LASIKARAN

शिक्षक झाले बेजार; लसीकरणाला नागरिक देतायत नकार!

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे

बीड, दि. 8 : निड्ली अ‍ॅपद्वारे जिल्हा परिषद शिक्षक सध्या घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासाठी 45 वर्ष वयाच्या नागरिकांची नोंदणी करत आहेत. परंतू अनेक गावात शिक्षकांना माहिती पुरविण्यास नागरिक टाळाटाळ करत आहेत. एखाद्याची नोंदणी केली आणि त्यांना लसीरकणारसाठी वेळ देण्यात आला तरीही नागरिक लसीकरणासाठी केंद्रावर येत नाहीत. अशावेळी केंद्रावरून शिक्षक संबंधीतांना लसीकरणाला येण्यासाठी फॉलोअप घेण्याचे काम करतात. मात्र आम्हाला लसीकरण करायचे नाही असे म्हणून शिक्षकांना अर्वाच्च आणि गलिच्छ भाषा नागरिक वापरत आहेत. त्यामुळे काम कसे करावे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

लसीकरणाच्या नोंदणीसाठी शिक्षक दारोदारी गेल्यानंतर नागरिकांकडून अत्यंत तिरस्काराची भावना व्यक्त केली जाते. तिकडून येणारी उत्तरं उद्विग्न करणारी असतात. ‘आम्हाला सांगणारे तुम्ही कोण? एकदा सांगितलेलं कळत नाही का?, यासह अशिल्ल शिव्या देखील मिळत आहेत. याचा अनुभव काही शिक्षकांनी ‘कार्यारंभ’शी बोलताना शेअर केला.

त्यातच आता जे लोक मेसेज पाठवूनही लसीकरणासाठी येतच नाहीत अशांना लसीकरण केंद्रातून फोन करण्यासाठीसुद्धा पुन्हा शिक्षकांना नियुक्ती दिली आहे. मात्र लसीकरण नको असलेले लोक मोबाईल केल्यासही उलट सुलट बोलून शिक्षकांना प्रतिसाद देत नाहीत. या सर्व कामासाठी आरोग्य विभागात एमपी डब्ल्यू, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेवीका अशी यंत्रणा असताना शिक्षकच ही सर्व कर्तव्य पार पाडत आहेत. एकंदरीत लसीकरणाला सक्ती करता येत नाही आणि लस तर सर्वांनाच द्यायला हवी अशा गोंधळात ही मोहीम सुरू आहे. त्यात प्रत्यक्ष नागरिकांशी संबंध शिक्षकाचा येत असल्याने सर्व विरोध शिक्षकांनाच पचवण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे कधी एकदाच्या शाळा सुरू होतात आणि मुळ शिकवण्याचे काम सुरू होते असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.

रांगा झाल्या बंद
नव्यानेच बाजारात लस आल्यानंतर कोणीही लसीकरणासाठी येत नव्हते. मात्र दुसर्‍या लाटेत सगळेच बेजार झाल्यानंतर लसीकरणाचे महत्व नागरिकांना कळले. त्यांनी लसीकरण केंद्राबाहेर चक्क रांगा लावल्या होत्या. अनेकदा या ठिकाणची गर्दी आवरताना पोलीसांना लाठीमार देखील करावा लागला. मात्र दुसरी लाट ओसरली आणि नागरिकांचे लसीकरणाबद्दलचे महत्व देखील कमी झाले आहे.

Tagged