कालच्या बैठकीनंतर काय केले? प्रशासनाला सवाल
बीड : जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अचानक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा औषध निरीक्षक श्री. डोईफोडे यांच्याकडून कोरोना विषयक सुविधा व उपाययोजनांचा ना. मुंडे यांनी धावता आढावा घेतला.
जिल्ह्याबाहेर मोठ्या शहरांमध्ये रुग्णसंख्या आता कमी होत आहे मात्र बीड जिल्ह्यात अजूनही परिस्थिती सुधारत नाही, येत्या 10 दिवसात रुग्णसंख्येचा आलेख घसरलाच पाहिजे, यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न मिळून करू असे म्हणत ना. मुंडेंनी उपस्थित अधिकाऱ्यांना ऑक्सिजनचे आणखी बेड वाढविण्यातबाबत सूचना दिल्या. जिल्ह्यात ऑक्सिजन कमी पडणार नाही, मात्र तो भरून ठेवण्यासाठी आवश्यक जम्बो सिलेंडर तातडीने खरेदी करावेत, रेमडीसीविर इंजेक्शनचे वितरण योग्य व गरजू रुग्णापर्यंत वेळेत व्हावेत, आयटीआय येथे आणखी 100 बेडचे कोविड केअर सेंटर तातडीने सुरू करणे यासाठी शनिवारी झालेल्या बैठकीनंतर काय नियोजन केले असा सवाल मुंडेंनी उपस्थित केला. जिल्ह्यात रेमडीसीविर इंजेक्शन, पीपीई किट, कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या अन्य औषधी, यांसारख्या विषयांची कमी पडल्यास व ती प्रशासकीय पातळीवर पूर्ण न झाल्यास मला सांगा, त्या सामग्री उपलब्ध करून देण्यासाठी मी मदत करतो, असे आजच्या भेटीवेळी ना. मुंडे जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले. दरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात एक प्रमाणे 11 ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारणीच्या कार्यारंभ आदेश जारी झाले आहेत, कमीत कमी वेळेत हे प्लांट उभे करावेत तसेच त्यांचे नियंत्रण स्वतः करणार असल्याबाबत मुंडेंनी यावेळी स्पष्ट केले. बीड येथील आयटीआय मध्ये 100 ऑक्सिजन बेड चे कोविड केअर सेंटर तातडीने सुरू करावे याबाबतही धनंजय मुंडे यांनी संबंधितांना निर्देश दिले आहेत.