SRT HOSPITAL AMBAJOGAI

स्वारातिमध्ये कोरोनाच्या मृत्यूचा वेग वाढला; 14 तासात सात जणांचा मृत्यू

अंबाजोगाई कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे

सहा कोरोना बाधीतांसह ड्युटीवरील कर्मचार्‍याचाही अचानक मृत्यू

अंबाजोगाईत 4, परळीत 1 आणि केजमधील 1 रुग्णाचा समावेश

अंबाजोगाई, दि.12 : वाढत चाललेल्या कोरोनाच्या संसर्गाने जिल्हाभरातील नागरिकांत दहशत पसरलेली असतानाच मंगळवारच्या रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात अत्यावस्थेत उपचार घेणारे सहा रुग्ण दगावले. मृत्यू पावलेल्यांमध्ये तीन पुरुष आणि तीन महिला रुग्णांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण अंबाजोगाई, परळी आणि केज तालुक्यातील आहेत. तर सातवा मृत्यू हा आरोग्य कर्मचार्‍याचा झाला असून त्याला रात्रीच कोविड वॉर्डात ड्युटी देण्यात आली होती. मात्र तो कोरोना बाधीत आहे की नाही हे दुपारी तपासण्यात आले असता त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची माहिती स्वारातिमधील सुत्रांनी दिली.

या घटनेची अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलेला असून हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बीड, अंबाजोगाई, परळी, केज, माजलगाव, आष्टी या सहा प्रमुख शहरांत आजपासून संचारबंदी लागू केली. मात्र रात्री स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कोरोनारुपी यमाने अक्षरश: तांडव केला. मंगळवारच्या रात्रीपासून आज सकाळपर्यंत अत्यवस्थेत उपचार घेणार्‍या सहा रुग्णांचा बळी घेतला. यामध्ये परळीतील शांतीनगर येथील 68 वर्षीय महिलेस सोमवारी सायंकाळी उपचारासाठी स्वारातीमध्ये दाखल करण्यात आले होते. तिचा मंगळवारी रात्री दहा वाजता मृत्यू झाला. अंबाजोगाई तालुक्यातील सोपनवाडी येथील 60 वर्षीय पुरुषाला रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा मंगळवारी रात्री साडेदहा वाजता मृत्यू झाला. अंबाजोगाईतील देशपांडे गल्ली येथील रुग्णास मंगळवारी रात्री दहा वाजता दवाखान्यात दाखल केले होते. त्या रुग्णाचा मध्यरात्री 1.40 च्या दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. स्वाराती रुग्णालय परिसरातील शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या 61 वर्षीय महिलेचा मंगळवारच्या रात्री 8.20 च्या दरम्यान मृत्यू झाला तर केजच्या अहिल्यादेवी नगर येथील रविवारच्या दिवशी पॉझिटिव्ह आलेल्या 46 वर्षीय व्यक्तीचा आज बुधवारी सकाळी सात वाजता मृत्यू झाला. अंबाजोगाईतील झारे गल्लीतील 70 वर्षीय वृद्धास काल दाखल करण्यात आले होते. तो बुधवारी दगावला. 13 ते 14 तासात अंबाजोगाई रुग्णालयात सहा कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

चतुर्थश्रेणी कर्मचार्‍याचा मृत्यू
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोरोना कक्षात कर्तव्य बजावण्यासाठी रात्रपाळीच्या ड्युटी वर गेलेले कर्मचारी नितीन माने यांचा रुग्णालयात अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयातील औषध गोळ्या विभागातील ओपीडी क्रमांक आठमध्ये काम करणार्‍या चतुर्थश्रेणी कर्मचारी यांची कोरोना कक्षात सात दिवसासाठी काल तात्पुरती नियुक्ती करण्यात आली होती. पहिल्या दिवशी त्यांना रात्रपाळीसाठी कर्तव्य बजावण्यासाठी येण्याचे तोंडी आदेश तेथील अधिकारी यांनी दिले होते. त्यानुसार नितीन माने हे रात्री आठ वाजता तेथे कर्तव्य बजावण्यासाठी रुजू झाले. मात्र रात्री बारा वाजण्याच्या सुमारास तेथे कर्तव्यास असलेल्या नर्स यांना नितीन माने हे जमिनीवर पडलेले दिसले. त्यांनी तातडीने अपघात विभागास सदरील माहिती दिली. तेथील डॉक्टरांनी माने यांना तपासले असता माने हे मयत झाल्याचे घोषित केले. माने यांच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tagged