harsh

पात्रुड येथे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या हस्ते जलपूजन

न्यूज ऑफ द डे बीड माजलगाव

पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने केले होते नदी खोलीकरण

माजलगाव : तालुक्यातील पात्रुड येथील नदी खोलीकरण करून सिंचन क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने पोलीस प्रशासनाकडून नदी खोलीकरण काम करण्यात आले होते. हि नदी पावसाच्या पाण्याने तुडुंब भरली असल्याने आज दि.१५ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

माजलगाव तालुक्यातील अतिसंवेदनशील म्हणून पात्रुडची ओळख

१९९३ च्या वेळी येथे दंगल उसळून एक बळी गेला होता. या घटनेमुळे, पात्रुड गावावर संवेदनशील गाव म्हणून शिक्का बसला. मागील दोन वर्षात कलम ३७०, राम मंदिर निर्णय आले या पार्श्वभूमीवर, या काळात पात्रुड ग्रामस्थांना शांततेचे आव्हान पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले होते. या पोलिसांच्या आवाहनास पात्रुड ग्रामस्थांनी साथ देत गावात शांतता राखून, एकतेचे प्रतीक दाखवून दिले.  पात्रुड गावास पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी भेट देऊन ग्रामस्थांचे आभार मानले. यावेळी  गावाजवळून गेलेल्या नदीचे खोलीकरण करून ग्रामस्थांना भेट देण्याचा त्यांनी शब्द दिला होता.

त्यानुसार पोलीस प्रशासनाकडून १५ फुट खोलीकरण व १५० फुट रुंदीकरण असे ३०० मीटर काम नदी खोलीकरण-रुंदीकरण काम करण्यात आले. पावसामुळे खोलीकरण करण्यात आलेले नदीचे पात्र भरले असल्याने आज दि.१५ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

यावेळी पंचायत समिती उपसभापती डॉ.वसीम मनसबदार, गटविकास अधिकारी बी.टी.चव्हाण, माजलगाव ग्रामीण ठाण्याचे पोलीस अधीक्षक संतोष पाटील, सरपंच ऍड. कजिम मनसबदार, ग्रामविकास अधिकारी गणेश गायकवाड, माजी सरपंच नजीर कुरेशी, बाळासाहेब काळे, तुषार माने, तौफिक शेख यांच्यासह ग्रामस्थ, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

संवेदनशील गाव म्हणून पात्रुडची नोंद कमी करावी – उपसभापती डॉ.मनसबदार

पात्रुड गावाची संवेदनशील गाव म्हणून शासन, पोलीस प्रशासन दरबारी नोंद आहे. मागील अनेक वर्षांपासून गावात शांततेत सर्व धर्मीय, सर्व जातीय सण उत्सव पार पडतात. त्याचे बक्षीस म्हणून पोलीस प्रशासनाने गावातील नदी खोलीकरण करून दिले. त्याबद्दल आम्ही ग्रामस्थ पोलीस प्रशासनाचे आभारी आहोत. परंतु आता आमच्या गावाची प्रशासन दरबारी असलेली संवेदनशील गाव हि नोंद पुसून टाकावी, अशी मागणी पंचायत समितीचे उपसभापती डॉ.वसीम मनसबदार यांनी केली.

Tagged