sachin waze

का ठेवल्या जिलेटीन कांड्या? सचिन वाझेनं दिली कबुली?

क्राईम महाराष्ट्र


मुंबई ः एकेकाळी मुंबईतील अंडरवर्ल्डचं कंबरंडं मोडणारे एन्काऊंटर फेम प्रदीप शर्मा, दया नायक यांच्याही पंक्तीत सचिन वाझे यांचं नाव होतं. परंतु त्या दोघांएवढी प्रसिध्दी वाझे यांना मिळाली नाही. त्यात पुन्हा 2004 मध्ये ख्वाजा युनूस प्रकरण घडलं. त्यात वाझे निलंबीत झाले. त्यामुळे पोलीस दलात अपेक्षीत अशी कामगिरी करताच आली नाही. राज्यात शिवसेनेचं सरकार सत्तेत आल्यावर सचिन वाझे यांनी परत पोलीस दलात स्थान मिळवलं. पण यावेळी त्यांना प्रसिध्दीची हौस चांगलीच नडली आहे. अंबानीच्या घराबाहेर ठेवलेल्या जिलेटीन कांड्या केवळ प्रसिध्दी मिळवण्यासाठी केलेला खटाटोप होता, अशी कुबुली त्याने एनआयएच्या टिमकडे दिल्याची माहिती एनआयएमधील सुत्रांनी दिली. मात्र वाझे सांगत असलेल्या थेअरीवर एनआयएला अजिबात विश्वास नाही.

अँटेलिया बाहेरील संशयित कार प्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. छख- च्या आतापर्यंतच्या चौकशीत असं समोर आलं आहे की, अँटेलियाबाहेर जी कार ठेवण्यात आली होती ती सचिन वाझे यांनीच ठेवली होती. पण आता एनआयएला असा प्रश्न पडला आहे की, एका जबाबदार पोलीस अधिकार्‍याने असं का केलं असावं? याचं उत्तर एनआयएने सचिन वाझेंकडून जाणून घेण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर हे हादरवरुन सोडणारं आहे.

एनआयएच्या खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन वाझे यांनी हे संपूर्ण प्रकरण फक्त प्रसिद्धी मिळविण्यासाठी केलं असल्याचं त्यांनी एनआयएला सांगितलं आहे. एनआयएच्या सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार वाझे यांनी हा प्रकार स्वतःची गेलेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी केला. 2004 मध्ये ख्वाजा युनूसचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यूच्या आरोपानंतर वाझे यांनी निलंबित करण्यात आलं होतं. 2004 ते 2020 या काळात तब्बल 16 वर्ष ते निलंबित होते. 2007 मध्ये वाझेंनी राजीनामा दिला पण तो तेव्हा मंजूर करण्यात आला नव्हता आणि वाझेंना निलंबितच ठेवण्यात आलं होतं. दरम्यानच्या काळात वाझे यांचे सहकारी बरेच पुढे निघून गेले. वाझे हे एकेकाळी मुंबईतले फेमस एऩकाऊंटर स्पेशालिस्ट होते. एका एनकाऊंटर स्पेशालिस्टभोवती जे प्रसिध्दीचं वलय असतं ते त्यांच्याभोवती देखील होतं. एनकाऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचे ते निकटचे सहकारी होते. पण 2004 मध्ये निलंबनाची कारवाई त्यांच्यावर झाल्याने त्यांना पोलीस दलापासून दूर जावं लागलं होतं.
2020 मध्ये पोलीस दलात परत आल्यानंतर ते एनआयएने अटक करेपर्यंत फक्त एक वर्षाच्या आतच वाझेंनी दिलीप छाबरिया केस, ह्रतिक रोशन केस यासारख्या हाय प्रोफाइल केसेस हाताळल्या. यातूनच गेली 16 वर्ष जी नामुष्की वाझेंनी सोसावी लागली होती त्यातून असं काही तरी मोठं करुन दाखवावं की पुन्हा प्रसिध्दीच्या झोतात येता येईल अशी वाझेंची इच्छा होती आणि यातून स्वत:च अंबानीच्या घराबाहेर त्यांनी स्कॉर्पिओ ठेवली. सीयूआयचे प्रमुख असल्यामुळे वाझेंकडे या तपासाची जबाबदारी आपसूकच आली आणि ही केस आपण लवकरात लवकर कशी उलगडली हे वाझेंना दाखवायचे होते.

1990 च्या दशकात मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्डचं अक्षरश: कंबरडं मोडलं होतं. मुंबईतील संघटीत गुन्हेगारी मोडीत काढण्यात मुंबई पोलिसांमधील प्रदीप शर्मा, दया नायक, दिवंगत पोलीस अधिकारी विजय साळसकर यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे या अधिकार्‍यांना बरीच प्रसिद्धी मिळाली होती. याच दरम्यान, मीडियाचा चेहरा मोहरा देखील बदलत होता. त्यामुळे हे अधिकारी टीव्हीवर देखील झळकू लागले होते. त्यामुळे त्यांच्याभोवती एक प्रकारचं वलय निर्माण झालं होतं. अशावेळी अनेक पोलीस अधिकार्‍यांना देखील आपणही अशीच कामगिरी करुन प्रसिद्धी मिळावावी असं वाटत होतं. या सगळ्यात सचिन वाझे हे नाव देखील अधूनमधून मीडियात पाहायला मिळत होतं. एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी त्यांची देखील ओळख निर्माण झाली होती. थोडीफार प्रसिद्धी त्यांना देखील मिळत होती. त्यामुळे वाझेंना देखील या प्रसिद्धीची काहीशी चटक लागली होती. पण त्यावेळी सचिन वाझे हे प्रदीप शर्मा यांच्या एन्काउंटर टीममधील ते एक सहकारी होते. यावेळी जेवढी प्रसिद्धी प्रदीप शर्मा आणि दया नायक यांना मिळाली तेवढी सचिन वाझेंना काही मिळू शकली नाही. त्यातच 2004 साली ख्वाजा युनूस प्रकरणी सचिन वाझेंवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे वाझेंना हवी असलेली प्रसिद्धी काही त्यांना मिळू शकली नाही. म्हणूनच 16 वर्षानंतर पोलीस दलात परतल्यानंतर वाझेंना ‘कुछ तुफानी’ करुन प्रचंड प्रसिद्धी मिळवायची होती का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

एनआयएच्या सूत्रांनुसार वाझेंनी हा सारा प्रकार पोलीस दलात गेलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्यासाठी केल्या असल्याचे सांगितले असले तरीसुध्दा एनआयए यावर विश्वास ठेवायला तयार नाही. या प्रकरणातील सार्‍या शक्यता एनआयए तपासत आहेत. त्यामुळे या प्रकरणात दररोज काय नवी माहिती पुढे येते याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागले आहे.

Tagged