- तुमची नौटंकी अन् चालबाजी चालणार नाही
- विमा कवच मंडळनिहाय नव्हे तर गावनिहाय द्या
बीड, दि.16 : सोयाबीन पिकाच्या पायी शेतकर्यांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली तरी विमा कंपन्या त्यांचा हेका सोडायला तयार नाहीत. केंद्रात आणि राज्याच्या सभागृहात निवडून पाठवलेल्या प्रतिनिधींचं काम आहे की त्यांनी शेतकर्यांना पुरक असे निर्णय सभागृहात मंजूर करून घ्यायला हवेत. परंतु गोगलगाय आमचं सोयाबीन खाते तरी विमा कंपीनी म्हणते ते किटकामध्ये मोडत नाही, सलग 27 दिवस पावसाचा खंड पडतो तरी विमा कंपनी एक ते दिड मिलीमीटरचा पाऊस दाखवून विमा नाकारत आहेत. आता कंपन्यांची ही मग्रुरी कदापिही खपवून घेतली जाणार नाही. सभागृहात बसलेल्या लोकप्रतिनिधींनी आता मंडळनिहाय ही संकल्पना बदलून गावनिहाय संकल्पना अस्त्विात आणण्यासाठी प्रयत्न करावेत. आज किसान सभा दाखवत असलेलं रूमणं कंपन्यांसाठी आणि शेतकर्यांच्या जिवावर राजकारण करू पाहणार्यांसाठी इशारा असेल, असा खणखणीत इशारा अखिल भारतीय किसान सभेचे कॉ. अजय बुरांडे यांनी दिला आहे.
कॉ. बुरांडे म्हणाले, विमा कंपन्या जेव्हा करार करीत होत्या तेव्हाच त्यांनी शेतकर्यांच्या विरोधात टाकलेल्या अटी आणि शर्ती सभागृहात बसलेल्या लोक प्रतिनिधींच्या का लक्षात येत नाहीत. आम्ही वारंवार जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार यांना भेटून ही गोष्टी लक्षात आणून देत होतो. परंतु कोणीही याकडे लक्ष देत नसे. आज वेळ आल्यानंतर सगळेजण एकत्र आले याचं आम्ही स्वागत करतो. आज प्रत्येक गावात सोयाबीन पिकाचे नुकसान झालेले आहे. सुरुवातीलाच पाऊस जास्त झाला म्हणून आणि नंतर पावसाने खंड दिला म्हणून नुकसान झाले आहे. मात्र कंपन्या स्पॉटवरची परिस्थिती मान्य करायला तयार नाहीत. किसान सभेनं जेव्हा प्रशासन दरबारी लढा दिला तेव्हा कुठे महसुलचे अधिकारी, कर्मचारी शेतकर्यांच्या बांधावर येऊन पंचनामे करायला लागले. जिल्ह्यातील 86 महसूल मंडळात सोयाबीनचे नुकसान झालेले असून प्रशासनाने आधी 16, नंतर 10 आणि नंतर 21 असे मिळून 47 मंडळात सोयाबीनला अग्रीम मंजूर केला आहे. उर्वरित 39 महसूल मंडळ अजुनही अग्रीमपासून वंचित ठेवलेली आहेत. सरसकट नुकसान अग्रीम मिळायला हवा, अशी किसान सभेची मागणी आहे. प्रशासनाने याउपरही शेतकर्यांचं म्हणणं ऐकलं नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन उभारू असा इशाराही कॉ.अजय बुरांडे यांनी दिला आहे.
शेतकर्यांबद्दल कळवळा असल्यााबत ढोंग करू नका- जगदीश फरताडे
शेतकर्यांबद्दल खोटा कळवळा दाखवून आता अनेकजण पुढे आलेले आहेत. पण त्यांनी स्वतःला काही प्रश्न विचारावेत की या विमा कंपन्यांसोबत करार होत असतानाच तुम्ही शेतकरी विरोधातील नियामांवर का बोलले नाहीत? आता निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अनेकांना शेतकर्यांची काळजी वाटत आहे. परंतु आता ही लढाई शेतकरी पुत्रांनी हातात घेतलेली असून तो आता सोशल माध्यमांवरही फाईट देऊन वातावरण टाईट करू लागला आहे. किसान सभा शेतकर्यांना शेतकर्यांचे हक्क दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे जगदीश फरताडे यांनी सांगितले.
वर्गणी गोळा करून घरून भाकरी बांधून आले होते कार्यकर्ते
आजच्या किसान सभेच्या मोर्चाला शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र मोर्चा सभास्थळी येताच पावसाला सुरुवात झाल्याने नियोजन विस्कळीत झाले. मात्र अशाही वातावरणात अनेक शेतकरी भर पावसात सभेला प्रतिसाद देत होते. काहींनी तर सोबत आणलेल्या भाकरी सोडून त्या खात खात सभा ऐकली.