बाप्पांची स्वारी आज थेट बीडमध्ये दाखल झाली. बीडची झालेली अवकळा पाहून बाप्पा फारच चिंतेत होते. काही काही भाग तर असे होते की तिथे बाप्पांना चक्क नाकाला रूमाल बांधून शहर प्रदक्षिणा करावी लागली. बघावं तिकडं नुस्ता कचराच कचरा. बिंदूसरा काठोकाठ भरले तरी शहराला पंधरा पंधरा दिवस पाणी नै. मोकाट कुत्र्यांचा उच्छाद, खाटकाची जनावरं मुख्य रस्त्यावर दिवसभर पडून असलेली दिसत होती. बरसातीचे चार दोन थेंब पडायचा अवकाश अख्ख्या गल्ल्यात गुडघ्या ऐवढे पाणी साचते. हे सगळं चित्र पाहून बाप्पा आज प्रचंड संतापलेले होते. त्यांचे डोळे लालबूंद झाले होते. डोळ्यातून जणू त्यांच्या लाव्हा बाहेर पडत आहेत, असे जाणवत होते. इथं कोण जो कारभारी असेल त्याला मुसळात घालून कुटावं की काय असे विचार बाप्पांच्या मनात येत होते.
बाप्पांनी मुषकाला प्रश्न केला, “इथला नगराध्यक्ष कुठंय?” मुषक म्हणाले, “मागच्या तीन सालापासून पालिका बेवारस है. ओल्ड नगराध्यक्ष आता राजकारण मुक्त हैत”
बाप्पांनी पुन्हा संतापाच्या सुरातच प्रश्न केला. ते नसतील तर हिथल्या सीओंना बोलवा… आम्ही आल्याची त्यांना वर्दी दिली नाही का? मुषकाने सीओंना फोन लावला. पण फोन काय लागला नव्हता. मुषकाने पुन्हा पुन्हा ट्राय केला. अनेकदा बेल गेली पण फोन कट केला जायचा. मुषकाने बाप्पांना सांगितले,
“तुम्ही येणार हैत याचा सांगावा आम्ही आधीच धाडला व्हता. पण तुम्हीच काय ह्या देशाचे पीएम, राज्याचे सीएम आले तरी त्या येत नैत. त्येंन्च्यावर कुणाचा वरदहस्त है असेच बीडचे सगळेजण इच्चारतात. कुणी म्हणतं त्येंना आष्टीचे आण्णा ताकद देतात. कुणी म्हणतं त्येंना परळीचे आण्णा ताकद देतायत. या दोघांनी ताकद देता देता त्याच इत्क्या ताकदवान झाल्यात की अख्खं बीड त्या आता आपल्या नावचं करून घेत्याल असं दिस्तंय… तुम्ही नुस्ती बिंदूसरेच्या काठावर चक्कर मारा अख्ख्या शहराचा कचरा ट्रॅाल्यांमधून बिंदूसरेत ओतला जातोय. नदी बंद करून तिथं प्लॉटींग पाडायचा डाव दिस्तोय. आधीच क्षीरसागरांनी आर्धी बिंदूसरा ईकून टाकली आता उरली सुरली या बाईसाहेबांनी ईकायला काढलीये. ईशेष बात ही हाय की चांगल्या बांधकामाला मॅडम परवानगी नाय म्हणत्यात अन् नदीपात्रात, रस्त्यावर, ओढ्यात भराव टाकून बांधल्या जाणार्या बिल्डींगला एका दिवसात परवानगी देत्यात. जेलाच्या आजुबाजुला उंच इमारतीं जमत नाय. पण इथंबी गगनचुंबी इमारती डौलात उभ्या हाईती. फक्त एकदा तुम्ही नजर फिरवा, म्हंजी तुमच्या ध्यानात येईल की बाईसाहेबांनी बीडच्या बांधकामात काय काय झोल करून ठीवलाय”
“अजून अंदर की बात सांगतो, कुणी मोठा डाक्टर बांधकाम परवानगीला नगर पालिकेत आला की बाईसाहेब त्येंची बिल्डींग अनाधिकृत कशी याचं एक निवेदनच एका निवेदनकर्त्यांला द्यायला लावतात. मग बाईसाहेब त्येंची चवकशी करण्याचं नाटक करतात. मग वकीलाची राय घेतात. बांधकाम परवानगी मागायला आलेल्या डाक्टर लोकांना वाटतं आपण आरबी समुद्रात बांधकामाची तर परवानगी मागत नाय ना? मग उल्सेक दिवस झाल्यावर डाक्टर लोकांना कळतं. आपण गांधीची प्रतिमा भेट दिली नाय… मग जावून कुठं परवानगी मिळत्ये. पण तितक्यावर पण त्येंन्च समाधान होत नाय. मोठं गठूडं पदरात पाडून घेण्यासाठी एक टोळीच त्येंनी सांभाळली है. त्यात सामाजिक म्हणवून घेणारे कार्यकर्ते, वकील, पत्रकार असे सगळेच हायती. अन् डाक्टर लोक त्येंचं स्वॉफ्ट टार्गेट झालंय. मपलं खोटं वाटत असेल तर सिटीतल्या अनेक डॉक्टरांना इच्चारा”
बाप्पा ह्या बाईसायेबांची तक्रार घेऊन कलेक्टरांकडे गेलं तर कलेक्टरसायेब तर लैच म्हंजी लैच ‘कसनुसे’ शब्द वापरतात ह्यांच्याबद्दल. मग ह्यांची तक्रार नेमकी करायची कुणाकडं? असा प्रश्न बीडच्या जन्तेला पडतो.
बाईसायेबांच्या कामावर आमदार खुष नाहीत, हिथल्या नगरसेवकांना त्या गिणीत नाहीत. हिथले माजी आमदार केवढ्याचे म्हणून त्या इच्चारत नाहीत. जन्तेचं त्यांना घेणंदेणं नै. तरीपण गेल्या दोन वर्षापासून त्या हिथच हैत. ह्येंना बीडातून लांब हाकलणं गरजेचं हाय. त्ये कामबी जल्द व्हायला हवंय. बीडाच्या जन्तेनं काय पाप केलं असेल तर असू पण दहा जन्माचा बदला या बाईसायेबांनी दोन सालात घेतल्याचं जन्ता म्हणतेय. बाप्पा तुम्हीच ह्यांच्यावर एक जालीम उपाय करा”, असे म्हणत मुषक बाप्पांना आर्जव करीत व्हते.
मुषकाच्या तोंडून ऐकलेल्या सगळ्या इस्टोरीने बाप्पांच्या संतापात मोठीच भर पडली. बाप्पा म्हण्ले, ‘’घरात बाई असली म्हंजी जशी घराची शोभा अस्ते तसं समजून ह्यांना बीडला पाठवलं होतं. पण ह्यांनी सगळ्या बीडाची अवकळा करून ठेवलीये. बाई असल्याचा गैरफायदा किती घ्यायचा यालाही काही मर्यादा अस्त्यात. लवकरच ह्यांचा निपटारा होईल”, असे म्हणून मुषकानं राजकीय पदाधिकार्यांना छत्रपती शिवाजी महाराज चौकात येण्याचं फर्मान सोडलं.
- बालाजी मारगुडे, बीड
मो.9404350898
मुषकराज पर्व 5 वे भाग 8