modi and thakare

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री यांच्यात काय झाली चर्चा? ठाकरेंनी दिली माहिती

न्यूज ऑफ द डे


नवी दिल्ली, दि. 8 : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आता मुख्यमंत्र्यांनी थेट पंतप्रधानांची भेट घेऊन तिढा सोडवण्याची रणनीती आखली. त्याप्रमाणे त्यांनी आज पंतप्रधान मोदी यांच्याशी दिल्लीत जाऊन चर्चा केली. आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी मोदी यांच्याकडे केली. यावेळी मोदी यांच्यासोबत व्यवस्थित चर्चा झाली आहे. त्यांनी सर्व विषय गांभीर्याने ऐकून घेतले आहेत. राज्याचे जे विषय मांडले आहेत त्याची माहिती घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटीनंतर सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सदनात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाणही यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी यांच्यासमोर राज्यातील संवेदनशील विषय मांडले आहेत. मराठा आरक्षण, मागावसर्गीयाचं बढतीमधील आरक्षण, मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गमधील जागेची उपलब्धतता आणि जीएसटी परतावा, पीक विमा याबाबत मोदी यांच्याशी चर्चा झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. जे विषय मांडले आहेत ते सकारात्मक पद्धतीने पंतप्रधान मोदी सोडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, मराठा आरक्षण सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थेतील जइउ आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे, हेही त्यांना सांगितले. इथंही 50 टक्के अट शिथिल करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी घटना दुरूस्ती करून कायदा करावा, अशी राज्य सरकारची मागणी आहे हे सांगितले. तसेच मेट्रो कारशेडवरही विषय झाला आहे.24 हजार 306 कोटी केंद्राने जीएसटीचे देणे बाकी आहे आदी विषय त्यांच्यासमोर ठेवले आहेत, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री-पंतप्रधान बैठकीत या बारा मुद्द्यांवर चर्चा

  • मराठा आरक्षणाबाबत केंद्राने भूमिका घ्यावी
  • इतर मागासवर्गीयांचं राजकीय आरक्षण
  • मागासवर्गीयांचं पदान्नतीमधील आरक्षण
  • मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेची उपलब्धता
  • केंद्राकडून मिळणारा जीएसटीचा परतावा वेळेत मिळावा
  • पीकविमा अटी-शर्तींचं सुलभीकरण – बीड मॉडेल
  • राज्यात बल्क ड्रग पार्क तयार करणं – स्पर्धात्मक निविदेस मंजुरी
  • नैसर्गिक आपत्तीबाबत मदतीसाठी एनडीआरएफचे निकष बदलणे
  • चौदाव्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळावा (शहरी स्थानिक)
  • चौदाव्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळावा (पंचायत राज ससंस्था)
  • मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा
  • राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची निवड

12 मुद्दे पंतप्रधानांना सांगितले : अजित पवार
आमची दीड तास चर्चा झाली. 12 मुद्दे आम्ही पंतप्रधानांना सांगितले. सुमारे 90 मिनिटं चर्चा झाली. जी सकारात्मक होती. हे मुद्दे तपासून निर्णय घेतला जाईल, असं पंतप्रधान म्हणाले, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. तसंच ओबीसींचं राजकीय आरक्षण काढल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढवण्यात अडचण आहे. सर्व राज्यासाठी धोरण अवलंबलं पाहिजे असा आग्रह धरला. याशिवाय मुंबईतील मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गची जागा आणि जीएसटीचा प्रश्न प्रलंबित आहे तो लवकरात लवकर सोडवावा. तसंच पीकविम्यासंदर्भात चर्चा झाली, असं अजित पवार यांनी म्हटलं.

पंतप्रधानांसोबत वैयक्तिक भेट झाली : उद्धव ठाकरे
दरम्यान शिष्टमंडळासोबतच्या अधिकृत भेटदरम्यानच मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात वैयक्तिक भेट होणार असल्याची चर्चा रंगली होती. त्याविषयी सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधानांसोबत वैयक्तिक भेट झाली. सत्तेत एकत्र नसलो तरी याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही. पंतप्रधानांना भेटणं यात गैर काय? मी नवाज शरीफ यांना भेटायला गेलो नव्हतो, आपल्याच पतंप्रधानांची भेट घेतली. दरम्यान पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यात जवळपास तीस मिनिटं भेट झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Tagged