MODI

कोरोनावर मास्क आणि सोशल डिस्टंसिंग हाच उपाय: पंतप्रधान नरेंद्र मोदी

देश विदेश न्यूज ऑफ द डे

दिल्लीःकोरोना व्हायरसने सर्व जगाला वेठीस धरले आहे. मोठ्या मोठ्या अर्थव्यवस्था सुद्धा गुडघे टेकून बसल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशमध्ये आत्मनिर्भर उत्तर प्रदेश रोजगार अभियानाची सुरुवात केली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं, “परिणामकारक औषध येत नाही किंवा त्यावर प्रतिबंधात्मक लस येत नाही तोपर्यंत दोन हाताचं अंतर आणि तोंडाला मास्क हेच उपाय आहे.”

पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंच्या माध्यमातून या कार्यक्रमाची सुरुवात केली. कोरोना व्हायरसच्या साथीमुळे देशभरातून तब्बल 30 लाख स्थलांतरित मजूर उत्तर प्रदेशात परतले आहेत. या सर्व स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात रोजगार मिळावा यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. राज्यातल्या तब्बल 31 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 25 हजार स्थलांतरित मजूर वेगवेगळ्या महानगरातून आलेले आहेत.

आत्मनिर्भर उत्तर प्रदेश रोजगार अभियानांतर्गत मनरेगामध्ये 60 लाखांपेक्षा जास्त मजुरांना दररोज रोजगार मिळवून देण्याचं लक्ष्य आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोना व्हायरसच्या महामारीला रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचं कौतुक केलं. उत्तर प्रदेशातील कोरोनाशी लढणारे डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय, पोलीस, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, बँकातील कर्मचारी तसंच जीवनावश्यक सेवेतील सर्वच कर्मचार्‍यांचे आभार मानले.

Tagged