खदाणीत आढळला अनोखी इसमाचा मृतदेह

क्राईम गेवराई बीड

हात-पाय बांधलेले असल्याने घातपाताचा संशय

तलवाडा :  गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील एका शेतकर्‍याच्या शेतात असलेल्या खदाणीत बुधवारी (दि.10) अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली असून मृतदेहाचे हात-पाय बांधलेले असल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. 
      तलवाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश उणवने, जमादार मारोती माने, पोकॉ.वडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करत गुरूवारी शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत मार्फत दफनविधी प्रक्रिया पार पाडण्यात आली. मृत व्यक्तीचे अंदाजे वय 60 वर्षे इतके असून पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. मृत इसमाला कुणीतरी जिवे मारून त्याचे हात-पाय दोरीने बांधून त्याला खदाणीत टाकले असावे अशी चर्चा तलवाडा परिसरात ऐकावयास मिळत आहे. या इसमाच्या अंगात पांढरा शर्ट व धोतर नेसलेले असा पेहराव असून तो अंगाने जाडजूड असल्याचे दिसत आहे. इसमाची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे हा व्यक्ती नेमका कोण हे समजत नसल्यामुळे, या घटने बाबतीत सदर पेहराव वरून ज्यांना ओळख होईल त्या नातेवाईकांनी तलवाडा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन सपोनि सुरेश उणवने व जमादार मारोती माने यांनी केले आहे.

Tagged