सुधरा रे! नसता थेट राजीनामे द्या; विभागीय आयुक्त केंद्रेकर संतापले

बीड

बीड : कोरोनासारख्या गंभीर स्थितीतही सरकारी बाबूंना गांभीर्य नसल्याचेच दिसून येत आहे. असेच अनेक प्रकार जिल्हा प्रशासनाच्या आढावा बैठकीत समोर आले. कोरोना परिस्थितीचा आढावा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज (दि.१७) घेतला. यावेळी सर्वच बेजबाबदार अधिकाऱ्यांची त्यांनी चांगलीच खरडपट्टी केली.

या बैठकीस जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, पोलीस अधीक्षक आर. राजा, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गीते यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बीडमध्ये कोरोना चाचणी प्रयोगशाळा प्रस्तावित असून तातडीने सुरू करण्याचे निर्देश केंद्रेकर यांनी दिली. तसेच, आरटीपीसीआर चाचणीवर भर द्यावा. ऑक्सिजन उपलब्धता करा. हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. मास्क नसल्यास वेळप्रसंगी ‘प्रसाद’ द्या असेही निर्देश पोलीस यंत्रणांना दिले आहेत. याशिवाय, माध्यम नियंत्रणासाठी अधिकारी असायला हवा असे मतही आयुक्त केंद्रेकर यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या अनुषंगाने केंद्रेकर हे विभागनिहाय आढावा घेत आहेत.

रुग्ण मोकाट फिरू लागले : अंबाजोगाई तालुक्यात कोरोना रुग्ण रस्त्यावर मोकाट फिरत असल्याचे दिसून आले. या प्रकारावरून केंद्रेकर चांगलेच संतापले. अशा रुग्णांसह जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात कारवाईचे निर्देश दिले आहेत.

Tagged