sudam munde

अवैध गर्भपात प्रकरणात पदवी रद्द झालेला सुदाम मुंडे प्रॅक्टीस करताना पकडला

न्यूज ऑफ द डे परळी बीड

परळी, दि.6 : स्त्री भ्रूण हत्या प्रकरणात 10 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आलेला आरोपी सुदाम मुंडे हा जामीनावर बाहेर आल्यानंतर आपल्या मुलीच्या नावाने दवाखान्यात प्रॅक्टीस करताना आढळून आला. त्यामुळे त्याला पोलीसांनी पुन्हा एकदा अटक केली आहे. शिक्षा लागल्यानंतर सुदाम मुंडे याचा वैद्यकीय पदवी रद्द करण्यात आली होती. त्यामुळे तो डॉक्टर राहीलेला नव्हता. असे असताना देखील सुदाम मुंडे हा आपल्या दवाखान्यात बेकायदेशीरपणे प्रॅक्टीस करत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशानंतर मुंडेच्या परळी येथील दवाखान्यावर आज सकाळीच छापा टाकून ही कारवाई करण्यात आली आहे.
2012 साली राज्यभर गाजलेल्या परळी येथील अवैध गर्भपात प्रकरणी डॉ. सुदाम मुंडे आणि त्याची पत्नी सरस्वती मुंडे यांना जिल्हा न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. पीडितेचा पती महादेव पटेकर यालाही याप्रकरणी दोषी ठरवत 10 वर्षे सक्तमजुरी ठोठावण्यात आली होती. मात्र अन्य 10 जणांची निर्दोष मुक्तता झाली होती. स्त्री भ्रूणहत्या रोखणारा पीसीपीएनडीटी आणि एमटीबी कायद्यानुसार हे तिघेही दोषी ठरले होते. भारतीय दंड विधानाच्या 312,313,314,315,,तसेच 318 एम टी पी ऍक्ट 3,5 कलम नुसार या तिघांना दोषी ठरवत दहा वर्षे शिक्षा व पन्नास हजार रुपये दंड ठोठावला होता. मे 2012 मध्ये विजयमला पटेकर या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाला होता. त्यानंतर या रुग्णालयात सुरू असलेल्या अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचा धंदा जगासमोर आला होता.

संभाव्य कोरोना रुग्णावरही करत होता उपचार
सुदाम मुंडे याने महिनाभरापासून परळीच्या ग्रामीण भागात प्रॅक्टीस सुरु केली होती. याची कूणकूण प्रशासनाला लागली होती. दरम्यान मुंडे याने संभाव्या कोरोना रुग्णावर देखील उपचार केल्याची माहिती आहे. त्यातील दोन ते तीन रुग्ण औरंगाबादेत उपचारादरम्यान दगावले आहेत. सुदाम मुंडे प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात हे देखील मागील दोन ते तीन दिवसांपासून परळीत तळ ठोकून होते. सुरुवातीला ही कारवाई कुणी करायची जिल्हा प्रशासन, जिल्हा आरोग्य अधिकारी की जिल्हा शल्य चिकित्सक? यावर मोठा खल झाला. वरीष्ठांना याची माहिती देऊन जिल्हा शल्य चिकित्सक आणि त्यांच्या टिमने ही कारवाई केली.

Tagged