paithan

धक्कादायक! कोरोना केअर सेंटरच्या खिडकीतून रुग्णाला नातेवाईकांकडून जेवण

कोरोना अपडेट क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा

कोरोना सेंटरच्या नियमाचे थेट उल्लंघन, दोघांवर गुन्हा दाखल 

चंद्रकांत अंबिलवादे 

पैठणः शहरातील कोविड सेंटरमध्ये पॉझिटिव्ह रुग्णास निगेटिव्ह ठरविण्याची घटना ताजी असतानाच तालुक्यातील पाचोड येथे कोविड बाधिताना पाचोड येथील कोविड सेंटरच्या मागच्या बाजूने खिडकीतून खाद्यपदार्थ पुरविले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. तसेच पोलीस बंदोबस्तात असताना बाहेरून कोरोना बाधिताच्या नातेवाईक थेट खिडकी पर्यंत पोहचतात कसे यावर ही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

       पैठण तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना साथीचा फैलाव झाल्यामुळे बाधित रुग्णांना आरोग्य विभागामार्फत गावालगतच अधिक उपचार व सुविधा मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून शहरासह ग्रामीण भागातील महत्त्वाच्या ठिकाणी पाचोड येथे सुसज्ज कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांच्या देखभालीसाठी विविध शासकीय कर्मचार्‍यांसह पोलिसांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तरी देखील येथील सेंटरवर चक्क रुग्णाचे नातेवाईक खिडकीतुन खाद्य वस्तू पुरवित असल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवार दि.14 रोजी दुपारी उघडकीस आला आहे. यामुळे बाधित रुग्णाच्या संपर्कात येऊन कोरोना साथीचा फैलाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या सेंटरवर मोठ्या प्रमाणावर पोलिस सुरक्षा असतानाही हा प्रकार घडल्यामुळे स्थानिक पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे मंगळवारी दुपारी पाचोड येथील कोरोना केअर सेंटरची पाहणी विभागीय उपायुक्त विजयकुमार फड यांनी केली. यावेळी त्यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, चंद्रकांत शेळके, मंडळ अधिकारी तलाठी उपस्थित होते. त्यानंतर सदर प्रकार उघडकीस आल्याने कोविड सेंटरच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान या प्रकरणी कोरोनाग्रस्त रुग्ण व त्याला खाद्यपदार्थ पुरविणार्‍या बाप्पासाहेब आसाराम येळे याच्या विरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात 188, 269, 270, 34 भादवी 51(ब)आपत्ती व्यस्थापन कायदा 2005 कलम 2, 3 साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोकॉ मोहिते पुढील तपास करीत आहे.

Tagged