विजयसिंह पंडित यांना अलिंगन देत दिल्या शुभेच्छा
गेवराई, दि.30 : विजयराजे विजयी व्हा, मी आणि संपूर्ण महायुती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. 2019 च्या निवडणुकीत हुकलेली संधी पुन्हा मिळाली आहे. लहान भावाच्या विजयासाठी ताकतीने प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन ना.धनंजय मुंडे यांनी केले. गेवराई विधानसभेचे महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची परळीतील पंढरी निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ना.धनंजय मुंडे यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीत विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या, त्यांच्या मातोश्रींनी विजयसिंह पंडित यांना गोड खाऊ घालून आशीर्वाद दिला. ‘जसा धनंजय तसा माझ्यासाठी विजय’ असल्याचे भावनिक उद्गारही त्यांनी यावेळी काढले.
विजयसिंह पंडित यांनी उमेदवारी संदर्भाने आभार व्यक्त करत धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा केली. यावेळी दोहोंमध्ये अतिशय भावनिक संवाद झाला. ना.मुंडे यांनी विजयसिंहाना आलिंगन देऊन गळा भेट घेतली. विजयराजे तुम्ही विजयी व्हा अशा शुभेच्छा त्यांनी विजयसिंह पंडित यांच्या विजयासाठी दिल्या. यावेळी धनंजय मुंडे म्हणाले सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत केवळ तांत्रिक पराभवामुळे तुमची संधी हुकली होती. यावेळी तुमचा विजय नक्की होणार आहे. लहान भावासाठी हा धनंजय ताकतीने तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मी आणि महायुती आपल्या पाठीशी उभे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
विजयसिंह पंडित यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मातोश्रींचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यांनी गोड खाऊ घालून विजयसिंहाना निवडणुकीत विजयासाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले. जसा माझ्यासाठी धनंजय तसा विजय सुद्धा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पंडित आणि मुंडे परिवाराचे भावनिक संबंध असल्याचे उपस्थितांनी अनुभवले. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री म्हणून धनंजय मुंडे यांनी दिलेल्या शुभेच्छा विजयसिंह पंडित यांच्या साठी अतिशय मोलाच्या आहेत. धनंजय मुंडे यांनी विजयसिंह पंडित यांचा पारिवारिक वातावरणात सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, गोविंदराव देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महायुतीकडून गेवराई विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाल्या बद्दलही विजयसिंह पंडित यांनी धनंजय मुंडे यांचे आभार मानले.