नेकनूर : पती-पत्नीमध्ये होणारा वाद हा कुठल्याही कुटूंबासाठी नवीन नाही. परंतु पती-पत्नीच्या वादात इतरांनी हस्तक्षेप केल्यास वाद मिटण्यापेक्षा तो वाढतो. नेकनूर येथील मांडवखेल येथील घडलेली घटनाही अशीच आहे. पती-पत्नीमध्ये होणार्या वादात मुलीची आई सतत हस्तक्षेप करायची. सततच्या या हस्तक्षेपाला कंटाळून जावायाने बायकोला माहेरी पाठवून सासुचा खून केला. संशय येवू नये म्हणून प्रेत शेतात पुरुन टाकले. परंतु नेकनूर पोलीसांनी या प्रकरणाचा छडा लावला. आणि जावायासह त्याच्या वडीलांना बेड्या ठोकल्या.
पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार अलका हनुमंत जोगदंड (वय 40 रा.वानगाव, ह.मु.अंकुश नगर बीड) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांच्या मुलीचा विवाह सचिन तुकाराम कदम (वय 26) यांच्याशी चार वर्षापुर्वी झाला होता. सचिन हा ड्रायव्हर आहे. तो ठाणे, पुणे परिसरामध्ये ड्रायव्हिंग करायचा त्यामुळे तिकडेच कुटूंबासोबत राहत होता. त्यांना एक मुलगी आहे. सचिनचे सतत बायको सोबत छोट छोट्या कारणांवरुन भांडण व्हायचे. भांडण झाले की बायको याची माहिती घरी आईला द्यायची. यामुळे सचिनसोबत सासू सतत भांडायची.. एक दोन वेळा त्यांच्यात चांगलेच भांडणही झालेले आहे. कोरोनामुळे देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे सचिनही गावी आला. गावी आल्यानंतर पतीपत्नीमध्ये परत वाद झाला. याची माहिती सासुला झाल्यानंतर तिने लगेच मांडवखेल गाठले. घरात बसून दोघांचीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रकरण मिटवतांना पुन्हा वाद झाला. या मारहाणीमध्ये अलका यांना मार लागल्याने त्या जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी नेकनूर येथील दवाखान्यात नेण्यात आले. मात्र येथील डॉक्टरांनी त्यांची सोनोग्राफी करावी लागेल यासाठी बीडला दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिल्या. याच वेळी सचिनच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन तयार झाला. त्याने पत्नीला तिच्या माहेरी सोडले. आणि अलका यांना सोनोग्राफीसाठी दवाखान्यात सोडतो असे म्हणून सोबत घेतले. मनामध्ये राग असल्याने अलका यांना थेट नेकनूर येथील शेतात नेले. वडीलांच्या मदतीने अलका यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालत त्यांना जखमी केले. नंतर दगडाने ठेचून त्यांचा खून केला. कुणाला संशय येवू नये म्हणून प्रेत शेतातच पुरुन टाकले. कुणाला काही संशय येऊ नये म्हणून नेहमी प्रमाणे आपले कामकाज सुरु केले. इकडे अलका घरी परतली नसल्याने तिच्या पतीने पोलीसात बेपत्ता असल्याची फिर्याद दिली. सपोनि.केंद्रे यांनी कौशल्यपूर्ण तपास करत सचिनची कसून चौकशी केली. वारंवार चौकशी केल्यानंतर सचिनवर संशय निर्माण झाला. त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. या प्रकरणी नेकनूर पोलिसांनी सचिन तुकाराम कदम (वय 26) व तुकाराम रामभाऊ कदम (वय 50 दोघे रा.मांडवखेल ता.बीड) यांना ताब्यात घेतले. पोलीस कर्मचारी दयानंद शिंदे यांच्या फिर्यादीवरुन नेकनूर पोलीसात गुन्हा रजिस्टर नंबर 122/20 कलम 302, 120 ब, 201, 34 भा.द वि. नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि.लक्ष्मण केंद्रे हे करत आहेत.
पोलीसांचा जावायावरील संशय खरा ठरला
दि.22 मे रोजी मुलीसोबत जावयाने भांडण केल्याने सासू अलका मांडवखेल येथे गेली होती. त्यानंतर त्या त्यांच्या घरी परतल्याच नाहीत. त्यामुळे त्यांच्या पतीने बेपत्ता असल्याची तक्रार पोलीसात दिली होती. शेेवटच्या वेळी त्या जावायाच्या घरी होत्या त्यामुळे पोलीसांना सुरुवातीपासून जावायावरच संशय होता आणि शेवटी तो खरा ठरला.
घटनास्थळावर वरिष्ठांची धाव
या प्रकरणाची माहिती होताच अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, पोलीस उपअधीक्षक भास्करराव सावंत, बीड तहसिलदार, नेकनूर पोलीस ठाण्याचे सपोनि.लक्ष्मण केंद्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदरील घटना 23 तारखेला घडल्याची शक्यता असल्याने प्रेत हे शवविच्छेदनासाठी नेकनूर आरोग्य केंद्रात आणणे शक्य नव्हते. त्यामुळे वैद्यकीय अधिकार्यांच्या पथकासह घटनस्थळीच पंचनामा करण्यात आला.
मुलीची समजूतकाढायची सोडून मलाच त्रास
आम्हा नवरा बायकोमध्ये वाद व्हायचे. याची माहिती सासुला झाल्यानंतर त्या प्रत्येक वेळी मलाच त्रास द्यायच्या.. एक दोन वेळा मला मारहाणही केली. परंतु मुलीची कधीच त्यांनी समजूत काढली नाही. उलट मलाच नेहमी त्रास दिला जायचा असे आरोपी जावायाने पोलीसांना सांगितले.