हाथरस प्रकरण: आरोपींना सोडलं जाणार नाही

क्राईम देश विदेश न्यूज ऑफ द डे

योगी आदित्यनाथ: मोदीनींही दिले कठोर कारवाईचे आदेश

लखनऊ : योगी आदित्यनाथ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्यासोबत हाथरस घटनेवरुन संवाद साधला. आरोपींविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे असं यावेळी त्यांनी सांगितलं. योगी आदित्यनाथ यांनी घटनेचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आलं असल्याची माहिती दिली.
योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, हाथरस सामूहिक बलात्कारातील आरोपींना सोडलं जाणार नाही. घटनेचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आलं आहे. हे पथक सात दिवसांत रिपोर्ट सादर करेल. न्याय मिळावा यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होईल. बलात्कार पीडित 19 वर्षीय पीडितेचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात पीडित तरुणीवर उपचार सुरु होते. मध्यरात्री 3 वाजता पीडित तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. युपी पोलिसांनी जबरदस्ती अंत्यसंस्कार केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांना वारंवार मृतदेह घरी आणला जावा यासाठी विनंती केली जात होती, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असा आरोप कुटुंबाने केला आहे. पीडितेच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, माझ्या बहिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले असं दिसतंय. पोलीस आम्हाला काहीच माहिती देत नाहीयेत. अखेरचं एकदा तिचा मृतदेह घरी आणला जावा यासाठी आम्ही त्यांना वारंवार विनंती करत होतो, पण त्यांनी ऐकलं नाही. तरुणीच्या मृत्यूपूर्वी कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटलं होतं की, 14 सप्टेंबर रोजी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी ही तरुणी आपल्या शेतात गेली होती. याठिकाणी चार तरुणांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ अवस्थेत जेव्हा ही तरुणी घटनास्थळी आढळून आली तेव्हा तिची जीभ छाटलेली होती तसेच तिच्या मानेवर गंभीर जखमा होत्या. त्याचबरोबर तिच्या पाठीच्या कण्यालाही गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला फक्त जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर 23 तारखेला तरुणीच्या जबाबानंतर एफआयआरमध्ये सामूहिक बलात्काराचे कलम जोडण्यात आले. पोलिसांनी पीडित मुलीच्या घराजवळील तीन व्यक्तींना सुरुवातीला ताब्यात घेतले. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यातील एकजण फरार झाला होता त्यानंतर त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

Tagged