beed jilha parishad

शिक्षक बदली : खुल्या प्रवर्गाला अनेक वर्षानंतर मिळाला न्याय

न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र

रोष्टर घोटाळ्यामुळे बीड जिल्हा मात्र अद्यापही वंचितच

प्रतिनिधी । बीड
दि.12 : सन 2017 पासून शिक्षक आंतर जिल्हा बदल्या ऑनलाइन पद्धतीने केल्या जातात. आंतरजिल्हा बदल्यांचे आज पर्यंत तीन टप्पे झालेले आहेत. या तीन टप्प्यांमध्ये खुल्या प्रवर्गाचा वाट्याला अत्यंत नगण्य बदल्या आलेल्या होत्या. तिसर्‍या टप्प्यात खुल्या प्रवर्ग पूर्णतः वगळण्यात आला होता. चौथ्या टप्प्यात खुल्या प्रवर्गाचा समावेश केल्याने या प्रवर्गातील शेकडो शिक्षकांना स्वजिल्ह्यात जाण्याचा लाभ मिळाला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने सन 2017 पासून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दरवर्षी शिक्षकांच्या बदल्या होतात. जिल्हा परिषदांमध्ये ठेवण्यात येणार्‍या शिक्षण संवर्वर्गाच्या बिंदुनामावलींमध्ये बेकायदेशीर हस्तक्षेप करून खुल्या प्रवर्गाचा हक्काच्या रिक्त जागा मागास प्रवर्गाकडे वळवल्यामुळे आजपर्यंत खुल्या प्रवर्गात गुणवत्तेने निवड झालेल्या शिक्षकावर खूप मोठा अन्याय झालेला होता. शिक्षक आंतरजिल्हा बदलीच्या तिसर्‍या टप्प्यामध्ये वेगवेगळी कारणे दाखवून ग्रामविकास विभागाने या प्रवर्गाचा समावेश केला नव्हता. त्यामुळे सर्व सामाजिक मागास प्रवर्गातील शिक्षकांच्या बदल्या स्वजिल्ह्यात झाल्या होत्या. मात्र खुल्या प्रवर्गाचा वाट्याला एकही आंतरजिल्हा बदली आलेली नव्हती. मात्र आंतरजिल्हा बदलीच्या चौथ्या टप्प्यांमध्ये खुल्या प्रवर्गाचा समावेश केल्यामुळे या प्रवर्गातून 18 जिल्हा परिषदेत 447 (आऊटगोईंग) व 509 (इनकमींग) शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झालेल्या आहेत.

कोरोना जागतिक महामारीच्या वातावरणामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये कोणत्याही बदल्या करण्यात येऊ नये अशा प्रकारचे धोरण स्वीकारले होते. मात्र काही अटी व शर्तीच्या अधीन राहून एकूण कार्यरत पदाच्या दहा टक्के बदल्या करण्यास सामान्य प्रशासन विभागाने 31 जुलैपर्यंत परवानगी दिलेली होती. नंतर त्यास 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या आदेशान्वये 10 ऑगस्ट रोजी ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार एन.आय.सी. पुणे कार्यालयाने प्रत्येक मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिनवर शिक्षकांच्या आऊटगोईंग व इन्कमिंग याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत.

जिल्हा परिषदांमध्ये ठेवण्यात येणार्‍या शिक्षक संवर्गाच्या बिंदुनामावलीमध्ये बेकायदेशीर हस्तक्षेप करून खुल्या प्रवर्गावर अन्याय केला जात होता. याविरोधात खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने राज्यभर रान उठवले होते. संघटनेच्या पाठपुराव्यातून अनेक जिल्हा परिषदांतील रोस्टर दुरुस्त करण्यात आले. त्यातून शेकडो खुल्या प्रवर्गातील शिक्षकाला न्याय मिळाला, अशी प्रतिक्रीया खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाचे राज्यनेते सनिदेवल जाधव यांनी दिली. खुल्या प्रवर्गाचा आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत समावेश व साखळी बदली पद्धतीचा समावेश करून न्याय दिल्याबद्दल संघटनेने ग्रामविकास मंत्र्यांचे आभार व्यक्त केले आहे.

रोष्टर घोटाळ्यामुळे बीड जिल्हा मात्र वंचितच – जयंत आमटे
बीड जिल्हा परिषदमध्ये बिंदूनामावली घोटाळ्यामुळे अंतरजिल्हा बदलीमध्ये खुला प्रवर्गावर अन्यायच झाला आहे. 4 थ्या टप्प्यात खुला प्रवर्गाच्या केवळ 17 लोकांची बदली झाल्या. आत्तापर्यंत 4 टप्प्यात मिळून बीड मध्ये खुला प्रवर्गाच्या केवळ 28 बदल्या झालेल्या आहेत. ग्रामविकास विभागाने तिसर्‍या टप्प्यात तर चक्क खुला प्रवर्ग वगळून खुला प्रवर्गाला बदल्यापासून दूर ठेवलेले होते. मात्र 4 थ्या टप्प्यात राज्यातील काही जिल्ह्यात खुला प्रवर्गाच्या बदल्या झाल्या. पण तरी बीडमध्ये मात्र खुला प्रवर्गाचे शेकडो शिक्षक बदलीसाठी 10 ते 15 वर्षांपासून वाट पाहत आहेत. बीड जिल्हा परिषदेमधील बिंदूनामावली घोटाळा दूर करून रोष्टर दुरुस्त करून खुला प्रवर्गाला न्याय देण्याची मागणी खुला प्रवर्गातील शेकडो शिक्षकांकडून करण्यात येत आहे, अशी प्रतिक्रीया राज्य खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाचे प्रसिध्दी प्रमुख जयंत आमटे यांनी दिली.

Tagged