उभ्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक; ‘अंबासाखर’चा कर्मचारी गंभीर जखमी

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे

बर्दापूरजवळील घटना; अन्य एकास किरकोळ मार

अंबाजोगाई : टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून आलेल्या दुचाकीने धडक दिल्याने अंबासाखर कारखान्याचा एक कर्मचारी गंभीर जखमी झाला. ही घटना तालुक्यातील बर्दापूरजवळील शेतकरी धाब्यासमोर शनिवारी (दि.29) साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. यातील अन्य एक जण किरकोळ जखमी असल्याची माहिती आहे.

गणपत हरिश्चंद्र बरिदे (वय 59, रा.गव्हाण ता.रेणापूर जि.लातूर), तुकाराम सोपान वाघमारे (वय 45, रा.बामणी, ता.रेणापूर जि.लातूर) अशी अपघातात जखमी झालेल्या कर्मचार्‍यांची नावे आहेत. यातील गणपत बरिदे हे अंबासाखर कारखान्यात इंजिनिअरिंग विभागात बॉयलिंग हाऊस फिटर हेल्पर तर तुकाराम वाघमारे हे उत्पादन विभागात कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. नेहमीप्रमाणे दुपारी 12 ते संध्याकाळी 8 यावेळेत कामाची शिफ्ट पूर्ण झाल्यानंतर दोघे दुचाकीवरून (क्र.एम.एच. 24 ए.एन.1633) लातूरच्या दिशेने आपापल्या गावाकडे जात होते. त्यांना टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभे असलेले ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर व ट्रॉली (दोन्ही विना क्रमांक) दिसून आल्या नाहीत. त्यामुळे दुचाकी पाठीमागून जाऊन आदळली. यात गणपत बरिदे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या पायाला गंभीर ईजा झाल्याने त्यांना लातूर येथील रूग्णालयात नेण्यात आले आहे. तर तुकाराम वाघमारे यांना किरकोळ मार असल्याची माहिती आहे. दरम्यान, या घटनेची पोलिसात नोंद झाली नव्हती.

Tagged