केजच्या मुंडे पिता -पुत्राने हडपला 25 लाखांचा निधी?

केज न्यूज ऑफ द डे बीड

केज : जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम मुंडे हे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे हे कोषाध्यक्ष असलेल्या रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठाणने सारुळ (ता.केज) येथील सभागृह बांधकामाचा 25 लाखांचा निधी हडपला असल्याच्या तक्रारी पं.स.सदस्य पिंटू ठोंबरे यांनी जिल्हा प्रशासनाने केल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने आता अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ते गुरुवारी (दि.10) सकाळी 11 वाजता कामाच्या ठिकाणी जाऊन चौकशी करणार आहेत. मुंडे पिता-पुत्रांनी 25 लाख हडपले की नाही, हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे.

   सन 2017-2018 मध्ये सारूळ (ता.केज) येथे खा.रामदास आठवलेंच्या फंडातून सामाजिक सभागृहाच्या बांधकामासाठी 25 लाखांचा निधी देण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत हे काम करण्यात आले. यात केजचे उपअभियंता श्री.खेडकर, बीडचे कार्यकारी अभियंता श्री.हाळीकर व रेणुकामाता कृषी विकास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम मुंडे, कोषाध्यक्ष तथा जिल्हा परिषद विजयकांत मुंडे यांनी संगनमताने दस्तऐवज तयार करुन तालुक्यात बांधकाम न करताच 25 लाखांचा निधी उचलला. प्रत्यक्षात सारुळ ग्रामपंचायत हद्दीत कोठेही काम झाले नसल्याचे लेखी ग्रामपंचायत कार्यालयाने देखील दिले आहे. या कामाच्या चौकशीसाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बीडचे कार्यकारी अभियंता, केजचे उपअभियंता, शाखा अभियंता, सरपंच, ग्रामसेवक, तक्रारदार यांनी दस्तऐजवांसह हजर राहण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे हे संपर्क क्षेत्राबाहेर असल्याने त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.

मुंडे पिता-पुत्र येऊ शकतात अडचणीत
25 लाखांच्या कामाची आज चौकशी होणार असून भ्रष्टाचारासह अनियमितता चव्हाट्यावर आल्यास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम मुंडे, जिल्हा परिषद विजयकांत मुंडे हे पिता-पुत्र अडचणीत येऊ शकतात. विकासकामातील भ्रष्टाचारावरून मुंडेंवर सातत्याने गंभीर आरोप होत आले आहेत.

Tagged