातून जगताप, मेटे, किंवा अन्य एखादा (सुरेश नवले, SURESH NAWALE राजेंद्र मस्के RAJENDRA MASKE, कुंडलीक खांडे KUNDLIK KHANDE, मनोज जरांगे पाटलांच्या पाठींब्यावरील एखादा) असे उमेदवार निवडणूक रिंगणात असतील तर ओबीसी आणि मराठा मतांची विभागणी होणार आहे. अशा परिस्थितीत मुस्लिम मते एकगठ्ठा मुस्लिम उमेदवाराच्या पाठीशी उभी राहीली तर या सगळ्या इच्छुकांचा टांगा पलटी होणार आहे. एमआयएम या पक्षाकडून अ‍ॅड. शेख शफीक SHAIKH SHAFIK उमेदवारी मिळवण्याची शक्यता आहे. याशिवाय आ. संदीप यांची उमेदवारी काटून शरद पवार हे देखील ऐनवेळी बीडमध्ये नवखा मुस्लिम चेहरा पुढे करू शकतात. एकदा सय्यद सलीम यांच्या रुपाने पवारांनी हा इतिहास घडवून दाखवलेला आहे.

JAIDATTA KSHIRSAGAR
JAIDATTA KSHIRSAGAR जयदत्त क्षीरसागर

जयदत्त क्षीरसागरांना ओबीसी साथ देतील का?
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर JAIDATTA KSHIRSAGAR ह्यांनी आजपर्यंत ओबीसी कार्ड खेळलेले आहे. यंदा त्यांनी पंकजाताई मुंडे यांच्या पराभवात खारीचा वाटा उचललेला आहे. त्यामुळे ओबीसी मतदार जयदत्त क्षीरसागरांना आपला नेता मानतील का हे एक कोडेच आहे. याशिवाय जयदत्त क्षीरसागर यांनी सोनवणे यांना खासदारकीपर्यंत नेवून पोहोचवलेले असले तरी मराठा समाज त्यांच्यासोबत जाईल का हे देखील एक कोडेच आहे. परंतु जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे एक हक्काची मतपेढी आहे. त्यांच्या या मतपेढीवर डॉ. योगेश आणि डॉ. सारिका क्षीरसागर सुरूंग लावतील का? असा देखील प्रश्न आहे.

RAJENDRA MASKE
RAJENDRA MASKE राजेंद्र मस्के

राजेंद्र मस्केंचे काय?
राजेंद्र मस्के RAJENDRA MASKE हे 2012 पासून जिल्हा परिषद सदस्य आहेत. शिवसंग्रामचे नेते स्व. विनायकराव मेटे यांच्या सानिध्यात त्यांची राजकीय जडण-घडण झाली. परंतु 2019 च्या विधानसभेच्या तोंडावर स्व. मेटे आणि राजेंद्र मस्के यांच्यात बेबनाव झाला. पंकजाताई मुंडे यांनी राजेंद्र मस्के यांना भाजपामध्ये घेत त्यांना बळ देण्यास सुरूवात केली. राज्य पातळीवर पंकजाताई आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अंतर्गत लढ्यात पंकजाताईंनी राजेंद्र मस्के यांची बीड विधानसभेची उमेदवारी देखील घोषित केली होती. परंतु लोकसभा निवडणुकीत भाजपाने सगळीच गणितं उलटी पालटी करून टाकत थेट पंकजाताईंना लोकसभेच्या मैदानात उतरवले. या निवडणुकीत बीड विधानसभेची संपूर्ण जबाबदारी ही राजेंद्र मस्के यांच्यावर टाकण्यात आली होती. परंतु मस्के त्यात सपशेल अपयशी ठरले. एकट्या बीड विधानसभेत पंकजाताईंना 62 हजार मतांची पिछाडी होती. त्यात त्यांचा साडेसहा हजार मतांनी पराभव झाला. याचं सगळं खापर राजेंद्र मस्के यांच्यावर फोडण्यात आलेले आहे. त्यामुळे एकूणच भाजपा पक्ष आणि पंकजाताई राजेंद्र मस्केंच्या पाठीशी उभे राहतील का ही शंकाच आहे.

ठाकरे गटाकडून कोण?
ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला तेथील जागा असे जागावाटप महायुती आणि महाविकास आघाडीत ठरलेले आहे. बीडमध्ये आ. संदीप क्षीरसागर हे शरद पवार गटाचे आमदार असल्याने ही जागा उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला जाण्याची शक्यता नाही. ठाकरेंच्या शिवसेनेला इथे प्रभावी चेहरा नसल्याने पक्षाची ताकद कमजोर पडलेली आहे.

AMARSINH PANDIT
AMARSINH PANDIT अमरसिंह पंडित

बीडसाठी मा.आ. अमरसिंह पंडितांचे नाव देखील चर्चेत
गेवराई विधानसभेत माजी आ. अमरसिंह पंडित AMARSINH PANDIT यांना तीन टर्मपासून मात मिळत आहे. त्यातच शिंदे- अजित पवार-भाजपा यांच्या महायुतीत ही जागा भाजपकडे आहे. तिथे भाजपचा विद्यमान आमदार आहे. अजित पवार यांच्या पक्षात अनेक इच्छूक आहेत. सगळे गट तट बाजुला सारायचे झाल्यास माजी आ. अमरसिंह पंडित यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जावू शकते. बदल्यात भाजपा गेवराईची जागा सेफ झोनमध्ये आणू शकतो. असेही अमरसिंह पंडित हे गेल्या अनेक वर्षांपासून बीड शहरात वास्तव्यास आहेत. बीडच्या निवडणुकीत ते निर्णायक भुमिकेत असतात.

Kundlik Khande
Kundlik Khande कुंडलीक खांडे

कुंडलीक खांडेंचा प्रभाव किती?
फिरायला भाजपाची गाडी अन् वाजवायला मात्र तुतारी या भुमिकेमुळे स्वतःच ऑडिओ क्लिपमुळे तोंडघशी पडलेले शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे KUNDLIK KHANDE हे देखील बीड विधानसभा लढविणार असल्याचे सांगितले जात आहे. खरे तर काही दिवसात त्यांची शरद पवार यांच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी वर्णी देखील लागणार होती. परंतु मध्येच क्लिप बाहेर आली आणि खांडे यांचे कांड उघड झाले. पण आता खांडे बीड विधानसभेसाठी रिंगणात उतरल्यास त्याचा फटका इतर मराठा उमेदवारांनाच बसणार आहे. सध्या ते बीडच्या जिल्हा कारागृहात आहेत. ते बाहेर आल्यास नक्की शक्तीप्रदर्शन करून आपली बार्गेनिंग पॉवर वाढवतील यात शंका नाही.

कार्यारंभला काय वाटते?
बीडमधील सगळी राजकीय मांडणी पाहता, लोकांमधील चर्चा ऐकता आणि वरीष्ठांचा बीडमधील आपआपल्या नेत्यांवरील विश्वास पाहता महायुतीमध्ये ही जागा अजित पवारांच्या पक्षाला सुटू शकते. त्यांच्याकडून डॉ. सारिका क्षीरसागर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. शरद पवारांच्या पक्षाकडून आ. संदीप क्षीरसागर यांचेच नाव पुन्हा एकदा पुढे येऊ शकते. लोकसभा निवडणुकीत काय झाले यापेक्षा शरद पवारांच्या प्रत्येक संकटात आ.संदीप क्षीरसागर त्यांच्या पाठीशी होते. ज्योतीताई मेटे, अनिल जगताप हे अपक्ष निवडणूक लढवतील. हे दोघेही मनोज जरांगे यांचा पाठींबा मिळविण्यासाठी प्रयत्नाची पराकष्टा करतील. जयदत्त क्षीरसागर हे देखील अपक्ष लढण्यासाठी तयार असून डॉ. योगेश क्षीरसागरांना ऐनकेनप्रकारे निवडणूक लढविण्यापासून रोखून धरण्यासाठी ते शेवटपर्यंत प्रयत्न करताना दिसतील. ही जागा अजित पवारांच्या पक्षाला न सुटल्यास जयदत्त क्षीरसागरांचा प्रश्न आपोआप सुटलेला असेल.