ACB TRAP

वाळू व्यावसायिकास हप्ता मागितला; तीन पोलिसांविरोधात गुन्हा दाखल

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीडच्या वाळूचे कनेक्शन; तिघे डीवायएसपीच्या पथकात होते कार्यरत

अहमदनगर : अवैध धंद्यांवर कारवाईसाठी पोलीस उपअधीक्षकांनी स्थापन केलेल्या विशेष पथकातील पोलिसांनीच वाळू व्यावयायिकाकडे १५ हजार रुपयांचा हप्ता मागितल्याचे उघड झाले आहे. लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने या प्रकरणी तीन पोलिसांविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपी फरारी आहे. शेवगावचे पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या पथकातील हे कर्मचारी असून, यातील एक जण मुंढे यांचा वायरसेल ऑपरेटर तर दोघे विशेष पथकातील आहेत.

नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. तिघांनीही पाथर्डीच्या एका वाळू व्यावसायिकाकाडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. वसंत कान्हु फुलमाळी (वायरसेस ऑपरेटर, रा. पाथर्डी), संदीप वसंत चव्हाण व कैलास नारायण पवार (दोघे विशेष पथकातील कर्मचारी, रा. पाथर्डी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपअधीक्षक मुंढे यांच्या पथकात हे कर्मचारी कार्यरत होते. एप्रिल महिन्यात या पथकाने वाळू वाहतूक करणारे एक वाहन पकडले होते. नगर जिल्ह्यातील वाळूचे लिलाव झालेले नाहीत. त्यामुळे अनेक कंत्राटदार बीड जिल्ह्यातून वाळू आणत आहेत. असेच एक वाळूची वाहतूक करणारे वाहन या तिघांनी पकडले होते. ते वाहन कारवाई न करता सोडून देण्यासाठी आणि पुढे हा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी १५ हजार रुपये लाचेची मागणी या पोलिसांनी कंत्राटदाराकडे केली. मात्र, पाथर्डी येथील कंत्राटदाराने यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली. सोबत रेकॉर्डिंगचे पुरावेही दिले. त्यांनतर एसीबीच्या पथकाने सापळ्याची तयारी सुरू केली. लाच मागितली जात असल्याची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यातून तक्रारीत तथ्य आढळून आले. मधल्या काळात याची चर्चा झाली. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यातील काही पोलिसांच्या बदल्याही केल्या. त्यातून सावध झाल्याने लाचेचा प्रत्यक्ष सापळा रचता आला नाही, मात्र लाच मागितल्याचा पुरावा एसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाला आहे. त्यानुसार या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्याचे कळताच तिघेही फरारी झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक श्याम पवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Tagged