बीड दि.4 : पुण्यात एका इसमाचा खून करून फरार झालेले आरोपी शनिवारी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाले. येथील पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर माजलगाव ग्रामीण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत भारतीविद्यापीठ पोलिसांच्या स्वाधीन केले.
प्रकाश भागवत शिंदे (वय 36 रा.ओमकार सोसायटी पुणे), किसन सखाराम उपाडे (वय 37 रा.पारखे वस्ती) अशी आरोपींची नावे आहेत. सदरील दोन आरोपींनी 28 नोव्हेंबर रोजी रात्री 11: 30 ,च्या सुमारास पुण्यातील कात्रज नवले ब्रिजकडे जाणाऱ्या रोडच्या दरम्यान चंद्रसखा वेअर हाऊस कंपनीच्या शेजारी धारदार शस्त्राने शरद आवारे यांचा खून केला. अशी माहिती माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतः हजर होऊन शनिवारी (दि.4) दिली. ग्रामीण ठाण्यातील पोलीस निरीक्षक प्रकाश मुंडे, सहाय्यक निरीक्षक विजयसिंग जोनवाल यांनी पुण्यातील भारतीविद्यापीठ पोलिसांशी संपर्क केला. व पुढील तपासासाठी तेथील उपनिरीक्षक नितीन शिंदे यांच्या स्वाधीन केले.