narendra modi in ladakh

पंतप्रधान मोदी अचानक लडाखमध्ये दाखल

देश विदेश न्यूज ऑफ द डे

लडाख, दि.3 : भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी अचानक लेहमध्ये दाखल झाले. सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी याठिकाणी आल्याचे सांगितले जात आहे. सरलष्करप्रमुख बिपीन रावत हे देखील मोदींसोबत लेहमध्ये आले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍यात काय घडणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. 

या दौर्‍यात पंतप्रधान मोदी गलवान खोर्‍यातील धुमश्चक्रीत जखमी झालेल्या भारतीय जवानांचीही भेट घेणार आहेत. लेहमध्ये आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी वायूदल, पायदळ आणि इंडो-तिबेट सीमा दलातील सैनिकांची भेट घेतल्याचे समजते.

गलवान खोर्‍यात 14 जूनच्या रात्री भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली होती. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते. यानंतर भारत आणि चीनमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन्ही बाजूच्या सैन्याधिकार्‍यांमध्ये झालेल्या बैठकीत हा प्रश्न सामोपचाराने सोडवायच्या, असे ठरले असले तरी भारत आणि चीनकडून लडाखमधील सैन्याची संख्या वाढवण्यात आली आहे. तसेच दोन्ही देशांकडून सीमाभागात मोठ्याप्रमाणावर युद्धसामुग्री तैनात केली जात आहे.

यापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लडाखचा दौरा करणार होते. परंतु, हा दौरा ऐनवेळी रद्द करण्यात आला होता.. यानंतर आता थेट पंतप्रधान मोदीच लेहमध्ये दाखल झाल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. तत्पूर्वी आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनला एकटे पाडण्यासाठी भारताने कूटनीतीचा अवलंब करायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी नुकतीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. या चर्चेत भारत आणि रशियातील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूूत करण्यावर एकमत झाले. भारताच्यादृष्टीने ही बाब अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Tagged