पत्रकारांनो, आत्मचिंतन करण्याची ही शेवटची संधी!

न्यूज ऑफ द डे बीड

जिल्हा डायरी : शुभम खाडे

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानल्या जाणार्‍या पत्रकारिता क्षेत्रावर लोकांचा विश्वास आहे असं अजुनही गृहीत धरायला हरकत नाही. समाजव्यवस्था ज्याला चौथा स्तंभ, समाजाचा आरसा वगैरे संबोधते, तो स्तंभ, आरसा आता पूर्णपणे कोसळून त्याचा भुगा होण्याच्या मार्गावर आहे. बरं तो या अवस्थेत का आहे? त्याची कारणे काय आहेत? हे सर्वश्रूत आहे. तीन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाईत खंडणी मागणार्‍या यु-ट्यूब चॅनलचा पत्रकार आणि कॅमेरामॅनविरूद्ध गुन्हा दाखल झाला. ही एक घटना देखील आधीच संशयाच्या भोवर्‍यात असलेल्या माध्यमांवर आणि त्यांच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला पुरेशी आहे.

    आर्थिक संकटावर मात करून कसेबसे टिकून असलेल्या वृत्तपत्र असो व इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा दोन्ही माध्यमात निर्माण झालेल्या आजच्या अभुतपूर्व अस्थिर परिस्थितीला ‘सोशल मीडिया हाच कारणीभूत आहे’ असं म्हणून चालणार नाही. या क्षेत्राच्या होत असलेल्या वाताहतीला आपण सर्वजण कारणीभूत आहोत. सर्वांना हे ज्ञात आहे. फक्त आपलेच दात अन् आपलेच ओठ असल्याने बोलायचं कसं? आपल्याला एकट्या सोशल मीडियाला दोष देता येणार नाही. आज स्वतःला पत्रकार म्हणवून घेणार्‍या काहींना ‘पत्रक’कार म्हणावे लागेल. त्याचं कारण म्हणजे पत्रकार हा बातम्या शोधतो, लिहतो. हल्ली स्वतःला पत्रकार म्हणवून घेणारे किती मंडळी ‘लिहते’ आहेत? हाच संशोधनाचा विषय आहे. त्यात माझ्या सारख्यांनी डोकावणे म्हणजे अनेकांच्या पत्रकारितेची पोलखोल करण्यासारखेच. असो. मुद्दा ‘पत्रक’कार म्हणण्याचा आहे. माध्यमातील प्रतिनिधी अर्थात ग्रामीण भागातील वार्ताहर, बातमीदारापासून ते उपसंपादक, कार्यकारी संपादक, वृत्तसंपादक, संपादक (यापैकी बहुतांश जण) अशा विविध हुद्द्यांवर काम करणार्‍यांची ‘कॉपी-पेस्ट’ बातमीदारी सध्या जोमात सुरु आहे. त्यामुळे एखाद्या ‘पत्रका’ची बातमी करावी तशीचं अख्खी बातमीदारी होऊन बसलीय. अशी बातमीदारी करणार्‍यांना ‘पत्रक’कार म्हटलं तर गैर काय? बरं कोणाला काय म्हणावे हे मी ठरवत बसणार नाही. ते लोकांनी (आपल्या भाषेत सर्वसामान्य जनता) केव्हाचेचं ठरवले आहे. फक्त खोट्या प्रतिष्ठेची झुल अंगावर असलेल्या आणि सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रात वचक आहे असा समज असल्याने ‘पत्रकारां’ना तोडांवर ‘पत्रक’कार म्हणण्याची हिंम्मत लोकं ठेवत नाहीत एवढचं. या सद्यस्थितीला दोष पत्रकारिता करणार्‍यांचा जितका, तितकाचं त्याच्या आडून राजकारणात सक्रीय (उघडपणे) असूनही पत्रकार म्हणून मिरवणारे, राजकारण्यांपुढे ‘हांजी-हांजी’ करणारे ‘फेक’पत्रकार यांचा. यात कहर केला तो युट्यूब चॅनलच्या तज्ञ मंडळींनी. बरं त्यातील काही ब्लॅकमेलर ओळख सांगताना ‘पत्रकार’ म्हणून सांगतात. त्यांनी काय सांगावं आणि त्यांना काय म्हणावं हे आता लोकांनी ठरवण्याची वेळ आली आहे. कारण चौथा स्तंभ टिकावा असे वाटत असेल तर सर्वसामान्यांची भुमिका देखील महत्वाची ठरणार आहे. या युट्यूब चॅनलच्या नावाखाली काही मंडळी दिवसाढवळ्या ब्लॅकमेलिंगचा जुनाच धंदा नव्या पद्धतीने सुरु केला आहे. पत्रकारितेआडून खंडणीखोरांनीही डोकं वर काढले आहे. अशा ‘नासक्या’ कांद्यांची दुर्गंधी झपाट्याने पसरू लागली आहे, त्यामुळे हे बाजूला सारले पाहिजेत. मग त्यात टिव्हीवर भुंकणारा तो ‘दलाल’ असो अथवा काल परवाचे खंडणीखोर. याच मंडळींच्या दुष्कृत्यांमुळे माध्यम क्षेत्राची प्रतिमा डागाळत आहे, किंबहुना डागाळलीच म्हणा. ही परिस्थिती सत्य असली तरी आजही सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी 24 तासापैकी 12 ते 15 तास कष्ट करून ‘हाडाचा पेन आणि घामाची शाई’ करणारे शेकडो पत्रकार आहेत. अशा पत्रकारांमुळेच पत्रकारितेवरील विश्वास शिल्लक आहे. परंतू आपण तोही गमावण्याच्या मार्गावर आहोत, त्यामुळे ‘पत्रक’कारांसाठी आत्मचिंतन करण्याची ही शेवटची संधी आहे. ही संधी गमावल्यास ‘पत्रकार’ संपुष्टात येतील आणि आजचे ‘पत्रक’कारचं शिल्लक असतील. तेव्हा ‘पत्रकार’ म्हणून सांगायची लाज वाटावी अशी परिस्थिती आणि ‘चौथ्या’ स्तंभाचा ‘चोथा’ झालेला असेल.

Tagged