majalgaon andolan

मंजूर भाई, क्या तुम्हे ये मंजूर है?

न्यूज ऑफ द डे माजलगाव

घाण पाण्यात बसून व्यापार्‍यांनी माजलगावच्या नगराध्यक्षांची इज्जत भर चौकात वेशीवर टांगली

वैजेनाथ घायतिडक/ माजलगाव

माजलगाव : माजलगाव पालिकेत सहाल चाऊस यांना खुर्चीवरून खाली खेचल्यानंतर आ.प्रकाश सोळंके यांनी शेख मंजूर यांना अध्यक्षपदी बसविल्यानंतर झालेल्या बैठकीत ‘सहा महिन्यात विकास काय असतो हे दाखवतो’ असे म्हणून माजलगावकरांना विकासासाठी अश्वस्त केले होते. पण ‘कशाचं काय अन् फाटक्यात पाय’ अशी अवस्था माजलगावच्या व्यापार्‍यांची झाली आहे. माजलगावच्या व्यापारपेठेची शान असलेल्या जुन्या मोंढ्याच्या प्रवेशद्वारावर भर उन्हाळ्यात पाण्याचे डबके साचत असल्याने आज व्यापार्‍यांनी बिनलाज्या नगर परिषदेचा घाण पाण्यात बसून बोंब मारून निषेध व्यक्त केला. नगर पालिकेची म्हणजेच नगराध्यक्षांची इज्जत व्यापार्‍यांनी भर चौकात अशाप्रकारे अक्षरशः वेशीवर टांगली. त्यामुळेच माजलगावच्या नगराध्यक्षांना जनता विचारतेय “मंजूर भाई क्या तुम्हे ये ‘मंजूर’ है?”

माजलगावच्या व्यापार्‍यांनी काय काय सहन केलं पाहीजे? थोडा जरी पाऊस आला तर दुकानात पाणी शिरतं. नळाला पाणी सोडलं तर रस्त्यावर साचतं. नाली खोदली तर रस्ता बंद होतो. रस्ता बंद झाला तर ग्राहक येत नाही. नालीवर पूल केला तर हातगाड्यावाले पुलावर ताबा मिळवून रस्ता बंद करतात अन् दुकान उघडलं तर समोर हातगाड्यावाले दुकान अडवून उभेच असतात. महिना संपतो, दुकानमालक येतो किराया घेऊन जातो. हातगाड्याचं अन् पाण्याचं काही करा म्हटलं तर उत्तर येतं ‘तुमचं तुम्ही बघा’. नगर पालिकेकडे तक्रार केली तर पोलीसात जा अन् पोलीसांकडे गेले तर त्यांचे खिशे भरा. शेवटी आमचेच ‘जातभाई’ म्हणून कारवाई कशी करायची? असा उलट सवाल पोलीस ठाणे अन् नगर परिषदेतून पुर्वीपासून ऐकायला मिळतो. आता या सगळ्या प्रकाराला मोंढ्यातील व्यापारी वैतागले आहेत. त्यांच्या सहनशिलतेचा बांध आज फुटला. त्यांनी पाणी साचलेल्या रस्त्यावर मांड्या घालून बसत नगर परिषदेच्या नालायक कारभाराचा येथेच्छ शिव्या देऊन उध्दार केला. हे बघायला नगराध्यक्ष जरी स्पॉटवर गेले नसले तरी आता बातमी वाचून त्यांच्या डोळ्यासमोर चित्रं उभं राहीलं असेल. त्यामुळे पदाला ‘लायक’ असा कारभार करा. ज्या कामासाठी तुम्ही खुर्चीवर बसलात तेच काम करा. अन्यथा लोक रस्त्यावर फिरू देणार नाहीत. हेच का ते मंजूर भाई म्हणून तोंडावर देखील शिव्याश्राप (जाब विचारतील असे आम्ही म्हणत नाही) द्यायला कमी करणार नाहीत. त्यामुळे मंजूरभाई जरा लोकांच्या प्रश्नाकडं लक्ष द्या, अशी मागणी माजलगावचे व्यापारी करीत आहेत.

आज पाण्यात बसण्याची दुर्दैवी वेळ व्यापार्‍यांवर आली. पण हेच व्यापारी एक दिवस कारभार्‍यांना असेच पाण्यात बसण्याची वेळ आणतील.

आठ दिवसात नाली करू; इतक्या दिवस झोपले होते काय?
मंगळवारी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासनी, सुनिल भांडेकर, गणेश लोहिया, वैजनाथ घायतीडक, औंकार कारळकर, कृष्णा भुतडा, दिलीप खुर्पे, धनंजय सोळंके, अशोक बिक्कड, विठ्ठल श्रीरंग आदि व्यापारी सहभागी झाले होते. आंदोलन सुरू असल्याने मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी आंदोलन स्थळी येत व्यापार्‍यांचा प्रश्न आठ दिवसात मार्गी लावू असे अश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु हे आंदोलन करेपर्यंत नगर पालिका झोपली होती का? जो प्रश्न आठ दिवसात सुटायला हवा तो आठ वर्षापासून का रखडत ठेवला? असा प्रश्न व्यापारी करीत आहेत.

जमत नसेल तर खुर्ची उबवू नका
व्यापार्‍यांचा हा प्रश्न सोडविणे नगराध्यक्षांना जमत नसेल तर उगा मोठेपणा मिरवण्यासाठी नगराध्यक्षपदाची खुर्ची उबवू नका. मुख्याधिकार्‍यांनाही शासन भरमसाठी पगार देते. त्यांनीही जनतेची कामे न करता नुसता पगार ढापू नये, अशी तीव्र प्रतिक्रीया व्यापारी व्यक्त करीत आहेत.

Tagged