केंद्रप्रमुख पदाचे शिक्षकांकडील पदभार काढले

केज न्यूज ऑफ द डे

केज : केेंद्रप्रमुखांच्या नियमबाह्य पदभार प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी आदेश देऊनही केजच्या गटशिक्षणाधिकार्‍यांकडून कार्यवाहीस विलंब केला जात होता. याप्रकरणी केज पंचायत समितीच्या सभापती परिमळा विष्णू घुले यांनी सूचना केल्यानंतर तातडीने तालुक्यातील शिक्षकांकडील केंद्रप्रमुख पदाचे पदभार शुक्रवारी काढण्यात आले आहेत.

  केज तालुक्यासह अन्य तालुक्यातही केेंद्रप्रमुखांच्या पदाचा नियमबाह्यरित्या शिक्षकांकडे पदभार सोपविण्याचा प्रताप गटशिक्षणाधिकार्‍यांनी केला आहे. विशेष म्हणजे केज पंचायत समितीने तर केंद्रप्रमुखांचा पदभार हा शिक्षकांकडे सोपवू नये याबाबतचा सर्वानुमते ठराव घेतलेला असतानाही गटशिक्षणाधिकार्‍यांनी मनमानी कारभार करत शिक्षकांकडे पदभार दिले होते. याची माहिती पदाधिकार्‍यांसह वरिष्ठांपासून लपवून ठेवली होती. ‘कार्यारंभ’ने हा गैरप्रकार चव्हाट्यावर आणल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी तातडीने कार्यवाही करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु केजच्या गटशिक्षणाधिकार्‍यांकडून कार्यवाहीस विलंब होत होता. त्यामुळे सभापती परिमळा विष्णू घुले यांनी सूचना करताच तातडीने कार्यवाही पूर्ण झाली आहे. दरम्यान, पंचायत समितीचा ठराव डावलून नियमबाह्य पदभार दिल्याप्रकरणी गटशिक्षणाधिकार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची गरज आहे.

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged