shwan pathak

पाचोड ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ

क्राईम न्यूज ऑफ द डे मराठवाडा

एकाच रात्री तीन दुकाने फोडली; मेंढपाळच्या 22 मेंढ्या चोरीला; पोलीस चौकीवर फिर्याद घेण्यास नकार

पैठण, दि.16 : तालुक्यातील पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विहामांडवा आणि आडूळ परिसरात शनिवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत आडूळ येथील एका डॉक्टरच्या घरातील लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला तर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नावाजलेल्या विहामांडवा गावात तीन दुकाने चोरट्यांनी फोडली. सोबतच मेंढपाळाच्या 22 पाळीव मेंढ्या लंपास केल्याने विहामांडवा परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेने पाचोड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.


याबाबत माहिती अशी की पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विहामांडवा येथे कापूस जिनिंग परिसरात जाफराबाद टेंभुर्णी येथील दत्ता माडे, भागुजी शेवाळे, विष्णू पाचे हे मेंढपाळ राहतात. रात्री अज्ञात चोरट्यांनी 22 मेंढ्याची चोरी करीत गावातील संजीवनी मेडिकल, माऊली ड्रेसेस,अरविंद सराफ यांच्या सोने-चांदीच्या दुकानाचे शटर तोडून जवळपास लाखो रुपयाचा मालावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे तर याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आडूळ येथे शनिवार रात्री डॉ. गणेश वाघ यांच्या शेतातील घरावर चोरट्यांनी चोरी करून 50 हजार रोख रक्कम व 40 हजार रुपयाची सोन्या-चांदीचे ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने पुन्हा एकदा स्थानिक पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

विहामांडव्यात चौकी मात्र फिर्याद पाचोडला

विहामांडवा येथे स्वतंत्र पोलीस चौकी असताना मात्र आज झालेल्या चोरीच्या घटनेतील दुकानदारांना फिर्याद देण्यास पाचोड पोलीस ठाण्यात देण्यास बोलावल्याचा अजब प्रकार घडल्याने पीडित दुकानदारानी पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. दुकानदारांना पाचोड पोलीस ठाण्यात बोलवल्यामुळे पाचोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल झालेला नव्हता. विहामांडवा पोलीस चौकीचे उपनिरीक्षक गोरक्षनाथ खरड यांना याबाबत विचारले असता चौकीवरील तीन कर्मचार्‍यापैकी चौकीचे दोन कर्मचारी सुट्टीवर आहेत. त्यामुळे कर्मचारी कमतरतेमुळे पाचोड ठाण्यात फिर्याद देण्यास सांगितले आहे. मोठी बाजारपेठ असलेल्या या गावांमध्ये कोरोना अनुषंगाने येथील व्यापार्‍यांना व नागरिकांना तक्रार करण्यासाठी पोलीस चौकी असून देखील नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे येथील नागरिक व व्यापारी त्रस्त झाले आहे.

Tagged