मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना अभिनेत्री कंगणा रणौत हिने ‘अरे तुरे’ची भाषा वापरली होती. याप्रकरणी आता कंगनावर मुंबईतील विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अभिनेत्री कंगना रणौत सध्या राज्यात चर्चेचा मुद्दा ठरली आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगना विरुद्ध शिवसेना अशी वाद उफाळून आला आहे. कंगनानं मुंबई आणि मुंबई पोलिसांविषयी केलेल्या विधानांवरून शिवसेनेनं टीका केली होती. त्यानंतर हा वाद चिघळत गेला. यात महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयाचा अनधिकृत भाग पाडल्यानंतर तिने संताप व्यक्त केला होता. त्यानंतर मुंबईत दाखल झालेल्या कंगनानं बुधवारी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांवर टीका करताना कंगनानं त्यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला. कंगनानं केलेल्या या टीकेवर नाराजी व्यक्त होत असताना मुंबईतील विक्रोळी पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नितीन वसंत माने या फिर्यादीच्या तक्रारीवरून तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.