sudam munde

सुदाम मुंडेवर परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल

क्राईम न्यूज ऑफ द डे परळी बीड

परळी  : वैद्यकीय परवाना पदवी प्रमाणपत्र स्त्रीभूू्रणहत्या प्रकरणात रद्द झालेला असतानाही आपली खासगी प्रॅक्टीस चालू ठेवणारा परळीचा सुदाम एकनाथ मुंडे यास आज अटक करण्यात आली. त्याच्यावर परळी शहर ठाण्यात विविध प्रकारची 20 कलमं, पोटकलमं लावण्यात आली आहेत. त्यानं नंदागौळ-पूस रोडवर नव्याने थाटण्यात आलं होतं.

       परळी शहर ठाण्यात डॉ.बालासाहेब शिवाजीराव मेढे वैद्यकिय अधिकारी प्रा.आरोग्य केंद्र धर्मापुरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सुदाम एकनाथ मुंडे (वय 70 रा.सारडगाव ता.परळी, हमु.रामनगर परळी) यांना एका गुन्ह्यात शिक्षा लागल्यामुळे वैद्यकिय पदवी निलंबीत केली होती. तसेच त्यांच्या हॉस्पिटलची नोंदणी बॉम्बे नर्सिंग होम अ‍ॅक्ट अंतर्गत नसतानाही हॉस्पिटल सुरु करुन रुग्णांकडून फिस घेवून त्यांची फसवणूक केली व वैद्यकीय ज्ञान कायदेशीर वापरण्याची परवानगी नसतानाही अ‍ॅलीओपॅथीकचा वैद्यकीय व्यवसाय करुन जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण केला. सदरील हॉस्पिटलमध्ये गर्भपातासाठी आवश्यक असणारे वैद्यकीय साधने, उपकरणे व मानवी आरोग्यास धोका होईल, अशा स्थितीत जैविक कचरा आढळून आला. रुग्णालय तपासणीस आलेल्या वैद्यकीय पथकातील अधिकारी सदस्य, लोकसेवकांनी विचारलेल्या प्रश्नाची माहिती देण्यास नकार दिला. तसेच त्यांना अरेरावीची भाषा वापरुन दमदाटी करुन मारहाण करण्याची धमकी दिली. तसेच जिल्हाधिकारी यांचे आदेश असतानाही विनापरवानगी रुग्ण तपासणीसाठी अ‍ॅडमीट करुन घेतले. असा ठपका ठेवत त्याच्यावर इंडियन मेडिकल कौन्सिल अ‍ॅक्ट 1956 चे 15 (2), महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीश्नर अ‍ॅक्ट 1961 चे कलम 33 (2) आणि भादंवी कलम 353, 188, 269, 270, 278, 419, 420, 175, 179, 504 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 (ब), सह साथ रोग प्रतिबंध कायदा 1897 कलम 2,3, 4 वैद्यकिय गर्भपात कायदा 1971 चे कलम 3, 4, 5 मुंबई सुशुषा नोंदणी कायदा -1949 कलम -3 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोनि.हेमंत कदम हे करीत आहेत. सुदाम मुंडेचा कारनामा उघडकीस आणण्यासाठी परळी उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक, तहसीलदार विपीन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात, वैद्यकीय अधिकारी डॉ.मुंडे ज्ञानोबा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोरे लक्ष्मण, वैद्यकिय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय परळी डॉ.दिनेश कुरमे, नायब तहसिलदार रुपनर बाबुराव, पोनि.हेमंत कदम, पोनि.पवार बी.एन., आयबाईक पोशि.हारगाकर औषध निरीक्षक आर.बी. डोईफोडे आदींनी घटनास्थळी भेट दिली.

दोन ते तीन महिन्यापासून सुरु होता हा धंदा
बीड जिल्ह्याची सगळी आरोग्य यंत्रणा कोरोना काळात व्यस्त असताना सुदाम मुंडे याने त्याचाच फायदा घेतला. इतर खासगी दवाखाने साध्या आजाराचे रुग्ण तपासणी करण्यास नकार देत होते त्याचवेळी सुदाम मुंडे याने ग्रामीण भागात जाऊन सेवा द्यायला सुरुवात केली. तिथे त्याने पुर्वीच्या ओळखीचा फायदा घेत आता मी शिक्षा संपवून नव्याने वैद्यकीय व्यवसाय सुरु केला असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील लोकांनी त्याच्या या बोलण्यावर चटकन विश्वास ठेवला. अशाच पध्दतीने त्याने आपल्या मुळ व्यवसायात पाय रोवले. जेव्हा त्याच्या हॉस्पिटलवर छापा मारण्यात आला त्यावेळी गर्भपात करण्याचे साहित्यही तिथे आढळून आल्याचे छाप्यातील अधिकार्‍यांनी सांगितले.

“मी तुम्हाला बघून घेईल”
सुदाम मुंडे याच्या हॉस्पिटलवर छापा मारला त्यावेळी त्याने हा दवाखाना आपल्या मुलीच्या नावे असल्याचे सांगितले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याच्या मुलीकडे विचारणा केली असता त्याच्या डॉक्टर मुलीने माझा आणि त्यांचा काहीएक संबंध नाही, असे यावेळी अधिकार्‍यांना सांगितले. हॉस्पिटलवर आरोग्य पथकाने शनिवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास छापा मारला होत. त्यावेळी त्याने छाप्यातील अधिकार्‍यांना मी सुटून आल्यावर तुम्हाला बघून घेईल, तुमचं थोबाड फोडीत असतो अशी धमकीही त्याने अधिकार्‍यांना दिली. त्याचा पुर्वीचाच ताठा, मग्रुरपणा बिलकूल कमी झालेला नव्हता असे छाप्यातील अधिकार्‍यांनी ‘कार्यारंभ’शी बोलताना सांगितले. त्यामुळेच त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी देखील गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

फुड अ‍ॅन्ड ड्रग्जकडून अनेक औषधी जप्त
हॉस्पिटलवर छापा मारल्यानंतर आरोग्य विभागाने फुड अ‍ॅन्ड ड्रग्जच्या अधिकार्‍यांना पाचारण केले. रात्री दिडच्या सुमारास या अधिकार्‍यांनी परळीत पोहोचत त्या ठिकाणी असलेली औषधांची रिकामी खोकी, इंजेक्शन, अर्धवट औषधी, विविध गोळ्यांची पाकिटं जप्त केली असल्याची माहिती औषध निरीक्षक आर.बी.डोईफोडे यांनी दिली.

व्हेंटीलेटर लावलेले रुग्ण आढळले
छाप मारला त्यावेळी हॉस्पिटलमध्ये तीन ते चार रुग्णांना व्हेंटीलेटर लावले असल्याचे दिसून आले. त्याच्यावर कोरोना सदृश्य आजाराचे उपचार सुरु होते.

प्रशासनाने एक डमी ग्राहक पाठवला
सुदाम मुंडे हा बेकायदेशीर प्रॅक्टीस करत असल्याचे प्रशासनाला समजल्यानंतर सुरुवातीला त्याला समज देण्यात आली होती. मात्र तरीही त्याने हे हॉस्पिटल आपल्या मुलीच्या नावाचा बोर्ड वापरून सुरुच ठेवले. येथे सुदाम मुंडे हाच प्रॅक्टीस करतो हे सिध्द करण्यासाठी प्रशासनाने एक डमी रुग्ण बनून पाठवले. तिथे गेल्यावर त्यांनी मला कोरोनाचा त्रास होत असल्याचे सुदाम मुंडेला सांगितले. त्यानंतर सुदाम मुंडे याने त्याच्यावर उपचार करण्यास सुरुवात करताच बाहेर थांबलेल्या आरोग्य पथकाने तिथे छापा मारला.

Tagged