यूपीएसी परीक्षा पुढे ढकलणे अशक्य!

देश विदेश न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र

केंद्रीय लोकसेवा आयोगाची सर्वोच्च न्यायालयात माहिती

दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यूपीएसी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र केंद्रीय लोकसेवा आयोगानं असमर्थता दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयात परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात भूमिका मांडताना आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य असल्याचं आयोगानं म्हटलं आहे.
     करोनामुळे शालेय व महाविद्यालयीन परीक्षांसह इतर परीक्षांनाही फटका बसला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी यूपीएसी परीक्षांही लांबणीवर टाकण्यात आली होती. आता परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर झालं असून, 4 ऑक्टोबर रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र काही उमेदवारांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय खंठपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. यावेळी केंद्रीय लोकसेवा आयोगानं परीक्षा पुढे ढकलणे अशक्य असल्याचं न्यायालयाला सांगितलं. परीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाली असून, आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य आहे, अशी माहिती आयोगानं न्यायालयात दिली. त्यावर न्यायालयानं करण्यात आलेल्या तयारीसह शपथपत्र दाखल करण्याचे आदेश आयोगाला दिले. या याचिकेवर आता बुधवारी अर्थात 30 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. परीक्षा देणार्‍या काही उमेदवारांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका दाखल केलेली आहे. मागील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांचे वकील अलख अलोक श्रीवास्तव यांना याचिकेची प्रत केंद्रीय लोकसेवा आयोग व केंद्र सरकार देण्यास सांगितलं होतं.

Tagged