ऑक्सीजन खंडित झाल्याने रूग्णांचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप फेटाळला

अंबाजोगाई कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे

स्वा.रा.ती. प्रशासन ‘ऑक्सीजन’वर

अंबाजोगाई : येथील स्वा.रा.ती. रूग्णालयात गेल्या तीन दिवसांपासून ऑक्सीजनचा तुटवडा आहे. त्यामुळे ऑक्सीजन पुरवठा करताना प्रशासनाची ‘दमछाक’ होत आहे. यातच आता ऑक्सीजनअभावी रूग्णांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप मृतांच्या नातेवाईकाने केल्याने खळबळ उडाली आहे. परंतू, हा आरोप रूग्णालय प्रशासनाने फेटाळला आहे. मृतांच्या नातेवाईकांनी आक्रोश सुरु केला असून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

   रूग्णांच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपानुसार, रूग्णालयातील ऑक्सीजन 45 मिनिटे खंडित झाला होता. त्यामुळेच रूग्णांचा मृत्य झाला आहे. याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. परंतू, हा आरोप जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्यासह स्वा.रा.ती. रूग्णालय प्रशासनाने फेटाळला आहे. दरम्यान, येथील स्वा.रा.ती. रूग्णालयात अनेक रूग्ण ऑक्सीजनवर असल्याने मोठ्या प्रमाणावर ऑक्सीजन लागतो. लातूरच्या नाना गॅस एजन्सी, विकास एजन्सीकडून ऑक्सीजन पुरवठा होण्यास विलंब होत असल्याने धांदल उडाली होती. रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे यांनी जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधून लोखंडीसावरगाव (ता.अंबाजोगाई), परळी व बीड येथून जम्बो सिलेंडर पाठवून दिले होते. ऑक्सीजन पुरवठा सुरळीत असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी ‘कार्यारंभ’शी बोलताना सांगितले आहे. तसेच, अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करून आरोप फेटाळले आहेत.

काय म्हटले आहेत पत्रकात?
21 एप्रिल 2021 रोजी रात्री 12 वाजेपासून ते आतापर्यंत स्वाराती रुग्णालयामध्ये कोरोनामुळे एकूण 11 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. यामधील बहुतांश रुग्णांचे वय हे 60 पेक्षा जास्त आहे. काही रुग्णांचा मृत्यू हा भरती होतांना ऑक्सीजनचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. तसेच त्यांना दमा, उच्च रक्तदाब, हायपरटेंशन इत्यादी शारीरिक व्याधी असल्याचेही दिसून आलेले आहे. परंतू, समाजमाध्यमांमध्ये स्वाराती रुग्णालयामध्ये ऑक्सीजनचा पुरवठा न झाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झालेला आहे अशा बातम्या येत आहेत. रुग्णालयामध्ये ऑक्सीजनचा पुरवठा करण्याकामी लोखंडीसावरगाव, बीड, लातूर, औरंगाबाद, नांदेड व जालना याठिकाणाहून जम्बो सिलेंडरचा व लिक्वीड ऑक्सीजनचा पुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून सर्व पाठपुरावा करण्यात येत आहे. व सध्या रुग्णांसाठी आवश्यक तो ऑक्सीजनचा पुरवठा उपलब्ध आहे.

Tagged