sant eknath sahkari sakhar karkhana paithan

बॉयलर आधुनिकीकरणाच्या नावाखाली संत एकनाथ कारखान्यातून कोट्यावधीची मशिनरी गायब

न्यूज ऑफ द डे मराठवाडा महाराष्ट्र

गाळपावर प्रश्नचिन्ह?

चंद्रकांत अंबिलवादे । पैठण

पैठण : तालुक्यातील राजकीय चर्चेचा विषय ठरलेल्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तुषार सिसोदे यांचा कारखान्यातील कामकाजाचा अधिकार काढून घेतल्यानंतर चेअरमन तुषार सिसोदे व सचिन घायाळ कंपनीचे कारनामे दररोज समोर येत आहेत. चालू हंगामाची तयारी करण्यासाठी कारखान्याच्या बॉयलर व इतर मशिनरी आधुनिकीकरण (दुरुस्ती) करण्याच्या नावाखाली कारखान्यातून गायब झाली आहे. याठिकाणी कुठल्याही प्रकारची नवीन मशिनरी न आणल्याने संचालक मंडळ, ऊस उत्पादक सभासदांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केल्या जात आहे. यामुळे येणार्‍या गळीत हंगामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना व सचिन घायाळ शुगर कंपनीने करार पद्धतीने कारखाना चालवीत असून चेअरमन तुषार शिसोदे यांना हाताशी धरून या प्रायव्हेट कंपनीने कारखान्याच्या ऊस सभासद, संचालक मंडळाची व कामगार यांची कुठलेही संमती न घेता सन 2020-21 गळीत हंगामासाठी 1250 टन वरून 2300 टनापर्यंत गाळप क्षमता वाढविण्याच्या नावाखाली कारखान्यात बॉयलर आधुनिकीकरण करण्याचे काम संचालक मंडळाचा ठराव मान्यता नसतानाही सुरू केले. त्यासाठी रोटरी स्क्रीन, ऑलिव्हर, सेंट्रीपयुगल मशीन, ज्यूस हिटर, क्वाट्रिपल ट्रिपल बॉडी, मिलचे रोलर, फायबररायझर, टर्बाईन रोटरी अशा विविध मशिनरी नवीन व मॉडिफिकेशन ची कामे हाती घेण्यात आलेले आहेत. नवीन मशिनरी बसविण्या आधीच जुन्या मशिनरी या परिसरातून गायब झाल्या आहेत. येणार्‍या गळीत हंगामात 4 लाख टन ऊस गाळप करण्याची घोषणा केलेली घायाळ कंपनी आता कुठल्या भरोशावर हे उद्दीष्ट पूर्ण करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. संचालक मंडळाची मान्यता ठराव नसतानाही या कारखान्याच्या मालकी हक्काच्या जागेवर डिस्टिलरीचे उद्योग उभारण्यात येऊन यातून इथेनॉल व सॅनिटायझर निर्मिती करण्यात येणार असल्याचे गाजर ऊस उत्पादक कामगार यांना या दाखविण्यात आले होते. परंतु आता नवीन मशिनरी कारखान्यात न आल्यामुळे यावर्षीचा गळीत हंगामच सुरू होतो की नाही याविषयी ऊस उत्पादकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

Tagged