मुंबईत पत्रकार परिषद
मुंबई : माझ्या पक्ष प्रवेशाच्या सातत्याने निराधार बातम्या पेरल्या जात आहेत. काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी देणाऱ्या वृत्तवाहिनीवर मानहाणीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा देत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी ‘हा माझे राजकारण संपवण्याचा डाव आहे’, असा आरोप केला आहे.
पंकजाताई मुंडे या काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या, या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी मुंबईतील वरळी येथील संपर्क कार्यालयातून माध्यमांशी आज संवाद साधला. यावेळी त्या बोलत त्या. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, गेल्या काही दिवसांपासून अनेक पक्षातील पदाधिकाऱ्यांनी पंकजा मुंडेंनी आमच्या पक्षात यावे, अशी विधाने केली. त्यामुळे माझ्या राजकीय प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या, त्यात आता मी सांगलीच्या एका नेत्यामार्फत काँग्रेसचे नेते सोनिया गांधी व राहुल गांधी यांना दोनवेळा भेटले असे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. हे वृत्त देणाऱ्या वृत्त वाहिनीवर मानहानीचा दावा ठोकणार असून मी सांगलीच्या कोणत्या नेत्यामार्फत भेटले, यासंदर्भातील पुरावे त्यांनी द्यावेत, असा इशारा त्यांनी दिला आहे. मी राहुल गांधी व सोनिया गांधी यांना आयुष्यात प्रत्यक्षात कधीही भेटलेले नाही. पक्षाने सातत्याने डावलले, तरीही आपण पक्षाचा आदेश अंतिम मानला. यापुढे जे काही करेन ते ‘डंके की चोट पर करेन’ असेही त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच, पाठीत खंजीर खुपसण्याचे संस्कार नाहीत, असेही त्या म्हणाल्या.