vijaykant-vikram-munde

रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठाणने सभागृहाचा 25 लाखांचा निधी हडपला

केज न्यूज ऑफ द डे

केज : तालुक्यातील सारूळ ग्रामपंचायत हद्दीत मंजूर करण्यात आलेल्या सामाजिक सभागृह बांधकामाचा 25 लाखांचा निधी अधिकार्‍यांशी संगनमत करुन बांधकाम न करताच हडपला असल्याचा प्रताप जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम मुंडे हे अध्यक्ष असलेल्या रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठाणने केला आहे. याबाबत विडा गणाचे पंचायत समिती सदस्य पिंटू ठोंबरे यांनी जिल्हाधिकार्‍यांनी सोमवारी (दि.7) तक्रार केली असून तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सन 2017-2018 मध्ये सारुळ (ता.केज) येथे खा.रामदास आठवले यांच्या फंडातून सामाजिक सभागृह बांधकामासाठी 25 लाखांचा निधी देण्यात आला होता. जिल्हा नियोजन कार्यालयासह जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत हे काम करण्यात आले. यात केजचे उपअभियंता श्री.खेडकर, बीडचे कार्यकारी अभियंता श्री.हाळीकर व रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम मुंडे यांनी संगनमताने दस्तऐवज तयार करुन तालुक्यात बांधकाम न करताच 25 लाखांचा निधी उचलला. प्रत्यक्षात मात्र सारुळ ग्रामपंचायत हद्दीत काम झाले नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे या कामाची तातडीने उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करुन कठोर कारवाई करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य पिंटू ठोंबरे यांनी केली आहे. विशेष म्हणजे सारुळ (ता.केज) ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोठेही 25 लक्ष रुपयांच्या निधीतून सामाजिक सभागृहाचे बांधकाम करण्यात आलेले नाही, असे लेखी ग्रामपंचायत कार्यालयाकडून देण्यात आले आहे, असेही पिंटू ठोंबरे यांनी सांगितले.

मुंडेंचं प्रतिष्ठाण स्वविकासाठीच!
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम मुंडे अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे हे कोषाध्यक्ष असलेल्या रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठाणमार्फत सभागृहाचे काम झाले आहे. प्रत्यक्षात तालुक्याच्या हद्दीत तरी काम दिसून येत नाही. असाच अन्य कामातही कोट्यावधींचा भ्रष्टाचार वर्षानुवर्षे मुंडे यांच्या प्रतिष्ठाणने केला आहे. प्रतिष्ठाण अंतर्गत असलेल्या अनेक संस्था ह्या बोगस असून कागदावरच आहेत. याशिवाय करण्यात आलेली कामे देखील बोगस असून समितीमार्फत चौकशी केल्यास कोट्यावधींचा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे. हे प्रतिष्ठाण जनतेच्या विकासासाठी नसून स्वविकासाठीच असल्याचे स्पष्ट होत आहे.

Tagged