अखेर ‘शेतकरी पुत्र’ दिसले ‘बांधावर’

केज न्यूज ऑफ द डे

केज तालुक्यात नुकसानग्रस्त शेतीची केली पाहणी

बीड : कोरोनाच्या संकटापाठोपाठ आता शेतकर्‍यांसमोर अतिवृष्टीचे संकट निर्माण झालं आहे. अशा संकटकाळात ‘शेतकरी पुत्र’ अर्थात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे आहेत तरी कुठे? असा प्रश्न समाजमाध्यमांवर वारंवार विचारला जात होता. ‘ट्रोल’ होताच हे ‘शेतकरी पुत्र’ अखेर ‘बांधावर’ पोहोचले. त्यांनी केज तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात जाऊन पिके नुकसानीची पाहणी केली. व तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचे सांगण्यात आले आहे.

   लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. या निवडणुकीनंतर त्यांना ‘शेतकरी पुत्र’ असं म्हटलं जातं आहे. निवडणुकीत स्वतःला ‘शेतकरी पुत्र’ म्हणवून बजरंग सोनवणे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती व येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. कोरोनासारख्या संकटकाळात ग्रामीण आरोग्य यंत्रणा कोलमडलेली असतानाही ते घराबाहेर पडल्याचे दिसून आले नाही. ‘सर्वत्र लॉकडाऊन’ आहे, त्यामुळे कदाचित ते दिसत नसावेत असा अंदाज लावला जात असावा. त्यामुळे ते आहेत कुठे? याबाबत त्यांच्याबद्दल फारशी विचारणा होत नसावी. परंतू मागील 15 दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला. सोयाबीन, मुग, उडीद या पिकांना कोंब फुटले तर कापसाच्या वाती झाल्या, असं वेदनादायी चित्र शेतकर्‍यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. मग संकटकाळी लोकसभा निवडणुकीपासून स्वतःला ‘शेतकरी पुत्र’ नेमंक आहेत कुठे? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला. मग समाजमाध्यमांवर ‘ट्रोल’ झालेले ‘शेतकरी पुत्र’ बजरंग सोनवणे अखेर शेतकर्‍यांच्या दुःखात सहभागी झाल्याचे दिसून आले. त्यांनी केज तालुक्यातील विडासह परिसरातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून तातडीने पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या. यावेळी विडा गणाचे पंचायत समिती सदस्य पिंटू ठोंबरे, शहाजी गुटे, राजेंद्र पटाईत, दिपक वाघमारे व शेतकरी उपस्थित होते.

या भागात केली पाहणी
केज तालुक्यातील विडा गटातील विडा, पिंपळगाव, सारणी, सांगवी भागात सोमवारी (दि.12) नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. परतीच्या पावसाने ऊस पिकासह काढणीस आलेल्या सोयाबीन, बाजरी, कापसाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाल्याचे अन् बजरंग सोनवणे यांनी स्वतः अनुभवले. पंचनामे करताना टाळाटाळ करता कामा नये असेही त्यांनी अधिकार्‍यांना बजावले आहे.

Tagged