प्रतिनिधी । मुंबई
दि.12 : सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. ‘एका अभिनेत्याने आत्महत्या केली हे दुर्दैवी आहे. हे व्हायला नको होतं. पण ज्या पद्धतीने मीडियात चर्चा होत आहे त्याचं आश्चर्य वाटतंय’ असं शरद पवार म्हणाले. शिवाय पार्थ पवार यांनीच सीबीआय चौकशीची मागणी केली याबद्दलही त्यांनी पार्थ पवार यांना चांगलेच फटकारले. पार्थ काय म्हणतो याला मी कवडीचीही किंमत देत नाही, पार्थची मागणी अपरिपक्व असल्याचे असे सांगून त्यांनी राजकीय वातावरण चांगलच तापवलं आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यातील बैठकीनंतर पवार यांनी माध्यमांना याबाबत प्रतिक्रिया दिली.
पवार म्हणाले, सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर सदर प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पवार यांनी सीबीआय तपासाबाबत मत मांडताना, महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस सक्षम असून त्यांच्यावर मला 100 टक्के विश्वास आहे. पण तरीही सीबीआय किंवा इतर यंत्रणेने तपास करावा असं वाटत असेल तर मी त्याला विरोध करणार नाही. चौकशी कोणी करायची हा राज्य सरकार, सीबीआयचा प्रश्न आहे. यावेळी शरद पवार यांना सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे का ? असे विचारण्यात आले असता यामागे नेमका काय हेतू आहे हे मी सांगू शकत नाही असही शरद पवार म्हणाले.
दरम्यान पार्थ पवार गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. राममंदिर निर्माणात पार्थ यांनी घेतलेली भुमिका शरद पवारांच्या भुमिकेशी विसंगत होती. आताही त्यांनी सुशांत सिंह प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करून महाविकास आघाडीत बिघाडी करण्यासाठी पावलं टाकल्याचं बोललं जात आहे.
शरद पवार यांच्या या प्रतिक्रीयेनंतर पार्थ पवार यांनी आणि सुनेत्रा पवार यांनी काहीही प्रतिक्रीया देण्यास नकार दिला. तर अजित पवार यांची आतापर्यंत प्रतिक्रीया समजू शकली नाही. मात्र यापुर्वीच सुप्रीया सुळे यांनी पार्थ यांची भुमिका हे त्याचं वैयक्तिक मत असल्याचे सांगितले होते.
मात्र पवारांच्या या वादात आता नितेश राणे यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून म्हटले की, आज परत सांगतो.. पार्थ.. लंबी रेस का घोडा है !!! थांबू नकोस मित्रा !! असं ट्विट करत पार्थ यांच्या भवितव्य उज्वल असेल असं भाकीत केलं आहे.
भाजपचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले की, पार्थ यांच्याबाबतीत शरद पवारांनी जे विधान केले ते एखाद्या तरुण मुलाचं खच्चिकरण करण्याचा प्रयत्न आहे.
