नगर रोड, धानोरा रोड मार्गे बाप्पांची गाडी डिचाव डिचाव करीत बीडच्या नियोजित रेल्वे फलाटाकडे सरकत होती. मुषकाला चांगलेच दणके बसत व्हते. गचक्याने अंग मागेपुढे होत व्हते. पाठीच्या हाडाला बावकडा लागून अंगाचा पार बुकना झाला व्हता. धुरळ्याने डोळे कचकचत व्हते. अंगावरच्या कपड्याचं मातेरं झालं व्हतं. बाप्पा आज रेल्वेस्टेशनची पाहणी करून मग पदाधिकार्यांशी वार्तालाप करणार व्हते. सोबत बीडचे स्थानिकचे आमदार धनदीपभैय्या व्हते. खासदारांना फोन गेला व्हता. माजी खासदारांनाही निरोप व्हता. बाप्पा फलाटाकडे निघाल्याची वार्ता पदाधिकार्यांना होतीच. त्यांनी आधीपासून तिथे भल्यामोठ्या सत्काराचं नियोजन करून ठेवलं होतं. बाप्पा जसेच नियोजित स्थानकावर आले तशा घोषणा सुरू झाल्या. माजी खा. असलेल्या बारक्या तैयींनी त्यांचं जेसीबीतून फुलं उधळून स्वागत केलं. लागलीच आ.धनदीपभैय्यांनी दांडगा हार बाप्पांच्या गळ्यात घातला. आणि दोघांनीही स्थानकाची एक एक माहिती सांगायला सुरूवात केली. तेवढ्यात खासदार जबरंगबप्पांची एन्ट्री झाली. ते लांबूनच बारक्या तैयी आणि धनदीपभैय्यांना म्हणाले,
“पहिला मान माझा. मी खासदारंय या जिल्ह्याचा” त्यावर धनदीपभैय्यांनीही आवाज वाढविला… “कुठंबी त्योच डायलॉग अस्तोय का? म्हाईत हैना आता सार्या जिल्ह्याला तुमी खासदारंय म्हणून… तुम्ही खासदारंय पण आमच्याच जिवावर. थोडी नैय तर बीडातून 62 हजारची लीड दिली मनून तुम्ही खासदारंय हे टकूर्यात असू द्या” धनदीपभैय्यांना थांबवत खा. जबरंगबप्पांही आता आवाजाचा डेसीबल वाढवित म्हणाले “ही लीड कैय तुमची नै. ती आंतरवालीच्या माणसामुळं हाय”
त्यावर धनदीपभैय्यांनी बोलायला सुरू केले. “माझी नसू द्या पण निदान आंतरवालीची हैय हे तरी तुमी कबूल केलं म्हणायचं… म्होरल्या पाच सालात त्या आंतरवालीवाल्याचे उपकार तरी निदान इसरू नका म्हंजी झालं. नैयतर त्येलाबी आमच्यावाणी इच्चारणार तुह्या गावातून मला लीड किती सांग? आरं तुम्ही आमदार बघनात, तुम्ही झेडपीचा मेंबर बघनात, नगरसेवक बघनात, गावचा सरपंच बघनात. हर एकाला इच्चारताय तुह्या गावात मला लीड किती सांग? तुम्ही लै लोकप्रिय लागून गेला व्हय. तुम्हाला मतदान कुणी अन् का म्हणून द्यायचं होतं याचं एक तरी कारण सांगता का? मागच्या येळी आमीच तुमचा प्रचार केला व्हता. तुम्ही पडलात. कारण तवा लोक तुमाला वळखत नव्हते. पडल्यावर पुना कवा तोंड दाखविलं व्हतं का? निदान आमच्या इधनासभा इलेक्शनमधी एकांद्या गावाततरी तुमी प्रचाराला आला व्हताव का? मग इतका हक गाजवून आमच्याकडून कसल्या लीडची अपेक्षा करताय तुमी? एक मताने असू द्या नाहीतर साडेसहा हजाराने असू द्या, तुमी खासदार झालाय ह्येचा आनंद साजरा करायचा सोडून सारंखं सारखं ज्येला त्येला इच्च्यारताय मला लीड किती? खासदारासारखं वागा जरा. येणार्या इधानसभेत आमाला नाय सपूर्ट करायचा तर नका करू. पण असला आळ घेतल्यासारखं काय बोलू नका. तुतारीचा जिल्हाध्यक्ष हाय मी”
धनदीपभैय्याला शांत करीत मुषक बोलायला लागला. “गणपतीबाप्पा तुमी या जबरंगबप्पाला तुमच्या भाषेत समज द्या. निवडून आलेल्यानं म्होरलं बघून राजकारण करायचं अन् पडलेल्यानं काय चूक झाली ते बघून आत्मपरिक्षण करायचं अस्तं. पण हिथं उल्टं सुरूये. पडलेला आत्मपरिक्षण करीत नैय अन् निवडून आलेला मला कुठं कमी मतदान पडलंय ह्याच्याच शोधात है. मोठ्या तैयी मणल्या व्हत्या मी प्रत्येक गावात जाणार. नंतर त्येंना आमदारकी मिळाली अन् त्या यायचं इसरूनच गेल्या बगा. त्या अश्याच इसरत र्हायल्या तर बीडातले लोक कमळाचं फूल हे चिन्ह अस्तं ह्येच इसरून जात्याल” गणपतीबाप्पांनी हसतच मुषकाला प्रतिसाद दिला.
जबरंगबप्पा अन् धनदीपभैय्यांची वादावादी शांत झाल्यानंतर बारक्या तैयी बाप्पांच्या पुढ्यात आल्या अन् सांगू लागल्या. “माझ्या काळात नगरपासून बीडपर्यंत रूळ अंथरण्याची कामे झाली. पैकी शिरूरच्या विघनवाडीपर्यंत मी रेल्वे आणली. बीड ते परळी 25 टक्के काम माझ्याच काळात झालंय. ह्याच्यापुढचं जे काय काम होईल ते खासदारांनी करून घ्यावं. आम्ही वाट आखून दिली आहे. त्या वाटेवरून चालण्याचं काम खासदारांनी करावं. आमच्याकडे बोट दाखवून आपला वेळ घालू नये. म्हणजे 2026 पर्यंत परळीत रेल्वे जाईल” बारक्या तैयीला थांबवत मध्येच जबरंगबप्पा बोलू लागले.
“मुषकराव बाप्पांना सांगा, सगळी रेल्वे आपुन आण्ली. ह्येन्च्या काळात उल्सकच काम झाल्तं. पण मी खासदार झाल्या झाल्या, रेल्वे अधिकार्याची बैठक घेतली. तवा कुठं ह्या कामाला गती आली. म्होरल्या सालाचा सुर्य उगवायच्या आदी बीडच्या ह्या फलाटावर रेल्वे आली असेल. हा जबरंगबप्पाचा शब्दंय”
जबरंगबाप्पाचं बोलणं ऐकून मुषक बोलू लागले “र्हावू द्या जबरंगबप्पा. तुमचे असले लै शब्द व्हते. बिचारा तुमचा पीए बालाजीला मतदानाच्या आठ दिवस आधी फोन बंद करून बसावं लाग्लं व्हतं. नव्हं तुमचीच आयडीया व्हती ती. माजलगावच्या शेतकर्यांना ऊस न्यायचा शब्द दिलाय तुमी. तुमचा शब्द किती खरा होतो हे पुढच्याच महिन्यात दिसून येईल. तुमी लै जणांना आमदार करतो म्हणून शब्द दिलाय. धनदीपभैय्यांना तर तुमचा अनुभव आलाचय पण अजून भागवतय, जईदत्तआण्णायत. काईजण पायपात हाईत. केजात साठे सायेबांना डावलून घाडगेंना जवळ करताय. गेवराईत पुजातैला सोडून दुसराच उमेदवार द्यायचा प्लॅनंय तुमचा. ज्या मैबूबनं तुमचं तिकिट आणलं त्याच मैबूबची आष्टीत ताकद नाय म्हणताय… तुमाला पक्षानं तिकिट दिलं तवा तुमची ताकद किती व्हती सांगा जरा. ह्या पोरासोरांना निवडून आणायची जबाबदारी तुमी तुमच्या खांद्यावर घ्यायला पाह्यजे व्हती. माजलगावचं तर मी नविनच ऐकतोय… नारायणराव, राधाकिसनअण्णा, भाई, चेअरमन या सगळ्यास्नी बाजुला सारून तुमी तुमच्या पत्नीलाच तिकिट द्या म्हणून पक्षाच्या मागे लागलाय. काय खरंय का हे?” अस्स बोलून मुषकानं जबरंगबप्पाला आरसा दाखविला. त्यावर जबरंगबप्पा म्हणले “फक्त आमचचं सांगा… तिकडे चुलत्या पुतण्यांची गुप्त बैठक झाली, त्यात काय काय झाले हे नका सांगू… सगळे ‘सागर’ मिळून ‘महासागर’ व्हायलेत असं ऐकलंय ते पण कळूद्या जन्तेला”
सगळा इच्का आजच व्हायला नको म्हणत गणपतीबाप्पांनी मुषकाला आवरते घेण्याचे फर्मान सोडले. “तेवढं शेतकर्यांच्या पीकईम्याचं बघा”, अशी सुचना बाप्पांनी खासदारांना केली. “आता आजची बैठक हिथच थांबवूया. बाकी पदाधिकार्यांना उद्या बोलूया” म्हणून गणपतीबाप्पांनी आजची चर्चा इथंच थांबवली.
- बालाजी मारगुडे, बीड
मो.9404350898