MAJALGAON DAM

माजलगाव धरणातून केव्हाही पाणी सुटू शकते

न्यूज ऑफ द डे माजलगाव

पाणी पातळी 94 टक्क्यांपुढे सरकली

माजलगाव, दि.15 : बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेले माजलगाव धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. मंगळवारी रात्री आठ वाजता धरणाची पाणी पातळी 94.10 टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्रीतून पाऊस झालाच तर हे धरण 100 टक्के भरून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे प्रकल्पाखालील सिंदफणा नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

माजलगाव धरणात सध्या 7848 क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. धरणाच्या पााणी पातळीत मागील काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पैठण येथील जायकवाडी प्रकल्प हा पुर्ण क्षमतेने भरल्याने जायकवाडीच्या उजव्या कालव्याव्दारे 400 क्युसेकने पाणी माजलगाव धरणात येत आहे. 11 सप्टेंबर रोजी धरणाची टक्केवारी 90 टक्के होती. तर 15 सप्टेंबर रोजी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने दिवसभर चांगली हजेरी लावल्याने धरण क्षेत्रात 7848 क्युसेकने आवक सुरू आहे. बिंदुसरा प्रकल्पही भरून वाहू लागल्याने माजलगाव धरण रात्रीतून भरण्याची दाट शक्यता आहे.

नागरिकांनी सतर्क रहावे – बी. एम.शेख
माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाण्याची आवक वाढली असल्याने कोणत्याही क्षणी धरण 100 टक्के भरू शकते. त्या बाबत आम्ही नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगून आपले पशू, साहित्य नदीकाठी ठेऊ नये, असे अवाहन माजलगाव धरण अभियंता बी. एम.शेख यांनी केले आहे.

Tagged