tabligi jamat

तबलिगी जमात फंडिंग प्रकरणात ‘ईडी’चे 20 ठिकाणी छापे

देश विदेश न्यूज ऑफ द डे राजकारण

नवी दिल्ली: कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात दिल्लीतून तबलिगी जमातीच्या कार्यक्रमामुळे कोरोना देशभर पसरला असा आरोप गृहमंत्री अमित शहा यांच्या सह केंद्रातील इतर मंत्र्यांनी केला होता. तेव्हापासून मोदी सरकार तबलिगी जमातीला कुठून फंडिंग होते याचा शोध घेत आहे. आता ईडीने याच प्रकरणात मुंबईसह 20 ठिकाणी छापे मारले आहेत. दिल्लीत सात ठिकाणी, मुंबईत पाच ठिकाणी, हैदराबादेत चार ठिकाणी आणि केरळमध्ये तीन ठिकाणी छापे मारले आहेत.

या सगळ्या ठिकाणांहून तबलिगी जमातशी संबंधित काही महत्त्वाची कागदपत्रं आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं मिळाली आहेत. दिल्लीतल्या ठिकाणांपैकी झाकीर नगर हे मुख्य आहे. या ठिकाणी तबलिगी मरकजचं मुख्यालय आहे. याशिवाय कोच्चीच्या तीन ठिकाणी अंकलेश्वरमध्ये छापे मारण्यात आले आहे. मुंबईतल्या अंधेरीसह इतर भागांमध्येही छापे मारण्यात आले आहेत. दिल्लीतील मरकजमध्ये हजारो लोक कोरोना काळात एकत्रित आले होते. त्यांच्या राहण्या खाण्यासाठी कुठून निधी दिला जात होता? मरकजमध्ये भारतातील अनेक राज्यातून आणि परदेशातून मोठ्या संख्येने लोक आले होते. त्याचे प्रायोजक कोण होते? त्यांच्या प्रवासाचा खर्च कोणी केला? याबाबत ईडीचा तपास सुरु आहे. मार्च महिन्यात मरकज वसईत होणार होता. मात्र या मरकजला पोलिसांनी संमती दिली नाही. त्यानंतर हा मरकज दिल्लीत घेण्यात आला. त्यावेळी करोना संकट असल्याने लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे दिल्लीत घेण्यात आलेल्या मरकज प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या मरकजमध्ये परदेशातून आलेले तबलिगीही सहभागी झाले होते. करोनाचा प्रादुर्भाव वाढवल्याचा ठपका या समाजावर ठेवण्यात आला. तसंच नियमांचं उल्लंघन आणि करोनाचा फैलाव झाल्याने दिल्लीतील निजामुद्दीन मरकजचे प्रमुख मौलाना साद यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आता ईडीने त्यांच्या काही ठिकाणावर छापे मारल्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Tagged