aaropi

मालकाच्या परस्पर दुकानातील माल विकणारे दोन कामगार गजाआड

न्यूज ऑफ द डे मराठवाडा महाराष्ट्र

ग्राहकांना स्वस्तात विकायचे माल

पैठण, दि.21 : पैठण तालुक्यातील बिडकीन येथील जमील हार्डवेअर अ‍ॅन्ड कृषी साहीत्याच्या दुकानातून गेल्या अनेक दिवसापासून दुकानातले साहित्य कमी होत असल्याचे लक्षात येताच दुकान मालक यांनी बिडकीनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोडे यांना हा प्रकार तक्रार स्वरूपात लक्षात आणून दिला. तत्काळ बिडकीन पोलीस ठाण्याच्या एका विशेष पथकाने बनावट ग्राहक बनून आरोपींकडून माल खरेदी केला. त्याचवेळी पोलीसांनी या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.

तालुक्यातील सर्वाधिक मोठी बाजारपेठ असलेल्या बिडकीन गावामध्ये जमील हार्डवेअर व कृषी साहित्य विक्री करणारी दुकान आहे. या दुकानांमध्ये कामाला असलेले दोन कामगार यांनी मालकाची सतत नजर चुकवून दुकानातील किंमती साहित्य चोरून परस्पर विक्री करण्याचा सिलसिला सुरू केला होता. त्यामुळे दुकानातील किंमती साहित्य नेहमी कमी दिसून येत होते. या गोष्टीचा दुकान मालक शे निहाल शे जमील यांना संशय आल्यामुळे त्यांनी तात्काळ बिडकीन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोडे यांनी एक विशेष पथक स्थापना करून दुकानात कामावर असलेले कामगार शे सलमान ने गुलाब व आदील सत्तार शे (दोघही राहणार बिडकीन) यांच्या हालचालीवर लक्ष केंद्रित केले. या दोघांकडे साध्या कपड्यातील बनावट ग्राहक म्हणून पो.कॉ.तोडकर यांनी यांना पाठविले. या दोन्ही आरोपींनी दुकानातून चोरलेले विविध साहित्य कमी किंमतीत त्यांना आणून दिले. त्यामुळे पोलीसांनी त्यांना रंगेहाथ पकडले.


मौजमजा करण्यासाठी करायचे चोरी
स्वतःची मौज मजा करण्यासाठी या कामगारांनी मालकाला चुना लावला. या दोन्ही भामट्या कडून जवळपास वीस हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. त्यांच्याविरुद्ध कलम 381, 406, 34 भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्याकडून बक्षीस
पोलीसांनी अत्यंत कुशलतेने हा गुन्हा उघडकीस आणल्यामुळे बिडकीन पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोडे व तपास पथकातील कर्मचार्‍यांना ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे यांनी बक्षीस जाहीर केले आहे.

Tagged