बीडमध्ये आ.संदीप क्षीरसागर आणि नगरसेवक योगेश क्षीरसागर यांच्यात चांगलाच राजकीय खेळ सुरु झालाय
बालाजी मारगुडे । बीड
दि.19 : बीडमध्ये क्षीरसागर घराण्यातील भाऊबंदकी आता सर्वश्रुत झाली आहे. आ.संदीप क्षीरसागरांनी काका जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केल्यानंतर आता संदीप क्षीरसागर यांचे सख्खे चुलत बंधू नगरसेवक योगेश क्षीरसागर पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरले आहेत. मागील काही दिवसापुर्वी एका विकासकामाच्या उद्घाटननिमित्ताने आ.संदीप क्षीरसागर यांनी ‘पुष्पा’ सिनेमामधील ‘झुकेगा नही साला’ हा मारलेला डायलॉग सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आता नगरसेवक योगेश क्षीरसागर यांनीही डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांच्या अभिष्टचिंतनाच्या निमित्ताने आयोजित संगीत रजनी कार्यक्रमात ‘मै हुँ डॉन’ हे गाणे गायले. आता या गाण्याचा व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हीडिओखाली कार्यकर्त्यांनी ‘पुष्पाला सांगा डॉन आलाय’ म्हणत प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
बीड नगर परिषदेच्या निवडणुकीतून डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी आपले चिरंजीव नगरसेवक डॉ.योगेश क्षीरसागर यांना पुढे करीत ‘योगेश पर्व’ सुरु झाल्याचे अधिकृत जाहीर केले आहे. त्यामुळे येणार्या निवडणुकीत माजी मंत्री क्षीरसागर आणि नगराध्यक्ष क्षीरसागर यांचा नगरपालिकेतील चेहरा म्हणून योगेश क्षीरसागर हेच असणार आहेत. तर आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडून त्यांचे बंधू उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांना पुढे केलेलं आहे. ओबीसी आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबीत असल्याने निवडणुका कधी होतील हे सांगता येत नाही. मात्र दोन्ही क्षीरसागरांकडून पालिका ताब्यात घेण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. नगरसेवक डॉ.योगेश क्षीरसागर आणि त्यांच्या पत्नी डॉ.सारिका क्षीरसागर गल्लोगल्ली मतदारांच्या थेट गाठी-भेटी घेत आहेत. संक्रांतीचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम असो की शिवजयंतीचा… दुकानाचे उद्घाटन असो की कार्यकर्त्यांचा वाढदिवस प्रत्येक ठिकाणी डॉ. योगेश क्षीरसागर हजेरी लावून आता मैदानात ‘मी आलोय’ हा संदेश आमदार क्षीरसागर यांना देत आहेत. शिवजयंती निमित्ताने दोन्ही क्षीरसागर बंधूंनी आज शिव चरित्रावर आयोजित ‘लेझर शो’चे आयोजन केले आहे. दोघांचेही हे ‘शो’ तेवढेच तोलामोलाचे असणार आहेत. त्यामुळे बीडकरांना आज एक नवी पर्वणी मिळत आहे.