death

अल्पवयीन मुलीचा विहीरीत आढळला मृतदेह

क्राईम न्यूज ऑफ द डे

जामखेड ः तालुक्यातील डोणगाव येथे इयत्ता बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थीनीचा मृतदेह विहीरीत तरंगताना आढळुन आला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर मुलगी तीन दिवसांपासून बेपत्ता होती. याबाबत जामखेड पोलिस स्टेशनला नातेवाईकांनी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी एका संशयितास पोलीसांनी ताब्यात घेतली आहे. हत्या की आत्महत्या याबाबत पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, डोणगाव येथील इयत्ता बारावीची विद्यार्थीनी मुक्ता संभाजी वारे (वय 17 रा.डोणगाव (मुळ रा. रत्नापुर ता.जामखेड) ही गुरुवारी सायंकाळपासून बेपत्ता होती. त्यामुळे नातेवाईकांनी रात्रभर तिचा शोध घेतला पण ती सापडून न आल्याने मुलीचे आजोबा शहाजी कोंडीबा यादव यांनी दुसर्या दिवशी म्हणजे शुक्रवारी जामखेड पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर तिसर्‍या दिवशी शनिवारी सदर मुलीचा शोध घेत आसताना नातेवाईकांना तिचा मृतदेह सकाळी साडेदहा वाजता डोणगाव येथील तिच्या घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील किन्हीचा ओढा येथिल विहीरीत तरंगताना आढळून आला. यानंतर डोणगावचे पोलीस पाटील बिभीषण यादव यांनी सदरची घटना जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना कळवली. त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक संजय बोकील, पोकॉ.शिवाजी भोस, बाजीराव सानप, गणेश साने, अजय साठे, विष्णू चव्हाण, शेषराव म्हस्के यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने सदरचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आला व शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकारी डॉ.युवराज खराडे यांनी शवविच्छेदन केले. या प्रकरणी मुलीचे वडील संभाजी रामभाऊ वारे (रा.रत्नापूर) यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरीवरुन जामखेड पोलिस स्टेशनला सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मयत मुलगी मुक्ता वारे ही अरणगाव येथे इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत होती. तीचे मुळ गाव रत्नापूर असून ती आपल्या डोणगाव येथील मामाच्या गावी आजी आजोबांकडे लहानपणापासून राहत होती. ती अतिशय शांत स्वभावाची होती. मात्र तिचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. मुलीची हत्या का आत्महत्या याबाबत पोलिस तपास करत आहेत. या घटनेप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.

Tagged