majalgaon ek shahr ek ganpati

माजलगावकरांचा ऐतिहासिक निर्णय; शहरात केवळ एकच गणपती बसविणार!

न्यूज ऑफ द डे माजलगाव

सर्व गणेश मंडळाचा एकमताने निर्णय
टेंबे गणेश मंडळाची होणार स्थापना

माजलगाव : कोरोनाच्या अनुषंगाने सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन होण्याकरीता माजलगावात सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकार्‍यांची बुधवारी शहर पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. यात सर्वानुमतने 121 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेल्या श्री ढुंढीराज टेेंबे गणेश मंडळाचीच स्थापना करायची, असा एकमताने ठराव घेतला. एक शहर, एक गणपती संकल्पनेने माजलगावात आदर्श पाऊल टाकले आहे.

कोरोनामुळे आधीच पोलीस वर्ग थकून गेलेला आहे. त्यात गणेश उत्सवाचे मोठा दबाव त्यांच्यावर होता. त्यात गणेश मंडळानाही प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमाच्या चौकटी लादल्या होत्या. शासनाकडून अशा परिस्थितीत गणेश मंडळाच्या प्रत्येक ठिकाणी बैठका घेवून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच अनुषंगाने बुधवारी माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी शहरातील गणेश मंडळाच्या पदाधिकार्‍यांची बैठक बोलावली. यावेळी पोलीस उपअधिक्षक श्रीकांत डिसले यांची उपस्थिती होती. या बैठकीत कोविड-19 च्या अनुषंगाने गणेश मंडळाना पार पाडण्याच्या जवाबदार्‍या ते सांगत होते. यावर गणेश मंडळातील पदाधिकारी तथा नगर परिषदेचे गटनेते रोहन घाडगे यांनी आपल्या शहराला 121 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेला श्री ढुंढीराज टेंबे गणेश मंडळाचीच स्थापना करावी, त्यात आपण सर्व गणेश मंडळांनी सहभागी व्हावे, असा प्रस्ताव मांडला. यास सर्व गणेश मंडळानी दुजोरा देत एकमताने माजलगाव शहरात केवळ श्री ढुंढीराज टेंबे गणेश मंडळाचीच स्थापना करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी गणेश मंडळाच्या या निर्णयाचे स्वागत केले.
यावेळी नगर परिषदेचे गटनेते रोहण घाडगे, नगरसेवक ईश्वर होके, पत्रकार दिलीप झगडे, अनंतदेवा जोशी, दत्ता महाजन, अभिजीत कोंबडे, सर्जेराव शिंदे, मदन पांढरे, सच्चिदानंद आहेर आदीसह गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिवर्षी 66 गणेश मंडळाची होत होती स्थापना
माजलगाव शहरात प्रतिवर्षी 66 परवाना धारक गणेश मंडळाची स्थापना होत होती. तसेच इतरही लहान-मोठे 40-50 गणेश मंडळाची स्थापना होत असे, परंतू यावर्षी कोरोनामुळे पहिल्यांदाच एकच गणेश मंडळाची स्थापना होणार आहे.

रोहन घाडगेंचा आदर्श ठरला प्रस्ताव
या बैठकीत नगर परिषदेचे गटनेते रोहन घाडगे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, गणेश मंडळानी जबाबदारी ओळखून शहरात 121 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेल्या श्री ढुंढीराज टेंबे गणेश मंडळाची स्थापना करावी. इतर गणेश मंडळाची स्थापना करू नये, असा प्रस्ताव मांडला. त्यास गणेश मंडळानी एकमताने मान्यता देत त्यांचा प्रस्ताव आदर्श ठरवला.

दोन गाव, एक गणपतीची स्थापना रद्द
शासनाच्या एक गाव, एक गणपती या संकल्पनेच्या पुढे एक पाउल टाकत. मागील 14 वर्षापासून शेलापुरी व रेणापुरी या दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी मिळून ‘दोन गाव, एक गणपती’ स्थापना करण्यात येत होती. परंतू यावर्षी त्यांनीही माजलगावकरांच्या निर्णयात सहभागी होत, गावात सार्वजनिक गणेशोत्सव न करण्याचा निर्णय घेतला.

Tagged