शांताबाई राठोडच्या विरोधात पुजा चव्हाणच्या वडीलांची पोलीसात तक्रार

क्राईम न्यूज ऑफ द डे परळी बीड मराठवाडा महाराष्ट्र

 परळी  दि.2 : पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणी आई-वडिलांनी पाच कोटी रुपये घेतल्याचा आरोप शांताबाई राठोड या महिलेने केला होता. हा आरोप बदनामीकारक व खोटा आहे. आरोप करणारी महिला शांताबाई राठोडवर गुन्हा दाखल करण्यासाठी पुजाच्या वडिलांनी पोलीसांकडे धाव घेत परळी शहर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलेच पेटलेले आहे. या प्रकरणात अडचणीत सापडलेल्या शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे. मयत पुजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी मंगळवारी परळीत पोलीसांकडे धाव घेत आमच्यावर पाच कोटी रुपये घेतल्याचा आरोप करणार्‍या शांताबाई राठोड या महिलेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. लहू चव्हाण यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचे राजकारण का केले जात आहे? असा सवाल उपस्थित करुन आमच्यावर आरोप करणारी महिला शांताबाई राठोड हिचा व आमच्या कुटुंबाचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या कुटुंबाची व मयत पुजाबाबत या महिलेला कसलीच आत्मियता नाही. विनाकारण वारंवार विविध वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या समोर येऊन या प्रकरणी वक्तव्ये करुन ती आमच्या कुटुंबाची बदनामी करीत करत असल्याचेही ते म्हणाले. पुजाच्या मृत्यूपेक्षा आमच्या कुटुंबाची बदनामी जास्त केली जात आहे. ती बदनामी थांबवा अशी मागणी पूजाच्या वडिलांनी केली आहे. आमचे कुटुंब मुलीच्या अकाली व दुर्दैवी मृत्युच्या दु:खात असताना आम्ही या प्रकरणात पाच कोटी रुपये घेतल्याचा बिनबुडाचा व मनाला वेदना देणारा आरोप या महिलेने केला आहे. अगोदरच दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना आमची रोज बदनामी केली जात आहे. यामुळे संपूर्ण कुटुंब खचुन गेले आहे. आमच्यावर आरोप करणार्‍या शांताबाई राठोडवर परळी शहर पोलीसात तक्रार देण्यात आली आहे.

Tagged